18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

बानो

एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक बुढे बाबा राहायचे

फारूक एस. काझी          | Updated: October 8, 2017 2:41 AM

एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक बुढे बाबा राहायचे. करीमचाचा हे त्यांचं नाव. वय वाढलेलं. घरात कुणीच नाही. त्यांची बायको राहतबी पाच-सहा वर्षांपूर्वी पैगंबरवासी झाली. तेव्हापासून ते एकटेच होते. नाही म्हणायला एक शेळी मात्र त्यांच्याकडे होती- ‘बानो’.. करीमचाचा तिला प्रेमाने याच नावाने हाक मारायचे.

बानो तब्येतीने चांगली अब्दुल-गब्दुल होती. दिसायचीही सुंदर. पांढऱ्या रंगात मधूनच तपकिरी रंगाचे शिंतोडे मारलेले. लालसर डोळे व हनुवटीवर थोडीशी दाढी, करीमचाचांना होती तशी! करीमचाचा रोज बानोला घेऊन गावापासून दूर माळरानात चरायला घेऊन जायचे. बानो त्यांच्या जगण्याचा आधार होती. तिला ते मिनिटभरही नजरेआड करत नव्हते.

रानात चरायला खूप गुरं यायची. खूप शेळ्या-मेंढय़ा यायच्या. करीमचाचा तिच्याशी येता-जाता गप्पा मारायचे. लोक कसे असतात, आपण काय करायला पाहिजे, हे ते तिला सांगत असत. बानोपण मान डोलवायची, जणू तिला सर्व समजत होतं.

बानोची सर्वाशी ओळख होती. सगळे तिला ‘करीमचाचाची बानो’ याच नावाने हाक मारायचे. त्यातल्या एका कळपात एक शेळी होती. ‘भुरी’ तिचं नाव. भुऱ्या रंगामुळे तिला ते नाव मिळालेलं होतं. तिचा स्वभाव जरा खवटच होता. तिला बानोचे झालेले लाड पाहवत नसत. त्यांच्या कळपाचा मालक त्यांना नीट वागवत नसे. उलट करीमचाचा बानोचे खूप लाड करत.

‘‘बानो, त्या म्हाताऱ्या करीमचाचापेक्षा माझा मालक खूप चांगला आहे. तू माझ्या मालकाकडे का येत नाहीस?’’- भुरी बानोला म्हणाली.

बानो यावर हसली. हसून करीमचाचाकडे गेली. दुसऱ्या दिवशी भुरी पुन्हा बानोला आपल्या मालकाकडे येण्याविषयी बोलली. रोजच असं होऊ  लागलं. बानोला भुरीचा मालक चांगला माणूस वाटू लागला. बानो भुरीच्या बोलण्याला एक दिवस फसलीच. ती करीमचाचाची नजर चुकवून भुरीच्या मालकाकडे आली. भुरीच्या मालकाने तिला कोंडून ठेवलं.

इकडे करीमचाचा बानोला गावभर शोधत होते. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही.

‘‘लांडगा उठा के ले गया रहिंगा. चाचा भूल जाओ बानोको.’’ असं म्हणून लोक आता करीमचाचांची समजूत काढू लागले होते. करीमचाचा बानोच्या आठवणीने खूप दु:खी झाले. आजारी पडले. इकडे बानोला भुरीच्या मालकाने खूप त्रास दिला. तिला खायला वैरण देईना की प्यायला पाणी. त्याने बानोला विकायचं ठरवलं. चांगले पैसे येतील असं त्याला वाटायला लागलं. भुरीला हे सर्व पाहून फार आनंद होत होता. बानोची हालत पाहून ती मनोमन खूश होत होती. एके दिवशी एक व्यापारी बानोला पाहून गेला. भुरीच्या मालकाला सौदा नाही पटला. बानोचा जीव भांडय़ात पडला. पण तिचा आनंद फार काळ नाही टिकला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक व्यापारी तिला पाहायला आला. सौदा जमला. बानोला विकून मालक खूश झाला. बानोला मात्र सतत करीमचाचाची आठवण येत होती.

बानोला नवीन मालक घेऊन जाऊ  लागला. बानो सतत हिसका देऊन सुटण्याचा प्रयत्न करत होती. व्यापारी तिला छोटय़ा गाडीत घालून नेणार होता. गाडीत आधीच एक रेडकू बांधलेलं होतं. तेही सुटायचा प्रयत्न करत होतं. व्यापाऱ्याने बानोला तिच्याजवळ बांधलं. रेडकूची हालचाल थांबली.

‘‘कोण आहेस तू? इथं कशी आलीस?’’ रेडकूनं असं विचारताच बानोने सर्व कथा सांगायला सुरुवात केली.

‘‘मी करतो तुला मदत. आधी एक काम कर. तुझी दोरी तू चघळायला सुरुवात कर. लवकर तुटायला हवी ती.’’

बानोने तसंच केलं. त्यांनी आपापल्या दोरी चघळून तोडल्या.

रेडकूने सावधपणे अंदाज घेतला. गाडी थांबली होती. ड्रायव्हर अन् मालक जेवायला उतरले होते.

रेडकूने मागे लावलेल्या ताडपत्रीतून बानोला बाहेर जाण्यापुरती जागा केली. बानोला बाहेर काढलं. तो स्वत: मात्र आतच थांबला.

‘‘नीट जा. आणि कुणावरही पटकन विश्वास ठेवू नको. करीमचाचांना सोडून कुठेही जाऊ  नकोस. तेच तुझे मायबाप. काळजी घे.’’ जाताना त्याने बानोला बजावून सांगितलं.

बानो लपतछपत माळावर पोचली. तिला घराचा रस्ता सापडत नव्हता. ती कावरीबावरी होऊन ओरडत होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं. इतक्यात तिला मेंढय़ांचा कळप दिसला. ती धावतच तिकडे गेली. मेंढय़ा घेऊन येणारा किसन बानोला बघून चमकला. किसनने बानोला ओळखलं. तो त्यांच्याच गावचा होता.

‘‘बानो, अगं कुठं हुतीस तू? त्यो करीमचाचा मरायला टेकलाय तुझ्याबिगर. अन् काय हाल केल्यात स्वत:चं? चल बिगी बिगी. करीमचाचा लय वाट बगतुय तुजी.’’

बानोला जन्नत जणू दोनच बोटं उरली होती. ती कळपात सामील झाली.

‘‘करीमचाचा, तुमची बानो आली ओ..!’’ असा आवाज येताच आजारी करीमचाचा धडपडत बाहेर आले. अंधुक डोळे चोळून पाहू लागले. त्यांची नजर बानोला शोधत होती. आणि त्यांना बानो दिसली. करीमचाचांनी धावत जाऊन तिला मिठी मारली. पटापटा तिचे मुके घेतले.

‘‘कहां चली गयी थी तू? कित्ता ढूंडा तेरेकू?’’

बानोही करीमचाचांना घट्ट बिलगली होती. तिला अजून विश्वास बसत नव्हता. करीमचाचांचा हात तिच्या अंगावरून फिरत होता. तसतसा तिचा धीरही वाढत होता. आता ती सुरक्षित होती. ती करीमचाचांना आणखीच घट्ट बिलगली.

– फारूक एस. काझी         

farukskazi82@gmail.com

First Published on October 8, 2017 2:41 am

Web Title: faruk s kazi story for kids