22 November 2019

News Flash

ऑफ बिट :  जसं बघाल तसं

हे झालं दुसऱ्यांबद्दल, पण स्वत:बद्दलही तसंच म्हणजे- अनेकजण विनाकारणच मला चांगलं लिहिता येत नाही.

आमचे पी.टी. चे सर मला टीममध्ये घेतच नाहीत, गणिताचे शिक्षक त्या अमुक मुलाचे/ मुलीचे लाड करतात. सायन्सच्या शिक्षिका वर्गातल्या थोडय़ाच मुलांना शिकवतात.. हे आणि असं बरंच काही अनेकदा कानावर येतं. हे असं म्हणणाऱ्यांच्या म्हणण्यात तथ्य नसतंच असं नाही, पण ते शंभर टक्के खरं असतं असंही नाही. म्हणजे शिक्षक त्यांचं काम करत असतात, ते तुमचं मूल्यमापन सततच करत असतात आणि ज्या मुलांमध्ये त्या शिक्षकांच्या विशिष्ट विषयांसाठी अपेक्षित असणारे गुण असतात ते त्यांचे लाडके होतात. आता तुम्हालाही नाही का रागावणाऱ्या बाबांपेक्षा शांत ऐकून, समजून घेणारी आई जवळची वाटते! इतकं सोप्पं आहे ते. पण आपण मात्र चुकीच्या पद्धतीने बघतो आणि त्यातली क्लिष्टता वाढवतो. बघा नं, गणिताच्या शिक्षकांच्या लाडक्या विद्यार्थ्यांएवढय़ा शंका तुम्ही विचारता का, त्याच्याएवढा अचूक गृहपाठ तुम्ही करता का, टीममध्ये घेतल्या गेलेल्या विद्यार्थ्यांएवढा सराव तुम्ही करता का, तेवढी खिलाडूवृत्ती, बळकटी तुमच्याकडे आहे का, प्रत्येक विषयाबाबत असं बघाल ना तर नक्कीच चार-पाच विषयांच्या शिक्षकांचे लाडके होऊन जाल.

हे झालं दुसऱ्यांबद्दल, पण स्वत:बद्दलही तसंच म्हणजे- अनेकजण विनाकारणच मला चांगलं लिहिता येत नाही. धावणं आपल्याला बुवा नाही जमणार. स्टेजवर आणि मी?  गाणं, मी म्हणायचं? असे स्वत: बद्दलचे प्रश्न सुरुवातीलाच विचारून मोकळे होतात. म्हणजे ते स्वत: कडेही त्याच पद्धतीने बघतात. मी एक विद्यार्थी आहे. फक्त शाळा, टय़ूशन नि होमवर्क करणे हे माझे काम आहे. हेच त्यांना स्वत:बाबत दिसतं. ते तसं बघणं सोडून त्यांनी स्वत:बद्दल  ‘सुरुवातीला अडखळेन, पण हळूहळू जमेल की गोष्ट सांगणं मला.’ ‘गाणं म्हणायचं धाडस तर करतो/ करते. जमणार आहे मला.’ ‘चांगलं लिहिता येईपर्यंत दोन-चारदा पुन्हा पुन्हा लिहून तर पाहतो.’ असा विवेकी विचार करून सुरुवात केली तर त्यांना काहीच कठीण नाही. म्हणूनच सकारात्मक विचारांपेक्षा विवेकी विचार गरजेचा असतो. कारण सकारात्मक विचारांनी बघताना ते घडणारच असा आत्मविश्वास निर्माण होऊन तो धोकादायक ठरू शकतो. पण विवेकी विचार सर्वाचा साकल्याने विचार करायला उद्युक्त करतो. मग सुरुवात करा बरं विवेकाने पाहायला. तुमचाच तुम्हाला प्रत्यय येईल ‘जसं बघाल तसं..’ चा.

मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com

First Published on December 11, 2016 5:23 am

Web Title: discerning thought
Just Now!
X