परीक्षा म्हटलं की पोटात गोळा येणाऱ्यांची आजही कमतरता नाही. पण आज आपण परीक्षेच्या पोटातच शिरूया. परीक्षेचा प्रत्यक्ष संबंध येतो तो प्रश्नपत्रिका नि उत्तरपत्रिकेशी. आता याविषयीचा आढावा घेतला तर गमतीजमती दिसतात. कुणी म्हणतो की, मी परीक्षा झाली की त्या दिवशीची पूर्ण प्रश्नपत्रिका पुन्हा सोडवून पाहतो. कुणी म्हणतं की, मी प्रश्नपत्रिकेकडे परत पाहतच नाही. घरी नेऊन फाईलला लावतो. एक महाभाग तर परीक्षा केंद्राच्या बाहेर पडल्या पडल्या प्रश्नपत्रिका फाडूनच टाकतो म्हणे. तीच गोष्ट उत्तरपत्रिकांची! कुणी गुणांची बेरीज करून पाहतात, तर कुणी शिक्षकांकडे संशयाची सुई फिरवतात. कुणी स्वत:वरचा अन्याय बारकाईने शोधत बसतात.

पण मित्रांनो, परीक्षा म्हणजे प्रश्नपत्रिकेचा व उत्तरपत्रिकांचा एकच सुस्पष्ट उद्देश असतो.. तो म्हणजे तुम्हाला तुमच्या सुधारणेसाठी व विकासासाठी मदत करणे. आता यापुढे असं करा बरं- कोणत्याही परीक्षेची उत्तरपत्रिका मिळाली की तिची प्रश्नपत्रिकाही समोर घ्या. त्यात काही प्रश्न तुम्हाला मिळालेल्या माहितीवर जसेच्या तसे असतात. जसे की- व्याख्या, नियम, धडय़ावरचे प्रश्न. काही प्रश्नांच्या उत्तरात शिकवलेलं/ शिकलेलं तुम्हाला किती समजलंय याबाबत जाणून घेण्याची क्षमता असत. जसं की- कारणे द्या, संदर्भासह स्पष्ट करा, इ. तर काहींमध्ये तुम्ही जे शिकलात ते वापरून पाहण्यासाठीचा वाव असतो- वाक्यात उपयोग करा, पत्र लिहा, विज्ञानातील उदाहरणे.. काही प्रश्न तुम्हाला नवं काही सुचतं का, हे पाहण्यासाठी असतात. म्हणजे निबंधलेखन, थोडंसं वेगळं उदाहरण, इ.  प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांचा ताळा करून आपण यातल्या एखाद्या प्रकारात कमी पडतोय का, ते पाहा. पुढच्या अभ्यासाची दिशा ठरवताना त्या प्रकारावर थोडीशी जास्त मेहनत करा आणि पुढच्या परीक्षेसाठी सज्ज व्हा. उत्तरपत्रिका समोर आल्यावर एक-दोन गुणांसाठी वाद घालणे, संशय घेणं-यापेक्षा हे असं केलंत तर नक्कीच त्याचा फायदा आयुष्यभर होईल. तेव्हा आताच ठरवा- क्षणिक फायदा करून घ्यायचा की दीर्घकालीन, ते!

joshimeghana.23@gmail.com

मेघना जोशी