20 April 2019

News Flash

मला काय करायचंय?

‘मी आणि माझं.’असा चाकोरीतील विचार करताना हा विचार आणखी बळावतो

|| मेघना जोशी

‘मला काय करायचंय?’ हा नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असणारा चौकसपणा पूर्णपणे घालवून टाकणारा, अनेक मनांमध्ये असणारा सर्वात मोठ्ठा हितशत्रू. ‘मी आणि माझं.’असा चाकोरीतील विचार करताना हा विचार आणखी बळावतो आणि नकळतपणे आपलं नुकसान करत असतो हे ध्यानीही येत नाही. अनेक वेळा ‘मी आणि माझं काम, याव्यतिरिक्त मला काय करायचंय?’ असं म्हणून काणाडोळा करण्याची वृत्ती असते. समजा, तुमचा मित्रमैत्रिणींचा एक गट असेल, तर त्या गटाच्या बाहेर असणाऱ्या वर्गमित्र किंवा मैत्रिणींबाबत हे विधान सर्रास करणारी मुलं असतात, म्हणून याबाबत आज लिहावंसं वाटलं. आपल्या संपर्कातील व्यक्तींबाबत मूलभूत माहिती असणं यात कोणताही भोचकपणा नाहीच त्याचबरोबर आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळही करायची नाही, हेही बरोबर. काही माणसं अशी असतात- समजा, ती एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आहेत. आजूबाजूला अनेक विषय चाललेत, तर त्यापैकी त्यांचा ज्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही त्या चर्चेत किंवा कामात ‘मला काय करायचंय?’ म्हणून सहभागी होत नाहीत. पण ज्यावेळी त्यातल्या एखाद्या मुद्दय़ावर त्यांना मत किंवा सूचना विचारली जाते; तेव्हा त्यांना मुळापासून सगळं सांगावं लागतं. त्यात वेळ तर जातोच, पण बरोबरच आपुलकीची भावना नाही, असं वाटून आजूबाजूच्या व्यक्तींच्या मनात त्यांच्याबद्दल दुरावा निर्माण होतो. साधारणत: कोणत्याही सामाजिक प्रश्नाबाबत हा विचार असतोच. जसं की, ‘असेना का अस्वच्छता तिकडे नाक्यावर, मला काय करायचंय?,’ ‘नाही का शिकेनात मुली, मला काय करायचंय?’ ‘त्या गावात आहे ना पाणीटंचाई, मला काय करायचंय?’ पण मित्रांनो, आज जरी तुम्हाला तो तुमचा प्रश्न वाटत नसेल तरी तो आपल्या पूर्ण समाजाचा प्रश्न असल्याने कधी ना कधी तुम्हाला त्याचा फटका बसणारच आहे, हे जाणून थोडंसं बदला. ‘मला काय करायचंय?’ म्हणण्यापेक्षा मला माहीत करून घ्यायला हवंच; आणि प्रसंगी कृती करायला हवीच असं म्हणा. त्यातून तुमचा चौकसपणा आणि कल्पकता नक्कीच वाढेल, सामाजिक संबंध सुधारतील. तुमचं, समाजाचं आणि देशाचं भलं होईल आणि भविष्यात तुमच्यावर येणारं संकट येण्याआधीच टळेल, किंवा त्याची तीव्रता कमी होईल. मग, नुकताच स्वातंत्र्यदिन साजरा करून झालाय. नक्की कराल ना एवढं?

joshimeghana231@yahoo.in

First Published on August 18, 2018 1:22 am

Web Title: fantastic stories for kids 2