बालमित्रांनो, या आठवडय़ात येते आहे होळी-धुळवड. विविध रंगांत चिंब भिजण्यासाठी आणि पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही तयारच असाल. होळी हा रंगांचा सण. म्हणूनच आजचे कोडे हे रंगांशी संबधित आहे. तुम्हाला एका गटात (वैशिष्टय़ गट) रंग दिले आहेत. दुसऱ्या गटात (रंगगट) रंगांशी संबंधित प्रत्येकी दोन वैशिष्टय़े दिलेली आहेत. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत.
वैशिष्टय़ गट
१. रक्तामधील या रंगाच्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते.    
२. निषेध व्यक्त करण्यासाठी या रंगाची निशाणे दाखवली जातात.    
३. ‘थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा .. ..पिसाऱ्याचा फुलव फुलोरा’    
४. शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग.
५. ‘पी हळद आणि हो गोरी’
६. कृष्णकमळाच्या पाकळ्या या रंगाच्या असतात.    
७. या रंगाचा हत्ती म्हणजे खर्चाच्या दृष्टीने अवजड वाटणारी गोष्ट.    
८. या रंगाच्या दगडावरची रेघ म्हणजे न पुसले जाणारे लिखाण किंवा न फिरणारे वचन.    
९. ‘.. .. गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे.’    
१०. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरला
‘.. शहर’ म्हणूनही ओळखले जाते.
११. गोड-तुरट चवीचे फळ, ज्याच्या नावात त्याच्या रंगाचाही उल्लेख आहे.    
१२. ‘लंबोदर पीतांबर फणिवरबंधना’ या आरतीच्या ओळीतील वस्त्राचा रंग.    
१३. हलाहल प्राशन केल्यामुळे शंकराचा कंठ या रंगाचा झाला आहे.    
१४. रक्तातील या रंगाच्या पेशी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती देतात.    
१५. हव्याहव्याशा वाटणाऱ्या, आल्हाददायी थंडीला .. रंगाच्या थंडीची उपमा दिली जाते.    
१६. प्राजक्ताच्या फुलांच्या देठांचा रंग.    
१७. हा रंग काम सुरू करण्याची परवानगी देतो.    
१८. या रंगाद्वारे धोक्याची सूचना मिळते.