01 March 2021

News Flash

‘कूल’ आइस्क्रीम

पण आइस्क्रीम करायची पद्धत भारीच किचकट आहे.

माझ्या बालबल्लव आणि छोटय़ा सुगरणींनो, आज मी तुम्हाला खास उन्हाळ्याकरिता एक सोप्पी, बिना कटकटीची आणि तरी सुपरडुपर चविष्ट पाककृती सांगणार आहे. आता आइस्क्रीम कुणाला आवडत नाही? उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार आइस्क्रीमचा गोळा जिभेवर रेंगाळत, आपल्याला आतून थंड करत पोटात विसावतो तेव्हा किती सुख वाटतं! हो की नाही?

पण आइस्क्रीम करायची पद्धत भारीच किचकट आहे. आधी योग्य प्रमाणामध्ये दूध, साय, क्रीम, साखर, स्वादाकरिता काही जिन्नस मिसळा. ते तापवा. उकळा. मग थंड करा. फारच लांबलचक जंत्री असते बाबा! माझी छोटी मत्रीण- आभाकरिता मी या सगळ्यालाच फाटा दिला. शिवाय साखरेचं गोड खाल्ल्याने दात किडतात वगरे मोठय़ांच्या बहाण्यांनाही गप्प करायचं होतं. या खटाटोपापायी सोप्पी तरी एकदम कूल आइस्क्रीमची पाककृती मला गवसली. तीच तयार करायला आणि चाखायला आता तुम्ही सज्ज व्हा. सगळ्यात पहिल्यांदा, अगदी लेख पुढे वाचायच्या आधीच फ्रीजरचं तापमान कमीत कमी सेटिंगवर ठेवा, म्हणजे नंतर वाट कमी पाहायला लागेल.

चार जणांकरिता साहित्य : ४-६ मोठी पूर्ण पिकलेली केळी, अर्धा ते पाऊण वाटी आंबटसर दही किंवा चक्का, अर्धा टी-स्पून वेलची पूड, स्वादाकरिता जायफळ किंवा डार्क चॉकलेट. लागलीच तर चवीनुसार थोडी साखर.

उपकरणं : सेफ झाकण असलेला डबा, मिश्रण बनवण्याकरिता फूड प्रोसेसर किंवा मिक्सर-ग्राइंडर आणि अर्थातच फ्रीजर.

सर्वप्रथम चांगली पिकलेली, खरं म्हणजे थोडी अधिकच पिकलेली केळी सोलून, ज्या डब्यात आइस्क्रीम करायचं आहे त्या डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. केळी जन्माष्टमीच्या प्रसादाकरिता चिरतात तशी मोठी चिरली किंवा हातांनीच मोडून ठेवलीत तरी चालतील. आता ही केळी चांगली थंडगार, गोठून थंड व्हायला हवीत. साधारण सहा ते आठ तास लागतात. रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीमचा बेत करायचा तर सकाळी लवकर उठून किंवा आदल्या रात्रीच केळी सोलून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. आइस्क्रीम छान निगुतीने करायचं तर एक-दीड वाटी दही मलमलच्या फडक्यामध्ये बांधून किंवा बारीक जाळीच्या गाळण्यामध्ये किंवा चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवा. चक्क्याइतकं घट्ट नाही झालं तरी दह्यमधलं पाणी निघून गेलं तरी पुरे. दह्यतलं पाणी नाही काढलंत तरी चालेल, काही हरकत नाही. आता हे तयार दही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तेदेखील थंड होईल. फ्रीजमध्येच बरं का, फ्रीजरमध्ये नाही! आपल्याला दही थंड करायचंय, गोठवायचं नाही.

केळी छान गोठली आणि दही थंड झालं म्हणजे आइस्क्रीम बनवण्याकरिता फूड प्रोसेसर किंवा मिक्सर-ग्राइंडर तयार ठेवा. सोबत कुणा मोठय़ा माणसाला मदतीला आणि देखरेखीला ठेवा बरं का; तेवढीच तुम्हालाही मदत, कसं? मिश्रण बनवण्याकरिता फूड प्रोसेसर वापरलात तर किंचित दळदार, फोडी असलेलं आइस्क्रीम बनेल, मिक्सर-ग्राइंडर वापरलात तर मात्र अगदी मऊशार लोण्यासारखं आइस्क्रीम तयार होईल. तर आता सर्वप्रथम वेलचीपूड, जायफळ पूड, गोठलेली केळी किंवा केळ्याच्या मोठय़ा फोडी, आणि थंड दही टाका आणि त्याचं छान मिश्रण तयार होईपर्यंत फूड प्रोसेसर किंवा मिक्सर-ग्राइंडर चालवा. स्वादाकरिता डार्क चॉकलेट वापरणार असलात तर इतर जिनसांआधी चॉकलेट बारीक करून घ्या, नाहीतर इतर जिनसांसोबत त्यांचे बारीक तुकडे होणार नाहीत. केळी गारेगार-थंडगार असतील आणि तुम्ही पाणी काढलेलं दही वापरलंत तर मिश्रण लगेचच सॉफ्टसव्‍‌र्हसारखंच बनतं, थेट मिक्सरच्या भांडय़ातूनच चमच्याने खाता येतं. चव पाहा आणि लागलीच तर दोन-तीन चमचे साखर घालून पुन्हा साखर विरघळेपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा. साखर नाही घातली तर आइस्क्रीमचं मिश्रण फ्रीजरमध्ये केळी ठेवली त्या डब्यामध्ये काढून ठेवा. दोन-तीन तासांमध्ये झक्कास गोळा होईल असं आइस्क्रीम तयार झालेलं असेल. थेट शीत घनगोल गट्ट!

आता या पाककृतीची खरी मज्जा सांगतो. फ्रीजरमध्ये सोललेली केळी, आंब्याचा गर, चिकूचा गर, पिकलेल्या टरबुजाचा गर, सीताफळ, रामफळ यांचा बिन-बियांचा गर, पपईचा गर असं नेहमीच साठवून ठेवलं तर घरामध्ये नेहमीच दही असतंच की! गोठलेल्या या फळांच्या गरापासून झटपट आइस्क्रीम करता येतं. एक लक्षात ठेवा, बाकी कोणतंही फळ घेतलं तरी किमान दोन गोठलेली केळी त्यामध्ये घालायलाच हवी, या केळ्यांमुळेच आपलं हे आइस्क्रीम क्रीमी होतं. पुढची गंमत म्हणजे, या आइस्क्रीममध्ये अनेक प्रकारचे जिन्नस घालून एकाच आइस्क्रीमची अनेक स्वादाची गंमत करता येते. केळ्याच्या आइस्क्रीममध्ये चॉकोलेट कसं घालायचं ते मी सांगितलंच आहे. त्याव्यतिरिक्त मिश्रण वाटून तयार झाल्यावर केळ्याच्या आइस्क्रीममध्ये बेदाणे, मनुका छान लागतात. केळ्याचं, चॉकलेट घातलेल्या आइस्क्रीममध्ये डब्यात भरल्यावर हापूस किंवा पायरीचा मिक्सरमध्ये बारीक केलेला रस घातला आणि चमच्याने हलक्या हाताने हलवला तर केळ्यासोबत आंब्याचा स्वाद छान लागतोच, आंब्याचा रंगही थरांसारखा दिसतो. या आइस्क्रीममध्ये आल्याचा कीस घातला तरी छान लागतो. आंब्यासोबत आणि चिकूसोबत फणसाच्या गराचे तुकडे छान लागतात. सीताफळ-रामफळासोबत पपईच्या बारीक फोडी किंवा बुंदीच्या लाडूची बुंदी छान लागते. दह्यऐवजी तेवढीच साय घालून आइस्क्रीम बनवलंच तर त्याची चव आणिकच मधुर होते. तुम्हाला आणि मला खेळायला आवडतंच, आणि ही पाककृती करताना खेळायला, मज्जा करायला भरपूर वाव आहे. माझं सगळ्यात चमत्कारिक तरी चविष्ट कॉम्बिनेशन म्हणजे केळ्या-आंब्याच्या आइस्क्रीमवर वाढताना मीरेपूड टाकायची.. तुम्ही प्रयोग करा आणि तुम्हालाही अशी छान, अगदी खास तुमची आइस्क्रीमची चव सापडेल.

– श्रीपाद

contact@ascharya.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:34 am

Web Title: cool ice cream
Next Stories
1 शर्यत
2 विज्ञानवेध : नवा चॅम्पियन
3 हितशत्रू : ‘सांगायला काय जातंय?’
Just Now!
X