19 April 2019

News Flash

पाणी पिणारे ग्लास

गौरव हा पाचवीत शिकणारा हुशार मुलगा. त्याला विज्ञान विषय खूप आवडायचा.

|| दीप्ती कोळंबकर

गौरव हा पाचवीत शिकणारा हुशार मुलगा. त्याला विज्ञान विषय खूप आवडायचा. म्हणून त्याचे बाबा त्याला विज्ञानकथेची छोटी छोटी पुस्तकं आणून द्यायचे. ती पुस्तके तो वाचत असे. विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचा. घरी वेगवेगळे प्रयोग करायचा, त्यांना वेगवेगळी नावे द्यायचा आणि आपल्या छोटय़ा दोस्तांना दाखवायचा.

शनिवारी शाळा सुटल्यावर त्याने आपल्या वर्गातील मुलांना आणि आजूबाजूच्या छोटय़ा दोस्तांना आपल्या घरी जादू पाहण्यासाठी पाच वाजता बोलावलं. सर्व मुले जादू पाहण्यासाठी गौरवच्या घरी जमली. गौरवची आईही तेथेच बसली होती. शेजारची दुसरीत शिकणारी चिमीही आली होती. गौरवने टेबलावर एक काचेचा ग्लास, एक डिश, एक मोजपात्र, एक छोटी मेणबत्ती, एक आगपेटी, पेलाभर पाणी, एक रुपयाचे नाणे मांडून ठेवले होते.

‘‘गौरवदादा, आज कोणती जादू दाखवणार आहेस?’’ लहानगी चिमी कुतूहलाने त्याला म्हणाली.

‘‘चिमी, आज मी  पाणी पिणारे ग्लास आणि हात ओला न करता पाण्यातील नाणे हाताने काढण्याची जादू दाखवणार आहे.’’

-इति गौरव.

‘‘ते कसे?’’ सर्व जण एका सुरातच म्हणाले.

‘‘आता तुम्ही सर्वानी मी काय काय करतो त्याचे निरीक्षण करा.’’ गौरवने हातात काचेचा ग्लास घेतला आणि सगळ्यांना विचारले, ‘‘ग्लासमध्ये काय आहे?’’

‘‘ग्लास रिकामा आहे. त्यात काहीच नाही.’’ छोटी चिमी म्हणाली.

‘‘ग्लास हवेने भरलेला आहे, म्हणून मी ग्लास पाण्याने काठोकाठ भरला. नंतर  ग्लासातील पाणी एका मोजपात्रात ओतले. पहा, सर्वानी पाणी किती मि.ली आहे?’’ -गौरव म्हणाला.

‘‘२५० मि.ली’’ – साक्षी आणि मयूर एकदम म्हणाले.

‘‘२५० मि.लीचे समान पाच भाग करा.’’ – गौरव.

२५० म् ५ = ५० मि.ली. म्हणजेच ग्लासातील पाण्याच्या पाच भागांपैकी एक भाग ५० मि.ली. – साक्षी म्हणाली.

गौरवने डिशमध्ये मेणबत्ती चिकटवली आणि पेटवली. मोजपात्रामध्ये ५० मि.ली. पाणी घेतले आणि ते डिशमध्ये ओतले. ग्लासाच्या तोंडाच्या परिघाबाहेर येईल असे एक नाणे डिशमधील पाण्यात ठेवले आणि मंत्र पुटपुटत गौरवने ग्लास मेणबत्तीवर उपडा ठेवला. थोडा वेळ मेणबत्ती पेटली आणि नंतर विझली. त्यानंतर सर्व पाणी ग्लासमध्ये गेले. डिशमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. ग्लासमधील पाण्याच्या पातळीबरोबर ग्लासवर खूण केली. हात ओला न करता साक्षीने डिशमधील नाणे उचलले.

‘‘ग्लासने सर्व पाणी पिऊन टाकले!’’ चिमी आश्चर्याने ओरडली.

‘‘आपण ग्लास आणि डिशमध्ये जास्त पाणी ओतले तर? आर्या, बघ, तू प्रयोग कर.’’ गौरव म्हणाला.

आर्याने ग्लास उचलून बाजूला ठेवले. डिशमध्ये आणखी थोडे पाणी ओतले. मेणबत्ती पेटवली आणि तोच ग्लास मेणबत्तीवर उपडा ठेवला. थोडा वेळ मेणबत्ती पेटली आणि नंतर विझली. पहिल्या खुणेइतकेच पाणी ग्लासमध्ये गेले. बाकी पाणी डिशमध्ये शिल्लक राहिले.

‘‘पहा, निरीक्षण करा. डिशमध्ये पाणी जास्त असूनसुद्धा पहिल्याइतकेच पाणी ग्लासमध्ये गेले.’’ गौरवने निरीक्षण नोंदवलं.

‘‘पाणी ग्लासमध्ये कसे गेले?’’- आर्या.

‘‘जादूने.’’ गौरवदादा मंत्र पुटपुटत होता ना?’’ – चिमी निरागसपणे म्हणाली.

‘‘चिमे, जादू नाही, ते विज्ञान आहे. मी गमतीने मंत्र पुटपुटतो. त्याला नाव देतो. पाणी ग्लासमध्ये गेले त्याचे उत्तर देतो; पण त्याअगोदर मला पटापट प्रश्नांची उत्तरे द्या.’’ गौरव ऐटीत म्हणाला.

‘‘हवेत कोणकोणते वायू असतात?’’

– गौरव.

‘‘ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बनडाय ऑक्साइड, पाण्याची वाफ, इतर वायू.’’ मयूर म्हणाला.

‘‘बरोबर! ऑक्सिजनचा उपयोग आपण कशासाठी करतो?’’ – गौरव.

‘‘श्वास घेताना आपल्याला ऑक्सिजन आवश्यक असतो.’’- मयूर.

‘‘ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो.’’

– आर्या.

‘‘अगदी बरोबर. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. तेच सूत्र आपण इथे वापरले. पेटत्या मेणबत्तीवर आपण ग्लास ठेवले तेव्हा ग्लासमध्ये जेवढी हवा होती आणि त्या हवेमध्ये जेवढा ऑक्सिजन होता तोपर्यंत मेणबत्ती पेटली. ग्लासमधील ऑक्सिजन संपल्यावर मेणबत्ती विझली. ग्लासमध्ये जागा रिकामी झाली आणि ती जागा भरून काढण्यासाठी तेवढेच पाणी ग्लासमध्ये गेले. म्हणजेच ग्लास पाणी प्यायले.’’- गौरवने स्पष्टीकरण दिले.

‘‘पण जेवढे पाणी ग्लासमध्ये जाते तेवढेच पाणी तू डिशमध्ये कसे घेतले?’’ आर्याचा प्रश्न.

‘‘कारण हवेत सर्व हवेच्या १/५ भाग ऑक्सिजन असतो. म्हणजेच हवेचे समान पाच भाग केले तर त्यामध्ये एक भाग ऑक्सिजन असतो. म्हणून ग्लासमध्ये जेवढी हवा असते तेवढेच ग्लासमध्ये काठोकाठ पाणी घेतले. ते २५० मि.ली. आले. त्याचे समान पाच भाग म्हणजे २५० म्  ५ = ५० मि.ली. एक भाग ५० मि.ली. म्हणून ५० मि.ली. पाणी डिशमध्ये ओतले. मेणबत्ती विझल्यावर ते सर्व ग्लासमध्ये गेले. ते तुम्ही पाहिले ना? म्हणजेच हवेत १/५ भाग ऑक्सिजन असतो.’’ गौरवने समजावून सांगितलं.

‘‘पण हे तुला कसं समजलं?’’ – वेदांत.

‘‘मी पुस्तके वाचतो. घरी प्रयोग करतो, तेव्हा मला समजलं. हे सर्व पुस्तकात नव्हतं. मी माझ्या कल्पनेने पाणी पिणारे ग्लास आणि हात ओला न करता हाताने नाणे काढणे ही नावे दिली.‘‘ गौरव म्हणाला.

‘‘तू ग्रेट आहेस. तुझ्यामुळे आम्हालाही प्रयोगांची आवड निर्माण झाली.’’ आर्या म्हणाली.

‘‘हवा सगळीकडे सारखीच असते का?’’ – साक्षीने प्रश्न विचारला.

‘‘नाही. जमिनीपासून आपण जसजसे वरवर जाऊ तसतशी हवा विरळ म्हणजेच कमी कमी होत जाते. त्यामुळे त्यातील ऑक्सिजन कमी होत जातो. म्हणूनच उंच पर्वतावर चढणारे गिर्यारोहक आणि समुद्राच्या तळाशी जाणारे पाणबुडे ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर घेऊन जातात.’’ – इति गौरव.

‘‘आपल्या मुंबईची हवा अशुद्ध आहे ना?’’ – मयूरची कमेंट.

‘‘मुंबईत कारखाने व वाहने जास्त, घनदाट लोकवस्ती आणि झाडे कमी; त्यामुळे हवा अशुद्ध होते. म्हणजेच हवेचे प्रदूषण होते. गावी झाडे जास्त. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे गावची हवा शुद्ध मिळते. म्हणून आजपासून आपण सर्वानी ऑक्सिजन मिळविण्यासाठी संकल्प करू या. प्रत्येकाने दरवर्षी एक-दोन झाडे लावलीच पाहिजे. आपण लहान आहोत. त्यामुळे लहान-लहान झाडे, तुळस, कोरफड, सदाफुली, जास्वंद, गवती चहा, कडीपत्ता इ. झाडे लावावीत. त्यासाठी शहाळं, श्रीखंडाचा डबा, सुगड, तेलाचे कॅन, रंगाचे डबे, मोठय़ा बाटल्या इत्यादींचा उपयोग करावा. प्लॅस्टिक पिशव्या वापरायच्या नाहीत. प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा. त्यामुळे प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसेल.’’ गौरवच्या आईच्या या बोलण्यावर सर्वजण मोठय़ाने ‘हो’ म्हणत खाऊची वाट पाहू लागले.

गौरवच्या आईने सर्वाना खाऊ दिला. मुले आनंदाने घरी गेली. ‘‘प्रयोग साधा वाटला तरी तू तुझ्या दोस्तांना छान समजावून सांगितलास.’’ आई कौतुकाने गौरवला म्हणाली.

‘‘आई, माझ्यामुळे त्यांनाही विज्ञान विषय चांगला समजेल आणि त्यात आवड निर्माण होईल. तेही प्रयोग करतील.’’

‘‘शाब्बास! दुसऱ्यांचा विचार असाच करत राहा.’’  गौरवची आई प्रेमाने त्याला जवळ घेत म्हणाली.

First Published on August 18, 2018 1:22 am

Web Title: fantastic stories for kids