News Flash

बदका बदका, भांड रे..

कार्टूनगाथा

|| श्रीनिवास बाळकृष्णन

मिकी माऊसच्या जिवलग मित्रांमधला महत्त्वाचा आणि लोकप्रिय बदक म्हणजे डोनाल्ड! डोनाल्ड ट्रम्प नाही.. डोनाल्ड डक! दिसायला आणि चिडखोर स्वभावात थोडेफार सारखेच असले तरी आपला डोनाल्ड हा क्यूट डक आहे. मित्र असला तरी तो मिकीवर आतून थोडा जळत असतो.  त्याचा जन्म १९३० चा, पण करिअरला सुरुवात झाली ती १९३४ व्या वर्षी.. आतापासून ८५ वर्ष मागे.

पिवळी चोच, पिवळे पाय असा हा पांढराशुभ्र बदक आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतो, अगदी तसाच!

बदकाचे कार्टुनीकरण आपल्याला जाम आवडलं. कारण सिम्पल आहे, डिस्नेच्या सर्व कार्टूनसारखा हा माणसासारखं वागतो खरा. पण दिसायला ते बदक ते बदकच राहतं.

म्हणजे त्याचे पाय बुटात नसतात. पक्ष्याचे पंख म्हणजे त्याचे हात, तसंच याचेही, पंखाला पुढं असलेली ३-४ पिसांची बोटं! त्यानेच सर्व कामं लीलया करतो. त्याचा आवाज म्हणजे सेम बदकासारखा, मोठय़ांना काही केल्या जाम कळत नाही.

डोक्यावर नेव्ही टोपी.. अंगात नेव्हीचा शर्ट आणि खाली.. असाच.. नो चड्डी.. हे खासच!

त्याच्या नेव्हीच्या शर्टचं रहस्य महित्येय का?

तो बदक आहे- पाण्यात पोहू शकतो म्हणून काय नेव्हीचा गणवेश मिळत नाही हो! तर कधी काळी हे डोनाल्ड साहेब एका युद्धनौकेवर कामाला होते. त्याची एकूण कामगिरी पाहून त्याला जनरल अ‍ॅडमिरलने खूप महत्त्वाची कामगिरी दिली. जसं की, टॉयलेट चकाचक करणं, बाथरूम, जहाजाचा लांबलचक डेक साफ करणं वगैरे. त्यातही हा इतका गोंधळ घालतो की विचारू नका!

इथं शहरात मात्र आपल्या पुतण्यांसमोर छाती फुगवून युद्धपराक्रमाच्या या बाता मारत असतो.

एक सांगायचं राहूनच गेलं, याला लुई, डुई, हुई असे पुतणे आहेत. स्क्रुज मॅकडक हा अफाट श्रीमंत काका आहे. डेझी नावाची मत्रीणही आहे. तिथं हा जाम शांत, सुस्वभावी असतो. पण चिप आणि डेल या खारी दिसल्या की याचं टाळकं फिरतं.

मला तर हा तुमच्यासारखाच वाटतो. स्वत:त मस्त जगणारा, स्वत:ची बढाई मारणारा, आवडीची कामे कटकटीची झाल्याबरोबर अर्धवट सोडून देणारा, इतरांना कठीण वाटणाऱ्या कामात स्वत: काहीतरी करून दाखवणारा, रोजच सुट्टी असल्यासारखा आराम करणारा, निवांतपणे स्वत:च्या आवडीचे काम करणारा..अशी व्यक्तिमत्त्वाची मिसळ असलेला डोनाल्ड!

पण मध्येच कोणीतरी याच्या वाटेला जाते- भूत, शार्क, खारूताई, मधमाशी, मुंगी, बकऱ्या, पतंग.. असं काहीही याच्या डोक्यात जातं. मग हा भाई कामधाम सोडून त्याच्याच मागे लागतो.

आणि बरेचदा याचा शेवट डोनाल्डसाठी चांगला नसतो.

पण जेव्हा जेव्हा याच्याकडून चूक होते तेव्हा याला खूपच वाईट वाटून जातं. खरे तर त्याला लोकांची फक्त मस्करीही करायची असते. त्याची कुस्करी झाल्यावर मात्र एकदम गुडघ्यावर वगैरे येत क्षमा मागतो.

डोनाल्ड मुळात अमेरिकन असला तरी युरोपातही प्रसिद्ध होता. डोनाल्ड ब्रॅडमन या प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची उद्धट वर्तणूक पाहून वॉल्ट डिस्ने यांनी या कार्टून बदकाचे नाव डोनाल्ड ठेवले. क्लेरेन्स नॅश यांनी त्याला वैशिष्टय़पूर्ण आवाज दिला. हा अनेक कॉमिक पुस्तकात आला. एकटय़ाचे १५० हून अधिक सिनेमे आहेत. त्यातील काहींना अकॅडमी अवॉर्ड्सही मिळाली आहेत.

साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डोनाल्ड सनिकांमध्ये प्रसिद्ध झाला. अमेरिकन आर्मी, हवाई, पोलीस, ३०९ फायटर स्क्वार्डन, अमेरिकन कोस्ट गार्ड ओक्झिलरी, ४३८ लढाऊ स्क्वार्डन, ४७९-५३१ बॉम्बर्डमेंट स्क्वार्डन, मरिन एअर कॉर्पस हवाई स्थानक, एल टोरो, वायुसेनेचा अग्निशमन विभाग, ३१९ विमान व्यवस्थापन अशा अनेकानेक ठिकाणी मॅस्कॉट म्हणून वापरला गेला. त्याचा हिटलर द्वेष कॉमिकमधून आला. त्याची वास्तवातील एकूण कामगिरी बघून अमेरिकन सन्याने त्याला परेडमध्येही स्थान दिले.

दुसऱ्या महायुद्धानंतरच खरे तर तो थोडा रागिष्ट व चिडचिडा बनला. कार्टून असला तरी तो पोस्ट-ट्रमॅटिक प्रकारच्या तणावाखाली गेला.. युद्धाचे परिणाम फार भयंकर हो!

त्याने वयाच्या ८२ व्या वर्षांपर्यंत (२०१६) काम केलं. मुला-मोठय़ांना हसवत राहिला. आताही डिस्ने वर्ल्डद्वारे डोनाल्डवरची एक सुंदर जाहिरात आपण पाहत असाल. एक खऱ्या बदकाचे पिलू डोनाल्डवर फुलटू फिदा असतं.. डायहार्ट फॅन! अखेर जाहिरातीत कार्टूनमधल्या डोनाल्डची भेट होतेच. ज्या ज्या पिढीने लहानपणी  डिस्नेची कार्टून्स पाहिली त्यांनीदेखील असाच जीव टाकला हो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2019 12:23 pm

Web Title: donald duck
Next Stories
1 आजीची दुलई
2 थेंबे थेंबे तळे साचे!
3 चित्रकलेचा छंद जोपासताना..
Just Now!
X