आत्तापर्यंत पाहिलेला चित्रातील प्रकाशाचा प्रवास हा एका चित्रविषयाला धरून होता. पण आता चित्रमाध्यमच विषय झाला आहे. म्हणजे प्रकाशाचेच सादरीकरण! सोप्या भाषेत सांगायचं तर दिवाळीत फुलबाज्या (सुरसुरी) पेटवल्यावर आपण गोल गोल फिरवतो किंवा काही अक्षर काढतो त्यावेळी प्रकाशाच्या रेषा दिसतात. तो प्रकाश बघणं सुखदायक किंवा आश्चर्यकारक असतं. अशी ही ‘लाइट आर्ट’ची छायाचित्रं पाहू या. प्रकाश आणि त्याचा आकार यांचा वेगळा अनुभव देणारी प्रकाशचित्रं प्रदर्शनात मांडली जाऊ लागली आहेत.

आता वेगवेगळ्या लाइट्स येऊ  लागल्या तसा त्यांचा वापर दृश्यकलेत कल्पकतेने केला गेला.  यातून पुन्हा प्रकाश आणि त्यातून समजेल असा दृश्य आविष्कार निर्माण करण्याकडे कल वाढला. ही कलाकृती फक्त प्रदर्शनात न येता रस्त्यावर-लोकांमध्ये स्थिरावली. त्याला इन्स्टलेशन किंवा प्रकाश-मांडणीशिल्प म्हणू शकतो.

मग यातील संकल्पना उचलून प्रकाशचित्रकारांनी शहरातील वास्तू, ठिकाणे, कोपरे यांचा वापर कला व उपयोग यांच्यासाठी केला. इतकंच नाही तर अनेकदा नृत्य/नाच करताना या प्रकाशाचा अनुभव दिला गेला. आपण बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये हे पाहात असतो.

दिव्यांसोबतच फटाक्यांचा वापर करून दृश्य अनुभव देण्याची कला अधिक आकर्षक होऊ  लागली. परंतु ही प्रत्यक्ष किंवा फोटोतच पाहायला मिळते.

चीनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये फटाक्यांची आतषबाजी यूटय़ूबवर पाहता येईल. त्या मानाने आपल्या इथे कसेही फटाके उडवले जातात.

सतत विविधरंगी अनुभव देणारी आतिषबाजी करण्यासाठी  प्रचंड प्रमाणावर फटाके समुद्रात मोठय़ा तरंगत्या जेट्टी/ फलाट / डेकवर लावले जातात. त्यावेळी समुद्रात आजूबाजूला इतर बोटी नसतात आणि या ठिकाणी एकही माणूस नसतो. संगणकाच्या मदतीने प्रत्येक संचाचा वेळ सेट केला जातो. फटाक्यांची सुरावट करणारा हा डीजे आपला प्रोग्रॅम सुरूकरत लोकांना भन्नाट अनुभव देतो. हे एकदा सुरू झालं की थांबवता येत नाही. (या वेळी पर्यावरणाचा विचार बिचार न करता आनंद घ्यायचा असतो.)

या फटाक्यांची मजा सतत घ्यायची असेल तर याचा फोटो काढून ठेवता येतो. पण आपलं भान हरपून गेलं की फोटो काढायचा विसर पडतो. किंवा जो आनंद डोळ्यांनी मिळतो तो कॅमेऱ्यात पाहात मिळत नाही.

अशा वेळी आपण चित्र काढून हा अनुभव पुन्हा मिळवू शकतो. काही चित्रं इथे देत आहे. काही चित्रकारांनी काढलेली तर काही तुमच्यासारख्या मुलांनी काढलेली. या प्रकारे किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही चित्रे काढून आम्हाला पाठवा.

दिव्याचा झगमगाट लांबून फार साजरा वाटतो, पण जवळून पाहिल्यास कदाचित चित्र वेगळं असू  शकतं.

आपण दिवाळीत प्रकाशाकडे कलात्मक नजरेने पाहात धमाल करायला खूप फटाके उडवू, रोषणाई करू, घर उजळून टाकू, शुभेच्छांचे मेसेज पाठवू, टीव्हीवर ठीकठिकाणी होणारा जल्लोष पाहू. प्रकाशाने न्हाऊन निघालेल्या आपल्या परिसरात कुठे अंधार राहणार नाही याची काळजी घेऊ.

(उत्तरार्ध)

chitrapatang@gmail.com