02 July 2020

News Flash

ज्योतिर्मय दिवाळी

राजा विक्रमजीत इतका पराक्रमी होता की, नगराला कुणा शत्रूच्या आक्रमणाची कसली भीती नव्हती. त्यामुळे नगरात नेहमी शांतता असायची.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची मोकाशी

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट! तेजपूर नावाचं एक नगर होतं. नगराचा राजा होता विक्रमजीत. त्याच्या राज्यव्यवस्थेत प्रजा आनंदाने नांदत होती. नगर समृद्धीसंपन्न आणि सुखवस्तू होतं. राजा विक्रमजीत इतका पराक्रमी होता की, नगराला कुणा शत्रूच्या आक्रमणाची कसली भीती नव्हती. त्यामुळे नगरात नेहमी शांतता असायची.

एकदा काय झालं, अक्राळ नावाच्या एका महाकाय, मायावी राक्षसाने नगरातील ही शांतता भंग केली. नगराभोवती असलेल्या घनदाट वनात राहायला आल्यापासून त्याने नगरवासीयांचं जगणं अगदी नकोसं करून सोडलं होतं.

अक्राळ निशाचर होता. दिवसा तो कधीच कुणाला दिसायचा नाही. रात्री नगरातले सगळे दिवे विझले आणि सगळीकडे सामसूम झालं की तो नगरात घुसायचा. त्याच्या दाणदाण टाकलेल्या पावलांच्या आवाजाने अख्ख्या तेजपूरचा थरकाप होत असे. अक्राळ कुणाच्या घरातल्या गाई, म्हशी, बकऱ्या गप्पकन् गिळून टाकायचा, तर कधी नगरातील झाडांची, बागांची नासधूस करायचा. एकदा तर त्याने एका घरातून झोपलेली तान्ही जुळी बाळं पाळण्यातून उचलून नेली होती. त्या प्रसंगानंतर नगरवासीयांची झोपच उडाली. आपला जीव मुठीत ठेवून सगळे वावरायचे. संध्याकाळ झाली की, सगळीकडे नुसती भयाण शांतता पसरायची. अक्राळच्या येण्याने ‘तेज’पूर पार ‘निस्तेज’पूर होऊन गेलं..

राजा विक्रमजीतने अक्राळचा सामना करत त्याच्याशी लढाई करण्याचा प्रयत्नही केला; पण तो एकटाच राजाच्या सेनेवर भारी पडला आणि राजा सपशेल हरला. त्यानंतर अक्राळने राजापुढे असा काही प्रस्ताव ठेवला की, सगळे अजूनच भयभीत झाले. काय करावं ते कुणालाच समजेना.

राजदरबारात याच विषयावर राजा मंत्र्यांशी चर्चा करत असताना राजाची एकुलती एक कन्या राजकुमारी दीपलक्ष्मी तिथे आली. राजकुमारी अतिशय सुंदर आणि हुशार होती. अनेक कलांमध्ये आणि विद्यांमध्ये पारंगत होती.

राजकुमारी येताच तिथे उपस्थित मंत्र्यांनी तिला अभिवादन केलं.

‘‘राजकुमारी, आज राजदरबारात? तेही इतकं अचानक?’’ राजाला आश्चर्य वाटलं.

‘‘होय, महाराज! कारणंच तसं आहे. पण हे काय, दिवाळी आठवडय़ावर येऊन ठेपलीये तरी दरबार अजून सजला नाहीये! महालातसुद्धा दिवाळीची कसलीच तयारी दिसत नाहीये!’’

‘‘राजकुमारी, अक्राळपायी सगळे दु:खी आहेत. त्यात आपण त्याच्याबरोबर युद्ध हरलोय, दिवाळी कशी काय साजरी करणार? आणि त्याचा तो प्रस्ताव.. त्याला उद्यापर्यंत आपलं उत्तर कळवायचंय..’’ महामंत्री म्हणाले.

‘‘महामंत्री, आपणच असे हतबल झालो तर प्रजेला कुणी धीर द्यायचा? अक्राळने केलेली मागणी आलीये माझ्या कानावर. मला वाटतं की आपण त्याचा प्रस्ताव स्वीकारावा.’’ राजकुमारी धर्याने म्हणाली.

‘‘तुम्ही काय बोलताय राजकुमारी! अक्राळने तुमच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव महाराजांपुढे ठेवलाय आणि त्यानंतर तो तुम्हाला कायमचं इथून घेऊन जायचं म्हणतोय. महाराज असा प्रस्ताव कसा स्वीकारतील?’’ महामंत्री त्वेषाने म्हणाले.

झालं असं होतं की, राजकुमारीच्या सौंदर्याची, हुशारीची ख्याती अक्राळपर्यंतही पोहोचली होती. त्यात एकदा नगरालगतच्या वनांत राजकुमारी दासीबरोबर फेरफटका मारत असताना अक्राळने राजकुमारीला पाहिलं आणि त्याच क्षणी तो तिच्यावर मोहित झाला. म्हणूनच राजा लढाई हरल्याची संधी साधून अक्राळने असा प्रस्ताव राजापुढे मांडला..

‘‘महाराज, माझं ऐका. अक्राळचा प्रस्ताव स्वीकारा!’’ राजकुमारी विनवू लागली.

‘‘ते शक्य नाही राजकुमारी!’’ महाराज हताश झाले होते. राजकुमारी महाराजांपाशी गेली. त्यांच्या पायांशी बसत तिने त्यांचा हात तिच्या हातात घेतला आणि म्हणाली, ‘‘आपल्या प्रजेच्या हितासाठी हे आपल्याला केलंच पाहिजे. नाही तर अक्राळ आपल्याला कायमच असा त्रास देत राहील. प्रस्ताव मान्य करताना फक्त त्याच्याकडून आठ दिवसांची मुदत मागून घ्या. पुढे काय करायचं ते मी सांगते.’’ अगोदर महाराज तयारच होईनात, पण राजकुमारीच्या मनात काहीतरी चाललंय हे त्यांनी ओळखलं. अखेर त्यांनी राजकुमारीचं म्हणणं मान्य केलं.

महाराजांनी प्रस्ताव मान्य केल्याची बातमी आणि मुदतीची अट अक्राळच्या एका सेवकाकरवी त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. प्रस्ताव मान्य झाल्याच्या खुशीने बेभान झालेल्या अक्राळने मग कसलाही विचार न करता मुदतीची अट लगेचच मान्य केली. अट मान्य केल्याचे समजल्यावर इथे महालात राजकुमारी तडक कामाला लागली. मातीपासून मूर्ती, पणत्या- कंदील- दिवे- दिवलाणी, विविध आकारांची भांडी बनवण्याचा तिला छंद तर होताच, पण या कलेत ती निष्णात होती. महालात ठिकठिकाणी ठेवलेल्या अनेकविध मातीच्या मूर्ती राजकुमारीने स्वत: घडवल्या होत्या. दर वर्षी दिवाळीला राजकुमारीने बनवलेल्या विविध आकारांच्या आणि रंगांच्या असंख्य दिव्यांच्या रोषणाईने अख्खा महाल उजळून निघायचा.

पुढील दोन-तीन दिवसांतच राजकुमारीने नगरातील काही कुंभारांच्या मदतीने मातीच्या असंख्य पणत्या आणि दिवे बनवले. घराघरांतून तिने ते वाटायला सांगितले. एवढंच नव्हे, तर अक्राळ येण्याच्या आदल्या दिवशी प्रत्येक रस्त्या-हमरस्त्यावर, गल्ल्यांतून, देवळांत, डोंगराच्या पायथ्याशी, नदीच्या काठी जिथे जागा मिळेल तिथे थोडय़ा थोडय़ा अंतरावर हे सगळे पणत्या-दिवे मांडून तयार ठेवण्याचे आदेश राजकुमारीने दिले. महालातील सेवक, दासी कामाला लागले. इतर नगरवासीही मदतीला धावून आले.

अक्राळ येण्याच्या आदल्या दिवशी महालाच्या पटांगणात समस्त नगरवासीयांना जमण्यासाठी आदेश देण्यात आले. सगळे आवर्जून उपस्थित राहिले. अक्राळला सामोरं कसं जायचं याचा आराखडा राजकुमारीने त्यावेळी सर्वाना व्यवस्थित समजावला. विचार थोडा वेगळा होता, पण तो ऐकून नगरवासीयांमध्ये त्यामुळे नक्कीच हुरूप आला. निस्तेज झालेल्या तेजपूरच्या नगरवासीयांच्या मनांत आशेचे दिवे तेवू लागले..

अक्राळ नेहमी फक्त रात्री येतो हे आता माहीत असल्यामुळे, आठव्या दिवशी संध्याकाळी अख्खं तेजपूर त्याच्याशी एकहात करायला सज्ज होतं. नगरात सगळीकडे मिट्ट काळोख आणि सामसूम झाल्याझाल्या सगळ्यांना अक्राळच्या येण्याची चाहूल लागली. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून थरकाप होणाऱ्या नगरवासीयांनी आता धीर एकवटला. राजकुमारीने सांगितल्याप्रमाणे पटापट आपापल्या घरचे, देवळातले, गल्ली-रस्त्यांवरचे, डोंगर-पायथ्यापाशी ठेवलेल्या पणत्या, दिवे, दिवलाणी, कंदील नगरवासीयांनी पेटवले. तसंच नदीत पणत्या-दिवे सोडण्यात आले. म्हणता-म्हणता राजमहाल, घरं, देऊळ, नदी, गल्ल्या, रस्ते, डोंगरपायथा दिव्यांच्या प्रकाशात लख्ख उजळून निघाले.

त्या तेजोमय प्रकाशाने अक्राळचे डोळे दिपून गेले आणि त्याने मटकन डोळे बंद केले. त्याने डोळे मिटताच दिव्यांचे असंख्य कंदील नगरवासीयांनी एकाच वेळी आकाशात सोडले. कंदील अक्राळवर आदळत होते, ज्यामुळे त्याला चटके बसू लागले. त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्या उजेडात त्याला काहीच दिसेना. त्याच्या मायावी शक्तीही त्या लख्ख प्रकाशापुढे हतबल झाल्या. तो आता विव्हळू लागला, कण्हू लागला, माफीसाठी गयावया करू लागला. अखेर तेजपूरकडे पुन्हा वाकडय़ा नजरेने न बघता कायमचं तिथून निघून जाण्याच्या वचनावर राजा विक्रमजीतने अक्राळला सोडून दिलं..

अक्राळ निघून गेला. सगळे नगरवासी आनंदाने नाचू-गाऊ लागले. आकाशात आतषबाजी झाली. रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या चकमकीत तेजपूरने अखेर अक्राळवर विजय मिळवला होता. नगरवासीयांचा हा जल्लोष महाराज आणि राजकुमारी राजमहालाच्या गच्चीवरून कौतुकाने पाहत होते.

‘‘राजकुमारी, आज नरकचतुर्दशी. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध याच दिवशी केला आणि आजच अक्राळला तुमच्या चतुराईने आपण हरवलं. आम्हाला जे नाही जमलं ते तुम्ही करून दाखवलंत.’’ महाराज राजकुमारीची पाठ थोपटत म्हणाले. राजकुमारीने विनयाने मान खाली घातली.

‘‘पण ही दिव्या-पणत्यांची युक्ती तुम्हाला सुचली तरी कशी राजकुमारी?’’

‘‘काजव्यांमुळे..’’

‘‘काजवे? आम्ही नाही समजलो!’’

‘‘महाराज, एकदा दासीबरोबर फेरफटका मारायला वनात गेले असताना आम्ही दोघी हरवलो होतो, आठवतंय?’’

‘‘हो! पण त्याचं इथे काय?’’

‘‘संध्याकाळ होत आली होती. अंधार पडला. तेव्हाच अक्राळ नेमका आमच्या मागावर होता.. त्या वेळी अक्राळपासून पाठ सोडवण्यासाठी आम्ही दोघी काही दाटीवाटीने वाढलेल्या झुडपांमध्ये लपून बसलो. त्या झुडपांमध्ये असंख्य काजवे होते. मिट्ट काळोख असतानाही वनातला तेवढा भाग काजव्यांच्या लख्ख पडलेल्या प्रकाशाने उजळून गेला होता. तो उजेड पाहून अक्राळने आमचा पाठलाग करणं सोडून दिलं आणि तो तिथून निघून गेला. त्या प्रकाशात आम्हाला आमचा मार्गही सापडला आणि आम्ही सुखरूप घरी आलो. तेव्हा लक्षात नाही आलं, पण त्याच्याशी कसं लढावं याचा विचार करताना मला तो प्रसंग नेमका आठवला. अक्राळ उजेडाला घाबरतो ते एकदम लक्षात आलं. पहा नं, तो दिवसाढवळ्या कधीच नगरात आला नाही, नगरातले सगळे दिवे मालवले की तो रात्रीच यायचा. महाराज, त्याच्यापासून वाचण्यासाठी तेव्हा लाखो काजव्यांनी मार्ग दाखवला आणि आज या मिणमिणत्या लाखो दिव्यांच्या तेजोमय प्रकाशामुळे अक्राळ पराभूत झाला.’’

‘‘नगरवासीयांच्या निस्तेज झालेल्या मनात तुम्ही पुन्हा विश्वासाच्या ज्योती लावल्यात, राजकुमारी!’’

‘‘महाराज, जेव्हा चहूबाजूंनी अंधकार घेरतो नं, तेव्हा स्वयंप्रकाशी व्हावं लागतं- काजव्यांप्रमाणे! कधीकधी शक्ती कामी नाही आली तर युक्ती येते.’’

‘‘आज खऱ्या अर्थानं आपली दिवाळी साजरी झाली,’’ असं म्हणत महाराज बऱ्याच दिवसांनी मनापासून हसले. त्यांना राजकन्येचा अभिमान वाटत होता.

mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2019 2:28 am

Web Title: diwali balmaifal article abn 97
Next Stories
1 जगा आणि जगू द्या
2 गजाली विज्ञानाच्या : विनाश काले, विपरीत बुद्धी
3 सज्जनपणाचे मोल
Just Now!
X