सध्या आकाशात दोन धूमकेतू दिसत आहेत. त्यातील Panstarrs (पॅनस्टार्स) हा धूमकेतू अनेकांनी पाहिला. त्याचे फोटोही अनेकांनी घेतले. या फोटोंची इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण आकाश निरीक्षकांमध्ये चालू आहे. आज (२४ मार्च ) रोजी हा धूमकेतू सूर्याच्या पूर्वेस (वर) सुमारे २४ अंशांवर आहे. त्याचे निरीक्षण करावयाचे असल्यास सूर्य मावळला त्या क्षितिजावरील स्थानाच्या सुमारे २४ अंश उत्तरेस (उजवीकडे) आणि साधारण २० ते २२ अंश उंचीवर शोधण्याचा प्रयत्न करावा.
धूमकेतू हे आपल्या सूर्य कुटुंबातील सभासद आहेत, पण ते अनाहूत पाहुणे. टायको ब्राहे याने १५७७ च्या सुमारास जो धूमकेतू पाहिला तो खूप दूर असल्याचा निष्कर्ष त्याने काढला. त्यामुळे धूमकेतू वातावरणात तयार होतात हा अ‍ॅरिस्टॉटलचा सिद्धांत खोटा ठरला. हॅलेचा धूमकेतू फार प्रसिद्ध आहे. त्याचे दर्शन १९८६ साली आपल्याला झाले. १६८२ च्या सप्टेंबरमध्ये हॅलेने एक धूमकेतू पाहिला आणि त्याने त्यापूर्वी सूर्यमालिकेला भेट दिलेल्या काही धूमकेतूंच्या नोंदी तपासल्या. १५३१ आणि १६०७ या वर्षी दिसलेला धूमकेतू आणि १६८२ चा धूमकेतू हे वेगवेगळे नसून एकच धूमकेतू पुन:पुन्हा येत असावा असा त्याचा कयास होता. त्याने त्या धूमकेतूच्या कक्षेचे गणितही केले आणि हाच धूमकेतू १७५८ साली दिसेल असे शास्त्रीय भविष्य वर्तविले आणि तसे घडलेही. तेव्हापासून हा धूमकेतू ‘हॅले’च्या नावाने ओळखला जाऊ लागला. इ.स.पूर्व २४० पासून हॅले धूमकेतूच्या नोंदी सापडतात. त्यांची कक्षा अतिलंबवर्तुळाकार आहे. त्याचा अपसूर्य बिंदू (सूर्यापासून कमाल अंतर) नेपच्यूनच्याही पलीकडे आहे. त्यामुळेच तो सतत पाहता येत नाही. चार्ल्स मेसिए (१७३०-१८१७) याने एकूण १३ धूमकेतू शोधले. धूमकेतू जेव्हा दूर असतो तेव्हा तेजोमेघासारखा दिसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा फसगत व्हायची. तेव्हा धूमकेतूसारख्या दिसणाऱ्या तेजोमेघ, दीर्घिका यांची एक कायमस्वरूपी यादीच मेसिएने तयार केली. त्याच्या यादीत अशा ११० गोष्टींचा समावेश होता. या यादीप्रमाणे देवयानी आकाशगंगेचा क्रमांक एम-३१ असा आहे. आकाश निरीक्षकांना या यादीचा फार उपयोग होतो.
धूमकेतू जेव्हा सूर्याजवळ येतो तेव्हाच त्याला शेपूट फुटते. काहींचं शेपूट (tail) पिसासारखं दिसतं. हे धूमकेतू सूर्याजवळ आले म्हणजे त्यातील कण वेगळे होतात. अशा कणांचा समूह मग कक्षेत भ्रमण करीत राहतो. हे कण पृथ्वीकडे ओढले जातात. ते वातावरणात प्रवेश करतात तेव्हा घर्षण होऊन पेट घेतात. त्यांनाच आपण उल्का म्हणतो. अशा उल्का कधी कधी मोठय़ा संख्येने पडतात तेव्हा त्याला उल्कापात म्हणतात. टेम्पल- टटल धूमकेतूमुळे असा उल्कावर्षांव दरवर्षी साधारण १७ नोव्हेंबरच्या सुमारास सिंह राशीतून होतो. अगदी अलीकडे १८ नोव्हेंबर २००१ रोजी हा उल्कावर्षांव फार मोठय़ा प्रमाणावर झाला होता.
अगदी अलीकडे नुसत्या डोळ्यांनी दिसलेले काही धूमकेतू- इकेया झांग (२००२), हेल बॉप (१९९७), हयाकूटाके (मार्च १९९६) आणि हॅले (१९८५).