मुलांनो, दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञान, आळस, अस्वच्छता, अनीती, अंधश्रद्धा यांच्या अंधारालाही दूर करणारा हा उत्सव आहे. म्हणून ज्ञान, उद्योगीपणा, स्वच्छता, नीतिमत्ता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्राप्त करून देणाऱ्या दिव्याला प्रथम आपण नमस्कार करू या. दीपावली हा सण सर्व सणांचा राजा समजला जातो.

आपल्या भारतीय कृषीप्रधान संस्कृतीमध्ये सर्वच सण-उत्सव हे ऋतू आणि शेतीवर आधारलेले आहेत. या शरद ऋ तूमध्ये शेतात तयार झालेले धान्य घरात आलेले असते. त्यामुळे प्राचीन कालापासून दीपावलीचा सण मोठय़ा आनंदात साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे पाचही दिवस खूप आनंदाचे असतात.

लक्ष्मीकुबेर पूजन

अश्विन अमावास्या म्हणजे लक्ष्मी-कुबेर पूजनाचा दिवस! या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लक्ष्मीपूजनाच्या वेळी नवीन वर्षांच्या हिशेबाच्या वह्य़ांची पूजा करतात.

मुलांनो, लक्ष्मी हा शब्द ‘लक्ष्म’ म्हणजे चिन्ह यावरून बनलेला आहे. लक्ष्मीला ‘श्री’ किंवा ‘मा’ असेही म्हटले जाते. ‘श्री’ हे अक्षर स्वस्तिकापासून  बनले आहे. म्हणून लक्ष्मीचे जे ‘लक्ष्म’ म्हणजेच ‘चिन्ह’ हे स्वस्तिकच मानले जाते. श्री किंवा लक्ष्मी ही सध्या एकाच देवीची म्हणजे विष्णूच्या पत्नीची नावे प्रचारात आहेत. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची आठ रूपे सांगण्यात आलेली आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी लक्ष्मीची आठ रूपे पूजनीय आहेत.

लक्ष्मीला स्वस्तिक, कमळ, हत्ती, सुवर्ण आणि बिल्व फळ या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. कमळ चिखलात फुलते. पण तरीही ते अतिशय पवित्र, निरागस, प्रसन्न असते. हत्ती हा बुद्धिवान प्राणी आहे. तो शाकाहारी आहे. ऋ ग्वेदातील श्रीसूक्तात हस्तिनाद प्रबोधिनीम म्हणजे लक्ष्मी ही हत्तीच्या चीत्कारांनी जागी होते, असे वर्णन केलेले आहे. लक्ष्मी सोन्यारूप्यांच्या माळा गळ्यात घालते. शरद ऋ तूमध्ये शेतात धान्य तयार झाले असताना पिवळे शेत सूर्यप्रकाशाने सोन्यासारखे चमकदार दिसत असते. लक्ष्मीचे वर्णनही संपन्नता, समृद्धता, समाधान देणारी असे श्रीसूक्तात वर्णन आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासाची जागा शोधत असते. ज्या घरात, ज्या वास्तूत स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असते त्या ठिकाणी ती आकर्षित होते. जेथे चारित्र्यवान उद्योगी, कर्तव्यदक्षता, संयमी, सदाचारी, दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारी, क्षमाशील माणसे असतात त्या घरात राहणं तिला आवडतं. म्हणून मुलांनो, आपणही आपलं घर, घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ, प्रसन्न ठेवला पाहिजे. आपल्या घरातही सर्व माणसांनी आपल्या चारित्र्याला जपलं पाहिजे. संयम, कर्तव्यतत्परता, सदाचार, प्रामाणिकपणा, सत्यप्रियता, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती ज्या ठिकाणी असते, त्या घरात लक्ष्मी दीर्घकाळ वास्तव्य करते. म्हणून आपण सर्वानी हे सर्व गुण लहानपणापासून आपल्या अंगी बाणवायला पाहिजेत.

लक्ष्मी नेहमी प्रयत्नाच्या ठिकाणी राहते. ‘उद्योगे श्री प्रतिवसति’ उद्योगशील माणसाकडेच लक्ष्मी राहत असते. म्हणून आपण आळस, बेफिकीर वृत्ती टाळून सतत मेहनत केली पाहिजे. आपण प्रामाणिकपणे मन लावून अभ्यास केला की आपणास यशलक्ष्मी प्रसन्न होते.

अलक्ष्मी निस्सारण

लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण आहे. केरकचरा,  अस्वच्छता, कलह, असत्य बोलणे, देव, मुले, माता- पिता यांचा अनादर असेल, परद्रव्य हरण केले जात असेल, सज्जनाची निंदा केली जात असेल त्या ठिकाणी अलक्ष्मी राहते. अलक्ष्मीच्या हातात झाडू हे शस्त्र असते. अलक्ष्मी दुर्भाग्याची- अपयशाची प्रतीक आहे. ती आपल्या घरातून निघून जावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते.

फटाके नकोतच!

मुलांनो, तुम्ही फटाके न वाजविण्याची प्रतिज्ञा केलेलीच आहे. फटाक्यांच्या आवाजाचा किती त्रास होत असतो! फटाके वाजविल्याने ध्वनिप्रदूषण होते. फटाक्यांच्या विषारी वायूंमुळे वायुप्रदूषण होते. हे सर्व टाळलेच पाहिजे. तुम्ही मुलांनी फटाके वाजवायचे नाहीत असे ठरविल्याने तुम्हाला सर्वानी शाबासकी दिली असेल. फटाक्यांचे पैसे वाचवून आपण पुस्तके खरेदी करू शकतो. पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर पडेल किंवा तेच पैसे गरिबांना देऊन त्यांच्या आयुष्यात आपणास आनंद निर्माण करता येऊ शकतो. त्यामुळे आपण इतरांनाही फटाके वाजवू नका असे सांगू शकतो.

आपण दीपावलीचा आनंद घेऊयाच, शिवाय इतरांच्या जीवनातही आनंदाची बाग फुलविण्याचा प्रयत्न करू या.