इवल्याशा अणू-रेणूंपासून अफाट अशा आकाशगंगांपर्यंत विश्वातल्या विविध गोष्टींमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण चालू असते. एकमेकांना स्पर्शही न करता दुरूनच ऊर्जेची ही देवाणघेवाण कशी होते, यामागचे विज्ञान आपण आज छोटय़ाशा प्रयोगातून पाहणार आहोत.
bal00साहित्य :  एक लांब दोरी, कात्री, दोन साधारण समान वजनाच्या जड वस्तू किंवा खेळणी, आधारासाठी दोन हुक.
कृती : दोरीचा एक लांब तुकडा कापून तो दोन हुकांना सरळ बांधा. दोरीचे दोन सारख्या लांबीचे तुकडे कापून प्रत्येक तुकडय़ाच्या एका टोकाला एखादी जड वस्तू (किंवा खेळणे) बांधा. या दोन्ही दोऱ्यांची दुसरी टोके  हुकांना बांधलेल्या दोरीला (छायाचित्रातल्याप्रमाणे) एकमेकांपासून थोडय़ा अंतरावर बांधा. दोन्ही वस्तू हाताने स्थिर करा. मग त्यातल्या एका वस्तूला अलगद झोका द्या. ती वस्तू झोके घेईल. दुसरी वस्तू सुरुवातीला स्थिरच असेल, पण नंतर ती हळूहळू झोके घेऊ  लागेल. त्यानंतर पहिल्या वस्तूचा झोका कमी कमी होऊन ती स्थिरावेल. पण दुसरी वस्तू मात्र वेगाने झोके घेत असेल.
आणखी थोडा वेळ थांबल्यास काय होते? दोऱ्यांची लांबी वेगवेगळी असेल तर काय होते? दोन वेगवेगळ्या वजनांच्या वस्तू वापरून त्यांना आळीपाळीने झोका दिला तर काय होते? ते पहा.
वैज्ञानिक तत्त्व : जेव्हा आपण पहिल्या वस्तूला झोका देतो तेव्हा तिला आपण ऊर्जा देतो. दोन हुकांना बांधलेल्या दोरीमार्फत ही ऊर्जा पहिल्या वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे जाते आणि दुसरी वस्तू झोका घेऊ लागते. अशाच रीतीने एका अणूकडची ऊर्जा विद्युतचुंबकीय क्षेत्रामार्फत दुसऱ्या अणूकडे आणि एका आकाशगंगेतली ऊर्जा गुरुत्वाकर्षणीय क्षेत्रामार्फत दुसऱ्या आकाशगंगेकडे जाते.