साहित्य- अ-4 आकाराचा पांढरा कागद, एक किंवा दोन रंगीत कार्ड पेपर (चार्ट पेपर), पट्टी, पेन्सिल, कात्री, पुठ्ठा, डिंक, इ.

कृती- प्रथम अ- 4 आकाराच्या पांढऱ्या कागदावर २६ सेंमी  १८ सेंमी आकाराचा एक आयत काढा. या आयताच्या चारही बाजूंचे मध्यबिंदू काढा. आता हे बिंदू अशा प्रकारे जोडा, की एक शंकरपाळ्याचा आकार (समभुज चौकोन) तयार होईल. हा आकार कापून घ्या. याचा उपयोग करून रंगीत कार्ड पेपरचे ९ आकार तयार करा. (जर तुम्ही दोन रंगांचे कार्ड पेपर वापरणार असाल तर एका पेपरवर ६ आणि दुसऱ्यावर ३ आकार काढा) आता हे सर्व आकार कापून घ्या.

आता पट्टी व पेन्सिलच्या सहाय्याने शंकरपाळ्यांचे एकमेकांसमोरील बिंदू जोडून कर्ण काढा. अर्थात एक कर्ण २६ सेंमी आणि दुसरा १८ सेंमी असेल. हे दोन्ही कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतील. आता या २६ सेंमी कर्णाचे १० समान भाग करायचे आहेत. म्हणजेच एक भाग २.६ सेंमी असेल. या कर्णाच्या दोन्ही टोकांपासून पहिले तीन बिंदू आपल्याला हवे आहेत.

आता एका बाजूच्या तीन बिंदूंमधून वरच्या बाजूला प्रत्येकी एक अशा तीन सरळ रेषा काढा. तर दुसऱ्या बाजूच्या तीन बिंदूंमधून खालच्या बाजूला प्रत्येकी एक अशा तीन सरळ रेषा काढा. हे आकृती क्र. १ प्रमाणे दिसेल.

आता दोन्ही बाजूच्या  १, २ आणि ३ क्रमांकाच्या रेषांवर कात्रीने छेद द्या. याच पद्धतीने उरलेले आठ आकार तयार करून घ्या. आकृती क्र. १ मध्ये दाखवलेल्या दोन्ही बाजूंच्या ३ क्रमांकाच्या खाचा एकमेकांमध्ये अडकवायच्या आहेत. हे आकृती क्र. २ प्रमाणे दिसेल. अशाच पद्धतीने सर्व पाकळ्या तयार करून घ्या. आता हे जोडण्यास सुरुवात करूया. एका पाकळीची दोन क्रमांकाची वरची खाच दुसऱ्या पाकळीच्या दोन क्रमांकाच्या खालच्या खाचेत अडकवा. अशा प्रकारे सर्व पाकळ्या एकापुढे एक अडकवा.

हे आकृती क्र. ३ प्रमाणे दिसेल.

आणि शेवटी दोन्ही कडेच्या पाकळ्या एकमेकांत अडकवून पाकळ्यांचे वर्तुळ तयार करा. आता बाहेरील बाजूस असलेल्या सर्व एक क्रमांकाच्या खाचा त्याच्या जवळच्या एक क्रमांकाच्याच खाचेत अडकवा. हे अनुक्रमे आकृती क्र. ४ आणि ५ प्रमाणे दिसेल.

आता पुठ्ठयावर ८.५ सेंमी व्यासाची दोन वर्तुळे काढून ती कापून घ्या. या आकाशकंदिलामध्ये तुम्ही ज्या आकाराचा बल्ब लावणार आहात तो या दोन्ही वर्तुळांमधून जाईल एवढय़ा आकाराचे वर्तुळ या पुठ्ठय़ांच्या मध्यभागात काढा आणि ते कापून टाका. म्हणजे दोन रिंगा तयार होतील. या दोन्ही रिंगा एकमेकांवर ठेवून चिकटवून घ्या. (आकृती क्र. ६) आता या रिंगच्या बाहेरच्या कडांना डिंक लावून ही रिंग अलगद आकाशकंदिलाच्या आत सरकवा. (आकृती क्र.७)

आकाशकंदील अडकवण्यासाठी याला योग्य ठिकाणी दोरा बांधा.  झाला आपला आकाशकंदील तयार!

मनाली रानडे – manaliranade84@gmail.com