डॉ. तेजस्विनी कुलकर्णी

dr.tejaswinikulkarni@gmail.com

‘‘खूप दिवस प्रयत्न करतोय आजोबा, पण यावर्षी गणिताचं आणि माझं काही जमेना झालंय. फारच अवघड आहे हो यावर्षीचा गणिताचा अभ्यासक्रम!’’ राहुलने घरी आल्या आल्या आजोबांकडे तक्रार केली.

आजोबा शांतपणे त्याचं ऐकून घेत होते. त्यांनाही खरं तर आजकालच्या मुलांना असलेल्या भरमसाट अभ्यासक्रमाचा आणि दप्तराच्या ओझ्याचा थोडा रागच होता. पण त्यांचा स्वभाव या गोष्टींपुढे हार मानण्याचा मुळीच नव्हता. आणि राहुलला तर ते कधीच हार मानू देणारे नव्हते. त्यांनी राहुलला वेगळ्या प्रकारे मदत करायची ठरवली. राहुल हात-पाय धुऊन जेवायला बसल्यावर आजोबांनी त्याला दोन लाकूडतोडय़ांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. पण ती सोन्याच्या कुऱ्हाडीवाली नाही हं! ही नवी गोष्ट!

‘‘एकदा एका गावात दोन लाकूडतोडय़ांनी आपल्या लाकडं तोडण्याच्या कौशल्याची स्पर्धा करायचं ठरवलं. एकाचं नाव राम आणि दुसऱ्याचं श्याम. जंगलात गेल्यावर त्या दोघांनाही अगदी सारख्या प्रकारची आणि उंचीची वाळलेली झाडं देण्यात आली. आणि वेळ दिली गेली तीन तासांची. राम अगदी मेहनती होता. त्यामुळे त्याने लगेचच झाडं तोडून त्याचे ओंडके करायला सुरुवात केली. श्याम मात्र थोडा चतुर होता. त्याने आसपास नजर फिरवली. आणि जवळच एका मोठय़ा दगडापाशी जाऊन त्याने त्याच्या कुऱ्हाडीला धार लावायला सुरुवात केली. तीन तासांपैकी अर्धा तास त्याने धार लावण्यातच घालवला. त्याच्याकडे पाहून रामला हसू आले. ही स्पर्धा मीच जिंकणार याची त्याला खात्री पटली.’’

‘‘हो, मग तसंच होईल ना आजोबा! श्यामने तर अर्धा तास असाच घालवला की! राम त्याच्या अर्धा तास पुढे आहे ना!’’ राहुलने त्याचा अंदाज सांगितला.

आजोबा म्हणाले, ‘‘अरे थांब, थांब. आत्ताशी अर्धा तास झाला आहे. स्पर्धेचे अडीच तास बाकी आहेत की अजून!’’

‘‘हं. मग पुढे काय झाले आजोबा?’’ राहुल.

‘‘कुऱ्हाडीला धार करून झाल्यावर श्यामने झाडं तोडायला सुरुवात केली. धारधार कुऱ्हाड असल्याने त्याचा वेग नेहमीपेक्षा जवळजवळ दुपटीने वाढला. ते पाहून रामला चांगलाच घाम फुटला. तोही त्याचे काम जोरात करू लागला. मात्र श्यामचा वेग गाठणं त्याला शक्य नव्हतं. आणि बघता बघता पुढच्या दोन तासांतच श्यामने त्या संपूर्ण झाडाचे एकसारखे ओंडके करून ओळीने मांडून ठेवले. रामचं मात्र काम पूर्ण झालं नाही. आणि मेहनतीसोबतच हत्यारालासुद्धा सक्षम केल्याने श्याम ही स्पर्धा जिंकला!’’ आजोबांनी गोष्ट पूर्ण केली.

राहुल म्हणाला, ‘‘पण आजोबा, या लाकूडतोडय़ांचा आणि माझ्या अभ्यासाचा काय संबध आहे?’’

आजोबांनी हसत हसत त्याला विचारलं, ‘‘सांग बरं, हत्याराला सक्षम केल्यानं श्यामचा कोणता फायदा झाला?’’

राहुलने दोन मिनिटं विचार केला आणि म्हणाला, ‘‘एक म्हणजे, त्याचा वेळ वाचला. कमी वेळात तेच काम त्याने पूर्ण केले. दुसरं म्हणजे, त्याचं हत्यार धारधार असल्याने ते ओंडकेसुद्धा एकसारखे आणि नीटनेटके कापले गेले. म्हणजेच, जे काम त्यानं केलं ते उत्तम दर्जाचं झालं. आणि मला असं वाटतं आजोबा, त्याचं हत्यार चांगलं असल्यानं त्याला ताकद कमी लावावी लागली असेल. म्हणजेच तो रामपेक्षा कमी दमला असेल.’’

‘‘अगदी बरोब्बर! आता तूच सांग, तुझा अभ्यास जर लाकूड तोडण्याच्या कामासारखा असेल, तर तुझं हत्यार काय?’’

‘‘माझं मन किंवा मेंदू.’’ राहुलने झटक्यात उत्तर दिलं. आणि एका क्षणात त्याला कळालं की, आजोबांनी ही गोष्ट आपल्याला का सांगितली.

‘‘क्या बात है आजोबा! आत्ता मला कळलं की, मला अभ्यासात प्रगती करण्यासाठी माझ्या मनाला, म्हणजेच मेंदूला धार लावणं गरजेचं आहे! त्याने माझा वेळही वाचेल, अभ्यासही उत्तम होईल आणि मला अभ्यासाचा ताणही येणार नाही!’’ आजोबाही राहुलला या गोष्टीचा मथितार्थ कळाल्याने भलतेच खूश झाले.

‘‘पण आजोबा, मनाला कशी हो धार लावायची? मेंदूला अजून सक्षम करायचं ते नक्की कसं?’’

‘‘सांगतो, सांगतो. अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतींनी सुरुवात करू या. चालेल?

पहिलं म्हणजे मन शांत करणं. दिवसातून अगदी दहा-दहा मिनिटे शांत बसलास तरी चालेल. आरामात बसून डोळे बंद करून शांत बसायचं. श्वासाकडे लक्ष केंद्रित केलंस, तर मन अजून शांत राहील. याला मेडिटेशन किंवा ध्यान असं म्हणतात. लक्षात ठेव राहुल, जेवढं मन शांत, तेवढी एकाग्रता जास्त. आणि जेवढी एकाग्रता जास्त, तेवढा अभ्यास उत्तम. मात्र हे रोज करायचं हं. एकदोन दिवस करून फारसा फायदा नाही.’’

‘‘पण आजोबा, मला जमेल हे? मी किती लहान आहे!’’

‘‘नक्की जमेल राजा, तू करून तर पाहा.’’ आजोबा प्रेमाने म्हणाले.

‘‘दुसरा उपाय म्हणजे, आपल्या मेंदूला चॅलेंज करणं. तू रोज तुझा अभ्यास उजव्या हाताने करतोस ना, मग आता बदल म्हणून रोज थोडा वेळ डाव्या हाताने लिही. हे करण्याने आपल्या मेंदूच्या पेशी अधिक सक्षम होतात. याने तुझ्या मेंदूचा काम करण्याचा दर्जा वाढेल, तुझी स्मरणशक्तीसुद्धा वाढेल!’’

‘‘अरे व्वा! हा तर मेंदूचा व्यायामच म्हणायचा!’’ राहुल हसत म्हणाला. ‘‘हे करायला खूप मजा येईल. थँक यू आजोबा!’’

‘‘अरे, थँक यू कशाला म्हणतोस?’’ आजोबा राहुलची पाठ थोपटत म्हणाले.

‘‘तुम्ही कधीच मला हार मानू देत नाही याबद्दल!’’ आपल्या गोष्टीचा अजून एक लपलेला अर्थ राहुलला कळला याचा आजोबांना खूप आनंद झाला.