News Flash

कोडिंगचं कोडं : समारोप नव्हे, ही तर सुरुवात!

आज आधी आपण वर्षभरात काय शिकलो याची एक धावती उजळणी घेऊ या.

वर्षभर चाललेल्या या सदराचा हा शेवटचा भाग. आज आधी आपण वर्षभरात काय शिकलो याची एक धावती उजळणी घेऊ या.

१. युजर (user) कडून इनपुट (input) घ्यायचं.

२. युजरला आउटपुट (output) द्यायचं.

३. व्हेरिएबल (variable) – आधी ते डिक्लेअर (declare) करायचं, त्यात किंमत साठवून ठेवायची, ती वापरायची. तसेच, व्हेरिएबलची व्याप्ती.

४. डेटा टाइप्स (data types) – int, String, Boolean

५. मूलभूत गणिती क्रिया

६. मूलभूत तार्किक क्रिया- and, or, not

७. अटींनुसार चालणाऱ्या कमांड्स (commands)- जर-तर, जर-नाही तर जर-तर

८. एका भागात गरगर फिरणाऱ्या कमांड्स- फॉर लूप (for loop), रीपीट व्हाईल लूप (repeat while loop)

९. व्हेरिएबल्सची मालिका- अ‍ॅरे (array)

१०. प्रोग्रामचे छोटे छोटे भाग- फंक्शन्स (functions)

आपण हे जे शिकलो, ते बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘‘हे असं, हे एवढंच असतं का प्रोग्रामिंग (programming?’’ या प्रश्नाचं उत्तर आहे- ‘नाही.’ प्रोग्रामिंग एवढंच नसतं, याखेरीज आणखी बरंच असतं. पण आपण जे शिकलो तो प्रोग्रामिंगचा गाभा आहे.

तंत्रज्ञानातील बदलाबरोबर अ‍ॅप्लिकेशन्सचं स्वरूप बदलत असतं. काल वेब अ‍ॅप्लिकेशन्स नवीन होती, आज मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स नवीन आहेत. या बदलाबरोबर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस (programming languages) बदलत असतात. आपण एक भाषा शिकतो तोपर्यंत दुसरी भाषा येते. म्हणून आपण या सदरातून जे शिकलो ते एखादी प्रचलित भाषा न वापरता ‘ब्लॉकली’ ही लुटूपुटूची प्रोग्रामिंग लॅंग्वेज वापरून शिकलो. यामुळे प्रोग्रामिंगचं प्राथमिक ज्ञान तुम्हाला सर्वसामान्य रूपात मिळालं आहे. जे तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग लॅंग्वेज शिकताना वापरू शकाल.

एखादं सॉफ्टवेअर (software) अथवा अ‍ॅप्लिकेशन (application) विचारात घेतलं तर त्याचे ढोबळमानाने तीन भाग सांगता येतील. प्रेझेंटेशन लेअर (Presentation Layer), डेटा लेअर (Data Layer), नि या दोघांमधला अ‍ॅप्लिकेशन लॉजिक लेअर (Application Logic Layer).

पहिला आपल्याला दिसणारा भाग म्हणजे प्रेझेंटेशन लेअर अथवा फ्रंट एन्ड (Front End). आपण जे शिकलो त्यात प्रेझेंटेशन लेअर अगदीच जुजबी होता. युजरकडून एखादी किंमत इनपुट घ्यायची, किंवा एखादी किंमत युजरला प्रिंट करून दाखवायची. याखेरीज फ्रंट एन्ड डेव्हलपमेंट (development) मध्ये आणखी बऱ्याच गोष्टी येतात. स्क्रीनचा लेआऊट, म्हणजे स्क्रीनच्या आकारानुसार त्यावर काय, कसं दाखवायचं ते ठरवायचं. युजरने दिलेलं इनपुट तपासून घ्यायचं, त्याने चुकीचं इनपुट दिलं किंवा प्रोग्राममध्ये इतरत्र काही चूक झाली तर ते युजरला सांगायचं, इत्यादी.

याउलट, आपल्याला कधीच न दिसणारा भाग म्हणजे डेटा लेअर अथवा बॅक एन्ड (Back End). आपण जे शिकलो त्यात आपण व्हेरिएबल्स वापरली, पण त्यातील किमती कायमस्वरूपी साठवून ठेवल्या नाहीत. अ‍ॅप्लिकेशन वापरून बंद केलं की त्यातली व्हेरिएबल्स नष्ट होतात व त्यामध्ये ठेवलेल्या किमतीसुद्धा! आपण अ‍ॅप्लिकेशन परत वापरू तेव्हा आधीच्या वेळी दिलेली माहिती आपल्याला त्यात दिसायला हवी असल्यास ती माहिती डेटाबेस (database) मध्ये साठवून ठेवावी लागते. हे सगळं येतं बॅक एन्ड डेव्हलपमेंटमध्ये.

या दोघांच्या मधे असणारा भाग- अ‍ॅप्लिकेशन लॉजिक लेअर. हा या दोन्हीची सांगड घालतो, तसेच त्या अ‍ॅप्लिकेशनने जे काम करणं अपेक्षित आहे ते करतो. आपण जे शिकलो ते बहुतांशी या भागात वापरलं जाईल.

आता तुम्ही विचाराल- पुढे काय? भविष्यात तुम्ही एखादी खरीखुरी प्रोग्रामिंग लॅंग्वेज शिकू शकता. फ्रंट एन्ड / बॅक एन्ड डेव्हलपमेंट शिकू शकता. एक लक्षात घ्या, सदराचा जरी हा समारोप असला तरी तुमच्या प्रोग्रामिंग शिकण्याची ही सुरुवात आहे.

हे सदर जरी संपले असले तरी या सदरातील संकल्पना प्रत्यक्षात मुलांना कशा शिकवता येतील यासाठी पालक वा प्राथमिक/माध्यमिक शाळा खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकतात.

तुम्हा सर्वाना नवीन वर्षांच्या शुभेच्छा!

sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं http://www.codingbasics.omsw.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)

(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 12:31 am

Web Title: coding puzzle
Next Stories
1 ख्रिसमस गिफ्ट
2 सांताक्लॉजचं गाव
3 जीवचित्र : नागोबा
Just Now!
X