सूर्य व अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा िहदू धर्मात पवित्र व शुभ मानलेला आहे. ‘दिव्या दिव्या दीपत्कार’ असे म्हणून संध्याकाळी दिवा लावल्यावर त्याला नमस्कार करतात. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात दिवे लावून करण्यात येते. रंगीबेरंगी आकाशकंदील लावून दीपावलीचा सण साजरा केला जातो. दिव्यांचा झगमगाट आणि प्रकाशाचा लखलखाट यामुळे सारा आसमंत प्रसन्न, सुंदर होऊन जातो. विजेचा शोध लागण्यापूर्वी प्रकाशयोजनेसाठी वापरले जाणारे दिवे हा आपल्या आजच्या कोडय़ाचा विषय आहे. तुम्हाला दिव्यांची वैशिष्टय़े दिलेली आहेत. त्यावरून तुम्हाला दिव्याचे नाव ओळखायचे आहे.

१. टिनच्या डब्यात किंवा काचेच्या बाटलीत वात घालून तयार केलेला रॉकेलचा दिवा.
२. धातूचा, उभ्या आकाराचा व एकावेळी अनेक वाती लावता येणारा दिवा. या दीपाचे प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाते.
३. काठीच्या एका टोकास चिंध्या गुंडाळून तेलात बुडवून पेटवितात. चुडी, टेंभा, पोत, दिवटी, पलिता, काकडा, हिलाल इत्यादी नावांनीही ओळखली जाते.
४. मातीचा, अध्र्या पात्रासारखा आकार असलेला तेलाचा छोटा दिवा.
५. डमरूसारखा आकार असलेला देवापुढे लावायचा फुलवातीचा दिवा.
६. पाच वातींचा ओवाळायचा दिवा.
७. ज्योतीच्या भोवती असलेल्या काचेमुळे, वाऱ्यापावसाने न विझणारा आणि टांगता येणारा किंवा हातात धरून नेता येणारा रॉकेलचा दिवा.
८. छताला टांगायच्या काचेच्या या दिव्याला दिवाणखान्यात, देवळाच्या सभामंडपांत मानाचे स्थान.
९. अनेक छोटे छोटे दिवे एकत्र असलेला, श्रीमंतांच्या दिवाणखान्याच्या छताची शोभा वाढविणारा, शोभिवंत काचांनी मढविलेला दिवा.
१०. मिरवणुकीत, भाजीबाजारांमध्ये अजूनही वापरला जाणारा दिवा. यास गॅसबत्ती असेही म्हणतात.
११. वातीभोवती मेणाचे आच्छादन केलेला दिवा. वाढदिवसाच्या केकवरसुद्धा हा लावला जातो.
१२. साखळी असलेला धातूचा, देवापुढे टांगायचा दिवा.
१३. समुद्रात धोक्याची सूचना देऊन जहाजांना दिशा दाखवणारा दिवा.
१४. वधू-वरांना ओवाळण्यासाठी असलेला करवल्यांच्या हातातील दिवा.
१५. देवापुढे अहोरात्र, अखंड तेवत राहणारा दिवा, अक्षरदीप.

उत्तरे :
१) चिमणी २) समई ३) मशाल ४) पणती ५) निरांजन ६) पंचारती ७) कंदील ८) हंडी  ९) झुंबर १०) पेट्रोमॅक्स दिवे ११) मेणबत्ती १२) लामणदिवा १३) दीपस्तंभ १४) शकुन दिवा १५) नंदादीप.