प्राची बोकिल prachibokil@yahoo.com

‘‘आई, मी खालती जाऊन.. आऽऽऽईऽऽऽगऽऽऽ..’’ प्रीताचा पाय सटकला आणि ती जिन्यावरून पडली.

..दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रीता खोलीत पुस्तक वाचत बसली होती. तिच्या गुडघ्यापासून पायाला प्लास्टर बांधलं होतं. वेळ घालवायला म्हणून बाबांनी तिला ऑफिसला जायच्या आधी आकाशकंदील बनवायला पिवळे, गुलबक्षी रंगाचे कागद आणून दिले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या तिने करंज्या आणि शेपटय़ा करून तयार ठेवल्या होत्या. बाबा ऑफिसातून आल्यावर दोघे मिळून आकाशकंदील पूर्ण करणार होते.

..एव्हाना ती पुस्तकात पार गढून गेली होती. इतक्यात पाठीमागून तिच्या खांद्यावर कुणीतरी थोपटलं. प्रीताने दचकून मागे पाहिलं तर तिच्या खोलीत तरंगत होती एक लहानशी, सुंदरशी परी! आत्ताच वाचत असलेल्या गोष्टीतली ‘गिनी परी’! प्रीताने पुन्हा पुस्तकाकडे पाहिलं. पुस्तकांतून गिनी परीचं चित्र गायब होतं.

‘‘तू पुस्तकातून बाहेर कशी आलीस?’’ प्रीताने आश्चर्यचकित होऊन विचारलं.

‘‘जादूऽऽऽ!’’ गिनी परी तिचे पाठीवरचे पंख हलवत म्हणाली.

‘‘तुला कुणी पाहिलं नाही नं?’’

‘‘कोण पाहणार? तूच तर आहेस इथे.’’

‘‘गिनी, तुझ्या जादूने माझा पाय बरा कर नं!’’

‘‘ए, असं काही मी नाही गं करू शकत.’’

‘‘हात्तेरिकी! या फ्रॅक्चरमुळे मला कुठेच जाता येत नाहीये. दिवाळीची काय काय मज्जा करत असतील माझे मित्र-मत्रिणी! मी सगळंच मिस करतेय.’’

‘‘हां! ते मी तुला इथे बसल्या बसल्या दाखवलं तर?’’

‘‘कसं?’’

गिनीने गोष्टीचं पुस्तक घेतलं. तिच्या उजव्या हाताचं पहिलं बोट गोलाकार फिरवलं. एक ठिपक्याएवढा प्रकाश पुस्तकाच्या एका पानावर पडला. मग गिनीने एक मंत्र उच्चारला- ‘‘ठिक्कर-ठिकरी-अलटन-पलटन, प्रीताची आई दाखव पटकन्.’’ आणि एकदम स्वयंपाकघर दिसायला लागलं. तिथे तिची आई चकल्या तळत होती. बाजूला मोठय़ा पातेल्यात प्रीताला आवडणारा चिवडा तयार होता. ते दृश्य पाहून प्रीता अवाक् झाली.

‘‘आहाहा! दुपारपासून या पदार्थाचा नुसता घमघमाट सुटलाय!’’ ती सावरत म्हणाली.

‘‘मग? आहे की नाही जादू?’’ गिनीने दृश्य गायब केलं.

‘‘गिनी, हे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप किंवा स्काईप कॉलसारखं झालं. आणि हे पुस्तक म्हणजे स्मार्टफोन!’’ प्रीताच्या चेहऱ्यावर ‘यात काय नवीन’ चा आविर्भाव होता.

‘‘अगं हो! पण त्यासाठी समोरच्याला तो कॉल ‘अ‍ॅक्सेप्ट’ करावा लागतो. तेव्हाच दृश्य दिसतं. इथे त्यांच्या नकळत तुला पाहता येईल की, तुझे मित्र-मत्रिणी दिवाळीला काय काय करताहेत ते.’’ प्रीताला मुद्दा पटला.

‘‘गिनी, आधी माझी बेस्ट फ्रेंड मीरा काय करतेय बघू या?’’

‘‘प्रीता, हे आपलं टॉप-सीक्रेट आहे. कुणाला सांगायचं नाही. डन?’’

‘‘डन-डना-डन-डन!’’ गिनीने केलेल्या थम्सअपला प्रीतानेही थम्सअप करून दुजोरा दिला.

गिनीने मग तिच्या हाताचं बोट गोलाकार फिरवलं आणि तो जादुई मंत्र उच्चारला :

‘‘ठिक्कर-ठिकरी-अलटन-पलटन, मीरा काय करतेय दाखव पटकन.’’

मीरा घराबाहेरच्या व्हरांडय़ात रांगोळी काढत बसली होती. गेरू सारवून तिने त्याच्यावर पिसारा फुलवलेला सुंदर मोर काढला होता. निळ्या-हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स एका मलमलच्या कापडातून गाळून ती अगदी नेटकेपणाने योग्य जागांमध्ये भरत होती. रांगोळी जवळपास पूर्ण झाली होती.

एवढय़ात मीराची आई तिथे आली. तिच्या हातात फोन होता.

‘‘मीरा, बाबा येणारेत महिन्याभराची सुट्टी घेऊन, पण दिवाळीनंतर!’’ मीराचा चेहरा एकदम खुलला. तिच्या बाबांची गेली दोन वर्ष बॉर्डरवर पोिस्टग होती.

‘‘बेटा, तुझ्या सगळ्या मित्र-मत्रिणींचे बाबा नेहमी त्यांच्याजवळ असतात, पण आपले नाहीत. वाईट वाटतं नं?’’

‘‘वाटतं. पण ते देशाची सेवा करताहेत. ते येतील तेव्हा आपली खरी दिवाळी!’’ मीराच्या आईने तिला जवळ घेतलं. प्रीता आणि गिनीच्या डोळ्यांत टचकन् पाणी तरळलं. सीरियस झालेल्या त्या वातावरणात अमोघच्या आवाजाने भंग पाडला.

‘‘ए मीरा, बास झाली आता तुझी रांगोळी. खाली ये पटकन्!’’

‘‘हा आवाज म्हणजे आमच्या किल्ला चॅम्पियन अमोघचा. मीराच्या बिल्डिंगमध्ये तिच्या खालच्या मजल्यावरच राहतो. बेट लाव, त्याचा किल्ला करणं सुरू असणार. परीक्षा संपल्यावर तो आधी किल्ला बनवायला घेतो. कुणाचं काय वेड असेल!’’ प्रीता डोक्याला हात लावत म्हणाली.

‘‘आणि कुणाचं परिकथांमध्ये रमण्याचं!’’ प्रीताने हसत जीभ चावली.

‘‘गिनी, तुला अमोघने बनवलेला किल्ला दाखवता येईल?’’

गिनीने पुन्हा बोट गोलाकार फिरवलं आणि तो जादुई मंत्र उच्चारला :

‘‘ठिक्कर-ठिकरी-अलटन-पलटन,

अमोघचा किल्ला दाखव पटकन्.’’

प्रीता म्हणाल्याप्रमाणे अमोघच्या घराच्या बाल्कनीमध्ये किल्ला नुकताच बनून तयार होता. आरव, ईशान, रिया आणि अथर्व त्याच्या मदतीला तिथे जमले होते. मीराही आली. अमोघने त्याच्या दादाला बोलावलं. किल्ल्याचं फोटो-सेशन झालं, सेल्फी काढले.

‘‘दादा, हे फोटो प्रीताच्या आईच्या मोबाइलवर पाठव नं! प्रीता हे सगळं मिस करतेय.’’ अमोघ म्हणाला.

‘‘दादा, माझ्या रांगोळीचापण फोटो! आणि तो प्रीतालाही पाठव. बाबा आल्यावर त्यांना पण दाखवायचाय.’’ मीरा म्हणाली.

‘‘ओक्के! पण आत्ता कनेक्टीव्हिटी नाहीये. थोडय़ा वेळाने नक्की पाठवतो.’’ दादा आश्वासन देत घरात गेला आणि एक पिशवी घेऊन पुन्हा बाल्कनीत आला.

‘‘ढॅण-टॅ-ढॅण!’’ दादाने आणलेल्या पिशवीत भरपूर फटाके होते.

‘‘पण आवाजाचे नाहीत नं?’’

-इति अमोघ.

‘‘नाही रे बाबा!’’ दादाने अमोघच्या डोक्यावर टप्पू दिला. सगळी मंडळी मग फटाके पाहायला पिशवीवर तुटून पडली.

इतक्यात प्रीताच्या आईचा फोन वाजल्याने प्रीता आणि गिनी दचकल्या. आईच्या बोलण्यावरून तो फोन त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या कांता मावशीचा होता.

‘‘ए गिनी, कांता मावशीकडली दिवाळी कशी असेल गं? बघू या?’’ प्रीताला एकदम सुचलं.

गिनीने परत बोट गोलाकार फिरवलं आणि तो जादुई मंत्र उच्चारला :

‘‘ठिक्कर-ठिकरी-अलटन-पलटन,

कांता मावशीचं घर दाखव पटकन्.’’

कांता मावशी त्यांच्या सोसायटीला लागूनच असलेल्या झोपडवस्तीत राहायची. त्या पत्र्याच्या घराच्या दरवाजाबाहेर कांता मावशीचा मुलगा बालाजी खाट टाकून आकाशकंदील बनवत बसला होता.

अनेक रंगीबेरंगी पारंपरिक षटकोनी आकाशकंदील त्याने कपडे वाळत घालायच्या दोरीला टांगले होते.

कांता मावशी नुकतीच कामं संपवून घरी आली होती. तिने वाती केल्या. दोन पणत्यांमध्ये तेल-वाती घातल्या. पणत्या लावल्या आणि दरवाजाच्या एकेक बाजूस ठेवल्या. मग दरवाजाबाहेर पत्र्याच्या छपराला टांगलेल्या आकाशकंदीलाच्या दिव्याचं बटन तिने चालू केलं आणि तिची ती झोपडीवजा खोली एकदम उजळून निघाली.

‘‘कसा दिसतोय आकाशकंदील?’’ बालाजीने उत्साहाने विचारलं.

‘‘तू बनवला म्हंजी छानच हाये!’’

‘‘आये, आकाशकंदील विकून मिळालेल्या पशांतून ताईला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून छानपैकी साडी घेईन.’

‘‘तुला बी घेकी एखादा शर्ट. हा शर्ट बघ किती फाटलाय! दिवाळी मिळालीये मला.’’

‘‘ते राहूदे! ताईचं लगीन तोंडावर आलंय. पसं जमवाया हवेत. शर्टाचं बघू नंतर.’’ बालाजीचं बोलणं ऐकून प्रीताला त्याचं खूप कौतुक वाटलं.

‘‘गिनी, थॅंक यू! आज तुझ्यामुळे मला सगळ्यांच्या घरची वेगळी वेगळी दिवाळी पाहायला मिळतेय.. एका कलिडोस्कोपसारखी!’’

गिनी काही म्हणणार इतक्यात मीरा खोलीत धाडकन् शिरली. प्रीता एकदम गडबडलीच.

‘‘हाय, मीरा! मला बेल नाही ऐकू आली.’’

‘‘वाजवली की! त्याशिवाय घरात कशी येईन? अरेव्वा! अर्धा आकाशकंदील तयार?’’ मीरा एका चाळणीत ठेवलेल्या करंज्या आणि शेपटय़ा पाहून म्हणाली.

‘‘हो! मीरा, मोर एकदम क्लासिक आलाय. अरे, अमोघ? तूही?’’ प्रीताचा आश्चर्यचकित स्वर.

‘‘आम्ही सगळेच आलोय.’’ अमोघ खोलीत शिरत म्हणाला. एव्हाना प्रीताचं अख्खं मित्रमंडळ तिच्या खोलीत अवतरलं होतं.

‘‘अमोघ, या वेळचा मुरुड-जंजिरा एकदम झक्कास!’’

‘‘अरेव्वा! दादाने फोटो अपलोड केलेले दिसताहेत!’’ अमोघ म्हणाला. प्रीताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

‘‘प्रीता, यंदा माझ्या बाबांच्या बँकेत आकाशकंदीलांची ऑर्डर तुमच्या कांता मावशीच्या मुलाकडे दिलीये!’’ -इति अमोघ.

‘‘बरं झालं! त्याला पशांची गरज आहे आणि त्याने आकाशकंदीलही ए-वन बनवलेत.’’ प्रीता बोलून गेली.

‘‘पाहिलेस तू?’’ मीराचा स्वाभाविक प्रश्न. प्रीताला काय म्हणावं सुचेना, पण आई सगळ्यांसाठी फराळ घेऊन आल्यामुळे विषय बदलला. प्रीताने हळूच हातातल्या पुस्तकाकडे पाहिलं. गिनीचे डोळे लुकलुकत होते..