News Flash

‘विवेके क्रिया आपुली पालटावी’

. केव्हा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हा ‘विवेक’ हवाच.’’ आजीचा राग उफाळून आला होता.

(संग्रहित छायाचित्र)

सुचित्रा साठे

suchitrasathe52@gmail.com

‘‘अगं प्रीती, किती उशीर हा तुला यायला? मी काय सांगितलं होतं तुला, सिनेमा सुटल्यावर गप्पा मारत बसा, पण जितक्या वेळाचा सिनेमा तितका वेळ टाइमपास केलात.. तुझे आई-बाबा गावाला गेले आहेत. आठ वाजत आले आता, कुठे शोधणार मी तुला? ही सगळी बच्चे कंपनी गोळा होऊन बसलीयत माझ्यासोबत. काही सुचेना मला. असं झालेलं चालणार नाही हं पुन्हा. केव्हा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हा ‘विवेक’ हवाच.’’ आजीचा राग उफाळून आला होता.

‘‘आजी, अगं आजच परीक्षा संपली म्हणून मैत्रिणी ऐकेनात, मलाही सोडेनात. म्हणून जरा उशीर झाला.’’ प्रीतीने खिंड लढवायचा दुबळा प्रयत्न केला.

‘‘आता तू दमली असशील, तेव्हा झोपून टाकशील, खरं ना.. पण परीक्षा संपल्याचा आनंद घरातही शांतपणे वावरून सगळ्यांशी मोकळेपणाने बोलत, दिसेल त्या कामात घरातल्यांना मदत करत घेता येतो, किंबहुना घ्यायचा असतो. प्रत्येक घराची शिस्त असते. नियमांची चौकट असते आणि ती पाळायची असते. ते तुमच्या हिताचं असतं. त्यासाठी विवेक हवाच, बाळा.’’ आलेला ताण कमी झाल्यामुळे आजी शांत झाली.

‘‘कोण ‘विवेक’आजी? मला दाखव ना.’’ पहिलीतल्या ओंकारने हळूच विचारलं.

‘‘विवेक म्हणजे कोणत्याही मुलाचं नाव नाही सांगितलं मी. विवेक म्हणजे सारासार विचार. चांगलं आणि वाईट यातून चांगलं निवडण्याची शक्ती. रवींद्रनाथ टागोरांची एक गोष्ट आहे बरं का ओंकार. आईजवळ बाळ खेळत होतं. परंतु आईला स्वयंपाक करायचा होता म्हणून तिने बाळासमोर काही खेळणी ठेवली. बाळ थोडा वेळ रमलं, मग कुरकुरू लागलं. आईने आणखीन चांगली खेळणी पुढे सरकवली. थोडा वेळ बाळ खेळत राहिलं. पण नंतर आई जेव्हा पुन्हा नवीन खेळणी घेऊन आली, तेव्हा बाळाने गंमतच केली. त्याने आईची साडीच धरून ठेवली. त्याला आता आईच हवी होती. त्याने ‘विवेका’ने आईची निवड केली होती. तर विवेक म्हणजे योग्य निवड, बरं का ओंकार.’’ ओंकारच्या डोक्यात फक्त खेळणी घुसली होती.

अद्वयदादाला मात्र ‘विवेक’ कळला होता. ‘‘आजी परवा शेजारच्या सोसायटीत सनई, ढोल, ताशे सकाळी सहा वाजायच्या आधीपासून कर्कश्श आवाजात लावले होते. तो आवाजही अगदी सहन होत नव्हता. चार-पाच तास ‘आवाज की दुनिया’ होती. जरा दुसऱ्यांचा विचार करायला हवा होता ना!’

‘‘हाच तर विवेकाचा अभाव. मंजुळ आवाज असता तर वातावरण कसं सुरेल झालं असतं, अगदी कानांना मेजवानी मिळाली असती. मेजवानीवरून आठवलं, परवा अद्वय, तुझे मित्र आले होते की नाही जेवायला, ते सगळे येता येता बाहेर खाऊनच आले होते. जरा काही वाढायला गेले की ‘नको नको’ असंच म्हणायचे. पण हे बरोबर नाही. आधी ठरलेलं होतं सगळं. शिवाय, तुझ्या आईने चार प्रकार जास्त केले होते. पण मनावर संयम नाही. ‘मोमोजची गाडी दिसल्यावर खाण्याचा मोह आवरला नाही म्हणे,’ असं त्यांच्यापैकी एकजण हळूच पुटपुटला. विवेकाचा, विचारशक्तीचा अभाव, दुसरं काय?’’ आजीने परखड मत नोंदवलं.

‘‘कधी कधी आपण कोणाकडे गेलो आणि त्यांना फोन आला की ती व्यक्ती फोनवर आरामात गप्पा मारत बसते. कामाचा फोन नाही हे लगेच लक्षात येतं. अशा वेळी ‘नंतर फोन करतो,’ असं सांगायला हवं ना गं आजी.’’ प्रीतीची गाडी आता विवेकाच्या रुळावर आली होती.

‘‘हो तर, हे तारतम्य हवंच. अभ्यास करताना एखादा विषय खूप आवडीचा असला तरी फक्त सारखा त्याच विषयाचा अभ्यास करून चालणार नाही. बाकीच्या विषयांतही पास व्हायचं आहे हे लक्षात ठेवायलाच हवं. परीक्षा जवळ आली की अभ्यासासाठी जागरण करताना अतिरेक केला की मग परीक्षेच्या दिवशी कसंतरी व्हायला लागतं. पेपरच सोडवता आला नाही तर केलेल्या अभ्यासाचा काय उपयोग? म्हणून मनावर विवेकाचा अंकुश हवाच ना!’’

‘‘माझा एक मित्र आहे ना आजी केव्हाही आला, आईने काहीही दिलं तरी सगळं खात नाही, टाकून देतो.’’ अद्वयला ही गोष्ट खटकली हे बघून आजीला बरं वाटलं.

‘‘समर्थ रामदास स्वामींचा विवेकावर विलक्षण भर होता. आपण यथेष्ट जेवणे। उरले ते अन्न वाटणे। परंतु वाया दवडणे। हा धर्म नव्हे॥ असं त्यांनी दासबोधात सांगितलंय. एकदा एक भारतीय माणूस जर्मनीला गेला होता. त्याने बरेच पदार्थ मागवले आणि टाकले. त्या वेळी तिथल्या व्यवस्थापिकेने त्याला हटकले. तेव्हा तो माणूस तिला म्हणाला, ‘‘मी पैसे दिलेत मग आपली हरकत का?’’ तेव्हा ती बाई म्हणाली, ‘‘पैसे तुमचे असले तरी रिसोर्सेस आमचे आहेत.’’ म्हणून पानात टाकू नये आणि पदार्थाला नावंही ठेवू नयेत. एकदा लोकमान्य टिळकांना आचाऱ्याने चुकून मीठ घातलेला चहा दिला. त्यांनी तसाच तो पिऊन टाकला. एक शब्दही बोलले नाहीत. आचाऱ्याने तो चहा स्वत: प्यायला तेव्हा त्याच्या लक्षात आलं. या प्रसंगाने त्याच्या मनातील टिळकांविषयीचा आदरभाव आणखीनच वाढला. खातापिताना असं लक्षात येणं हा जिभेचा स्वभाव आहे. परंतु ते करणाऱ्याच्या लक्षात आणून देणं, हा जिभेचा आगाऊपणा आहे, तो विवेकाने टाळला पाहिजे.’’ – इति आजी.

‘‘आजी, तुझं स्पीच खूप डिफिकल्ट आहे.’’ इतका वेळ शांत बसलेला ओंकार पुटपुटला.

‘‘बरं झालं आता दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. आता बोललास ना, असं संमिश्र भाषेत बोलायचं नाही. शाळेत इंग्रजी बोललास तरी घरात शुद्ध मराठीच बोललं पाहिजे. ‘तू सीट ना’ असं नको हं. आणि आता मोबाइलचा वापर. दहावी उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला स्वत:चा मोबाइल मिळणार आहे. सध्या तुम्ही आई-बाबांच्या मोबाइलवर गेम खेळण्याची संधी साधत असता. त्यात किती वेळ फुकट जातो. डोळ्यांना, अंगठय़ाला त्रास होतो याचा विचार करा. याचे परिणाम नंतर भोगावे लागतात. आजकाल लहान वयात चष्मा येण्याचं प्रमाण वाढलं आहे. नुसते अंगठे आणि नमस्कार करण्यात वेळ फुकट घालवू नका. त्यापेक्षा काही वाचाल लिहाल, पाठांतर कराल तर फायदा होईल. हे मी कानीकपाळी ओरडून सांगते आहे. कारण तुम्ही सगळी मला आवडता. तुमचं आयुष्यात पुढे नुकसान होऊ नये म्हणून काळजी वाटते. मोबाइलचा कामासाठी अवश्य वापर करा, तंत्रज्ञान शिकायलाच हवं, पण विवेक सोडू नका. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘विवेक क्रिया आपुली पालटावी। अति आदरे शुद्ध क्रिया धरावी॥’ उद्या दासनवमी आहे त्यानिमित्ताने समर्थाना वंदन करून जीवनात कोणतीही गोष्ट करताना विवेकाने निर्णय घेऊ या. सुप्रसिद्ध लेखिका, निवेदिका, वक्त्या धनश्री लेले माहिती आहेत ना! त्यांच्या आजोबांनी धनश्रीताई पाचवी-सहावीत असल्यापासून रोज एक श्लोक त्यांना पाठ करायला लावला होता. आठवीत असताना त्यांची पूर्ण गीता पाठ होती. मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत त्यांची आई रोज एका विषयावर निबंध लिहायला लावायची. त्या वेळी त्यांचे मित्र-मैत्रिणी अंगणात ‘टाइमपास’ करत राहायचे. धनश्रीताईंना आईचा खूप राग यायचा, पण त्याचे परिणाम आज आपण बघतोय ना! तेव्हा मोबाइलवर गेम खेळणं चांगलं की मनाचे श्लोक, गीता पाठ करणं चांगलं याचा निर्णय घेणं तुमच्या हातात आहे. तो योग्य निर्णय तुम्ही घ्यालच. मला खात्री आहे. त्याबद्दल आधीच बक्षीस म्हणून पिझ्झावर फुली मारून गरमागरम थालीपीठ आणि लोणी खायला चला बघू.’’

सर्वाचा ‘हो ’ अगदी सुरात लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 4:04 am

Web Title: discretionary actions balmaifal article abn 97
Next Stories
1 चित्रांगण : खिडकीची गोष्ट!
2 बिस्वाचा डब्बू
3 मनमैत्र : सकारात्मक विचार करा
Just Now!
X