‘‘आभा, मी आता शेवटचं उठवतेय तुला. परत उठवायला नाही येणार!’’ सकाळपासून आई तिसऱ्यांदा आभाला उठवायला आली होती. सुट्टी असल्यामुळे आभा सकाळी नऊ-नऊ वाजेपर्यंत पलंगात लोळत पडायची आणि आईला ते मुळीच आवडायचं नाही.
आईचा परत ओरडा नको म्हणून आभा कशीबशी उठली आणि स्वत:ला ओढतच बाथरूममध्ये गेली, अंथरूण तसंच टाकून. ती बाहेर आल्याचं समजताच आई स्वयंपाकघरातून ओरडली, ‘‘आभा, अंथरुणाच्या घडय़ा घातल्यास का?’ आळोखेपिळोखे देत आभाने वैतागतच अंथरुणाची कशीबशी घडी घातली आणि ते कोपऱ्यात भिरकावून ती बाहेर आली. डायिनग टेबलावर आईने दुधाचा ग्लास झाकून ठेवला होता. दूध आवडत असल्यामुळे तिने घटाघट दूध प्यायलं.
‘‘आभा, ग्लास बेसिनमध्ये ठेवलास का?’’ केर काढत आईनं विचारलं. सकाळ सकाळ आईच्या सारख्या सूचना ऐकून आभा एकदम चिडली.
‘‘हे काय गं आई, सारखं सारखं कामाला काय लावतेस? सुट्टी आहे नं माझी!’’
‘‘आपल्या हाताला काही तरी सवयी आहेत का आभा? इकडची काडी तिकडे करत नाहीस तू! सगळं हातात आणून दिलं पाहिजे तुझ्या! आणि सुट्टी आहे म्हणून बेताल वागायचं, हे कुणी सांगितलं? सकाळी लवकर उठावं, खेळायला जावं, काही तरी नवीन शिकावं. एवढा छान वेळ मिळाला आहे सुट्टीचा, त्याचा चांगला उपयोग नको का करायला? गेला महिनाभर पाहतेय तुझं. एक तर उशिरा उठायचं, नाही तर नुसतं लोळायचं, कॉम्प्युटरवर गेम्स खेळायचे किंवा मग कार्टून्स बघत बसायचं दिवसभर!’’ आई कुंचा ठेवत म्हणाली.
‘‘काय गं! एरवी मॉìनग स्कूलसाठी उठतेच नं मी सहा वाजता? आणि एवढा टी. व्ही. तू शाळा असताना बघून देतेस का मला? परत सुट्टीत काय तुझं?’’ आभा कुरकुरली.
‘‘अगं हो, पण सात-साडेसातपर्यंत तरी ऊठ. हे काय नऊ-नऊ वाजेपर्यंत लोळत पडायचं!’’
‘‘आणि खेळू कुणाशी? सिया आणि सोहम गेलेत गावाला. आपण गेलो का कुठे?’’
या वर्षी बाबांना ऑफिसमध्ये खूप काम असल्यामुळे आभा आणि तिचे आई-बाबा कुठे जाऊ शकले नव्हते. त्यामुळे आभाचा मूडच गेला होता. तसे ते जवळपास फिरायला जाऊन आले होते, वीकेंडला वगरे, पण आभाला ते काही पटलेलं नव्हतं.
‘‘दरवर्षी जातोच नं आपणही कुठे तरी! या वर्षी नाही जमलं, तर किती तो त्रागा? थोडं समजून घ्यावं आपण.’’ आईच्या या बोलण्यावर आभानं तोंड वाकडं केलं.
‘‘आणि बाबांनी नवीन सायकल घेतली आहे सुट्टीची म्हणून, ती चालवतेस तरी का? बघ किती धूळ जमा झालीये तिच्यावर. ती साफ तरी कर!’’
‘‘तूच कर.’’
‘‘आभाऽऽऽ. मला उलट उत्तरं नाहीत हं खपायची.’’
‘‘सॉरी.’’ आभानं ओठांचा चंबू केला.
‘‘आणि बाबांनी दिलेलं काम कुठपर्यंत आलंय?’’ आभाला यंदाच्या रिझल्टमध्ये ग्रेड्स सगळ्या छान होत्या. पण प्रगतीपुस्तकावर वर्गशिक्षकांनी ‘इंग्लिश सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करा’ असा शेरा दिला होता. वाचन काहीच नसल्यामुळे बाबांनी मुद्दामच तिला समजतील अशी इंग्रजी गोष्टींची काही पुस्तकं आणून दिली होती. त्यातली एक एक गोष्ट रोज वाचून, अडतील त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीमध्ये शोधून, वहीत लिहून ठेवायचे, हे काम होतं. बाबा रोज संध्याकाळी घरी आल्यावर तिला त्यांचा अर्थ समजावणार, असं ठरलं होतं.
‘‘नाही सुरू केलं अजून.’’
‘‘का?’’
‘‘बोअर होतं. सुट्टीत काय परत अभ्यास?’’
‘‘अगं, तुझं इंग्लिश सुधारावं म्हणून सांगतात नं बाबा. बाबांनी काल नाही विचारलं मुद्दाम, पण आज विचारतील आल्यावर. तेव्हा रागावले तर मला नाही माहीत.’’
आभा काहीच बोलली नाही आणि सरळ कार्टून बघायला हॉलमध्ये गेली.
‘‘बरं, चल. आवर आता.
चित्रा मावशीकडे जायचंय नं? निघू लगेच.’’ आई हताशपणे म्हणाली.
काही दिवसांपूर्वी आईला तिची शाळेतली मत्रीण चित्रा बऱ्याच वर्षांनी अचानकच भेटली होती. त्या वेळेस दोघी घाईत होत्या म्हणून दोघींचं निवांत भेटून गप्पा मारायचं ठरलं होतं. त्याकरता आई आज आभाला घेऊन तिच्याकडे जेवायला जाणार होती. दोघी चित्रामावशीच्या घरी पोहोचल्या. एका गोंडस मुलीने दार उघडलं. चित्रामावशी मागेच उभी होती.
‘‘या, या, बसा.’’ आईने आभाची ओळख करून दिली.
‘‘हाय आभा. मी चित्रामावशी, तुझ्या आईची स्कूल फ्रेंड. आणि ही ऊर्जा, माझी मुलगी.’’ चित्रामावशीने त्या मुलीची ओळख करून दिली.
‘‘हाय ऊर्जा.’’
‘‘हाय आभा.’’ ऊर्जा हळूच सोफ्यावर बसली.
‘‘ऊर्जा, तू कितवीत गेलीस यंदा?’’ आभाच्या आईने विचारलं.
‘‘सातवीत गेले.’’
‘‘अरे, म्हणजे तू आभा एवढीच आहेस की!’’ अशाच थोडय़ा इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर चित्रामावशी ऊर्जाला म्हणाली, ‘‘ऊर्जाबाळा, आभाला तुझ्या रूममध्ये खेळायला घेऊन जा बघू!’’
‘‘होऽऽऽ! चल आभा.’’ ऊर्जा उठली आणि मध्ये ठेवलेल्या टेबलचा अंदाज घेत रूमच्या दिशेने जाऊ लागली. आभाच्या आईच्या लक्षात आलं – ऊर्जाला दिसत नव्हतं. पण तिच्या चेहऱ्यावरून तसं मुळीच जाणवत नव्हतं. रूममध्ये जाताना आभाच्याही ते लक्षात आलं..
‘‘आभा, तूपण सातवीत गेलीस नं?’’ ऊर्जाने विचारलं.
‘‘हो.’’
‘‘तुला सहावीला काय ग्रेड मिळाली गं?’’
‘‘ए प्लस. तुला?’’
‘‘मलासुद्धा! मला इंग्रजीकरता विशेष बक्षीसपण मिळालंय या वर्षी. माझा फोटोसुद्धा आहे बक्षीस घेताना. मला नं इंग्रजी आणि संगीत खूप आवडतं. मी ठरवलंय, मोठं झाल्यावर यांतच काही तरी करायचं. तुला आवडतं इंग्लिश?’’
‘‘छे! मुळीच नाही.’’
‘‘का गं?’’
‘‘अवघड आहे ती भाषा.’’
‘‘अगं, भरपूर पुस्तकं वाचायची. आपोआप सुधारेल बघ.’’ ऊर्जा एकदम खुदकन हसली आणि म्हणाली, ‘‘आभा, तुला वाटत असेल, मी कसं वाचते? हो नं?’’  यावर आभा काहीच बोलली नाही.
‘‘अगं, आम्हाला ब्रेलमधली पुस्तकं असतात, कॉम्प्युटरवर ऑडियो पुस्तकंही असतात. त्याचा उपयोग होतो. माझ्या शाळेत गीता टीचर आहेत नं मला शिकवायला. शाळेने माझ्याकरता स्पेशल त्यांना बोलावलंय. त्या खूप छान आहेत. त्यांनीच मला इंग्लिश चांगलं बोलण्याची आणि लिहिण्याची ही आयडिया दिली.’’
‘‘ऊर्जा, तुझ्या कुणी फ्रेंड्स आहेत?’’ हो! खूप आहेत. मी नॉर्मल स्कूलमध्येच जाते नं. तिथल्या मुली मला खूप सांभाळून घेतात. ए, आता थोडय़ाच दिवसांत शाळा सुरू होणार नं? सुट्टी संपणार!’’
‘‘हो नं!’’
‘‘सुट्टीत कित्ती मज्जा असते नं! दोन महिने कसे संपले कळलेच नाहीत नं? ए, तू काय-काय केलंस या सुट्टीत?’’
‘‘कार्टून्स बघणे, गेम्स खेळणे, संध्याकाळी खेळायला जाणे वगरे. पण खरं सांगू? खास असं काहीच नाही. बोअरच झाले. आम्ही कुठे गेलोही नाही. आणि तू?’’
‘‘नाही गं! इथेच होतो. माझे बाबा बारावीच्या व्हेकेशन बॅचेस घेतात नं, त्यामुळे आमचं कुठे जाणं नाही होत.’’
‘‘मग कंटाळा नाही येत तुला?’’
‘‘मला सुट्टीत कध्धीच कंटाळा येत नाही. इतका मोकळा वेळ आपल्याला एरवी कधी मिळतो का?’’ इतक्यात दोघींच्या आया ऊर्जाच्या खोलीत आल्या.
‘‘खरंय आभा, ऊर्जा म्हणते ते! अगं, ती तिचा वेळ खूप छान घालवते. तिच्या बाबांनी तिला नवा सिंथेसायझर आणून दिलाय. त्यावर ती गाण्याच्या चाली बसवते. कविता करते – पावसावर, सूर्यावर, आवडेल त्या विषयावर.’’
‘‘वा, किती छान ऊर्जा!’’ आभाची आई म्हणाली.
‘‘अगं, तिची एक कविता शाळेच्या मॅगझीनमध्ये छापून आली गेल्या वर्षी. योगायोगाने तिच्या शाळेतल्या एका मुलाचे वडील बालनाटय़ाचे प्रोडय़ुसर निघाले. त्यांनी ती वाचली. या सुट्टीत एका नाटकात त्यांनी तिची ही कविता घेतली आणि त्याची चालही ऊर्जानेच बसवली आहे आणि गायलंयही तिनेच. त्यामुळे पूर्ण सुट्टीभर हाच उद्योग चालू होता. विचार करायला वेळच नाही मुळी! हे गाणं खूप प्रसिद्धही झालंय.’’
‘‘कुठलं?’’ आभाने उत्सुकतेने विचारलं.
‘‘झुळझुळ वारा, नदीकिनारा..’’
‘‘अय्या, हे गाणं? अगं, आम्ही हे नाटक पाहिलंय – ‘ऐनक राजा.’ बरोबर नं, आई? काय मस्त गाणं बनवलं आहेस तू ऊर्जा.’’
‘‘आम्हाला माहितीच नाही की ती ऊर्जा कारखानीस म्हणजे तूच हे! ऊर्जा, गाऊन दाखव की आम्हाला संपूर्ण गाणं,’’ आभाची आई म्हणाली. ऊर्जाने गाणं सिंथेसायझरच्या साथीने गाऊन दाखवलं. गाणं संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

‘‘तू शिकतेस गाणं ऊर्जा?’’ आभाच्या आईने विचारलं.
‘‘हो मावशी. दोन र्वष झाली.’’
‘‘चित्रा, तुझी लेक म्हणजे ओसंडून वाहणाऱ्या ऊर्जेचं एक पॅकेजच आहे.’’ ऊर्जा मनापासून हसली. चित्रामावशीही हलकीशी हसली.
‘‘मावशी, मला जन्मापासून दिसत नाही नं, तर वाटतं की जे काही मिळालं आहे नं, ते भरभरून जगावं. एक मिनीटही वाया घालवू नये. माझ्या शाळेतल्या मत्रिणींनाही मी सांगत असते, की तुम्हाला तर देवाने डोळे दिले आहेत. तुम्हांला रंग कळतात, निसर्ग पाहता येतो, माणूस कसा दिसतो, हे समजतं. तुम्ही तर काय-काय करू शकता! म्हणून मिळालेली सुट्टी किंवा मिळालेला वेळ मुळीच दवडू नका. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून कुरकुरू नका. काही तरी नवीन शिकत राहा, अगदी ठरवून. मीही हे ठरवलंय. माझ्या मर्यादा ओळखून मला जे काही नवीन शिकता-करता येईल, ते मी सतत करण्याचा प्रयत्न करत असते.’’
‘‘अगदी बरोब्बर बोललीस ऊर्जा. खूप छान विचार आहेत तुझे.’’ आभाच्या आईने ऊर्जाला जवळ घेतलं. या अनुभवातून आभालाही काही तरी जाणवलं होतं, भावलं होतं..
संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा टी.व्ही. चक्क बंद होता. आभाही हॉलमध्ये सोफ्यावर लोळत पडलेली नव्हती.
‘‘आभा कुठे मत्रिणीकडे वगरे गेलीये का?’’ बाबांनी आईला विचारलं.
‘‘नाही हो, घरातच आहे.’’
‘‘घर शांत आहे, म्हणून वाटलं.’’
‘‘संध्याकाळपासून तुम्हीच दिलेलं काम करत बसलीये आतमध्ये, आपणहून.’’
‘‘काय सांगेतस? अहो आश्चर्यम्!’’
‘‘ऊर्जा इफेक्ट आहे हा!’’ बाबांना काही समजेना. आईने बाबांना चित्रामावशीकडे भेटलेल्या ऊर्जाबद्दल सविस्तर सांगितलं आणि म्हणाली, ‘‘बघानं, निमूटपणे आत बसून तुम्ही आणलेल्या पुस्तकांपकी, एक वाचायला घेतलंय. हेही नसे थोडके!’’
‘‘अरे व्वा! देर आये दुरुस्त आये.’’ बाबा म्हणाले.
– प्राची मोकाशी – mokashiprachi@gmail.com