18 October 2018

News Flash

फुलांच्या विश्वात : तगर

तगरीची पाने आकाराने छोटी, गर्द हिरव्या रंगाची असतात.

तगरीची पाने आकाराने छोटी, गर्द हिरव्या रंगाची असतात.

बारा महिने तेरा काळ उपलब्ध असणारी फुले कोणती, याची यादी बनवायला सुरुवात केली तर ती तगरीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होणारच नाही. तगर किंवा तगरी या नावाने ओळखली जाणारी ही सदाहरित भारतीय झुडूपवर्गीय वनस्पती. Tabernaemontana divaricata (टाबर्नमोंटाना डायवारीकाटा) असे याचे शास्त्रीय नाव. या सदाहरित फुलझाडाची उंची जास्तीत जास्त ७ ते ८ फुटांपर्यंत असू शकते. पावसाळा आणि थंडीच्या दिवसात फुलांचा विशेष बहर येत असला तरी वर्षभर फुले येतात.

तगरीचे फूल आकाराने लहान, पाच पाकळ्या; त्यांचा रंग पांढरा शुभ्र, फुलाच्या देठाचा रंग हिरवागार. पाकळ्या पाणीदार आणि नाजूक असतात. त्यांची रचना साधारण चांदणीसारखी दिसते. त्यामुळेच त्याला चांदणी असेही म्हणतात. फुले सुगंधरहित असून फांद्यांच्या टोकावर येतात. या फुलांचा वापर देवपूजेसाठी तर केला जातोच, परंतु यापासून अनेक विकारांवर औषधेदेखील बनविली जातात. नेत्रविकार तसेच पडून किंवा खरचटून झालेली जखम भरून काढण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. तगरीच्या कळ्यांना बाजारात विशेष मागणी आहे. या काळ्यांचा वापर गजरे, हार, वेण्या बनविण्यासाठी केला जातो. विविध रंगांच्या लोकरीमध्ये विणलेल्या या पांढऱ्याशुभ्र कळ्यांची वेणी आपले लक्ष आपसूकच वेधून घेते.

तगरीची पाने आकाराने छोटी, गर्द हिरव्या रंगाची असतात. सदाहरित असल्याने पाने नेहमी उपलब्ध असतात. हॉक मॉथ म्हणजेच पतंगाची मादी या पानांवर अंडी घालते आणि याच्या आळ्या याची पाने खाऊन आपली उपजीविका करतात. फांद्यांची रचना गोलाकार असण्याने या झुडपाचा आकारदेखील गोलाकार दिसतो. याच्या याच गुणामुळे याची शोभेची वनस्पती म्हणून लागवड केली जाते. उद्याने, शाळा परिसर, मंदिर परिसर, रस्ता दुभाजक या ठिकाणी याची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. कमी पाण्यात वाढणारी वनस्पती असल्याने याची सहज लागवड करता येते. सध्या बाजारात याच्या खुज्या जातीदेखील उपलब्ध आहेत. त्यादेखील खूप सुंदर दिसतात. पानांना काहीशी पांढरट झाक असणारी जातदेखील बाजारात उपलब्ध आहे. याच्या कळ्यांना असणारी मागणी लक्षात घेता शेतकरी बांधवांनी पडीक जागेवर याच्या लागवडीचा विचार करण्यास हरकत नाही. याला फलधारणा होत असली तरी आपल्याकडे याची फळे लागलेली पाहायला मिळत नाहीत. नवीन रोपांची निर्मिती बिया तसेच छाट कलमाने केली जाते.

शाळा, सोसायटी परिसर सुंदर आणि हिरवागार व्हावा अशी इच्छा असेल तर तगरीच्या रोपाला आपल्या हरित धनात सहभागी करून घ्यायलाच हवे.

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

First Published on December 10, 2017 1:54 am

Web Title: crape jasmine flower