News Flash

शर्यत

रेश्मा आता जिथं तिथं धावतच होती. शाळेला जाताना, अब्बूंचा डबा देताना, मंडई आणताना..

रेहानाचा वाढदिवस जवळ आला होता. रेश्माला काळजी पडली होती की तिला गिफ्ट द्यायचं तरी काय? तिच्या जवळ कामाचे साठवलेले थोडे पैसे होते. पण तेवढय़ा पैशांत काहीच भागणार नव्हतं. अम्मीकडे मागावं तर ती जीव घेईल. काय करावं, असा तिचा विचार सुरू झाला. रेहानासाठी तिला सुंदर सँडल घ्यायचे होते, पण ते तर महाग असणार! तिने दुकानात जाऊन एक सँडल बघून ठेवले होते, ३०० रुपयांचे. दुकानदार तिला आत येऊ  देत नव्हता. तिने बाहेरूनच किंमत पाहून घेतली होती. तेवढे पैसे आणायचे कुठून?.. रेश्मा परेशान आहे हे शबानाने ओळखलं होतं. शेवटी तिची अम्मीच होती ती.

‘‘रेश्मे, क्या हुये गे? क्या सोचते रहती तू?’’ अम्मीच्या प्रश्नावर रेश्मा काहीच बोलली नाही. तिला हे सर्व सिक्रेट ठेवायचं होतं.

‘‘कुछ नै गे. ऐसाच जरा सोच रही थी.’’ रेश्माने वेळ मारून नेली. पण काय करावं हे तिला अजूनही सुचत नव्हतं. तिची बेचैनी वाढतच होती.

‘‘अल्ला, तुने हमना इत्ता गरीब कायकू बनाया रहींगा. कित्ता बाद है तू.’’ रेश्मा रागाने बोलून गेली. खरं तर तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ती हतबल होती. तिचं काही एक चालत नव्हतं.

‘‘रेश्मे, जा भागते हायवे को, तेरे अब्बा का डबा देने. गाडी आने का टेम हुये.’’

शबानाने एका फडक्यात भाकरी आणि एका डब्यात पातळ कालवण दिलं.

‘‘सालन पतला हाय. सटू नको. नीट लिजा.’’ अम्मीने सूचना केल्या.

रेश्मा धावतच हायवेकडे निघाली. पायात चप्पल झिजलेली होती. पळता पळता चप्पलचा पन्ना तुटला. रेश्मा पडता पडता वाचली. हातातला डबा खाली पडला, पण नशीब भाजी नाही सांडली. नाहीतर अम्मीने पाठ मऊ  केली असती. अब्बाला डबा देऊन रेश्मा चप्पलचा पन्ना लावत लावत घरी आली.

‘‘मॉं गे, चप्पल तुटी.’’

‘‘आगले महिने में लीइंगे.’’ शबाना कामात होती. रेश्मा खूश झाली.

दुसऱ्या दिवशी शाळेत धावण्याच्या स्पर्धेची सूचना आली. इंगळे बाईंनी सूचना वाचून दाखवताच रेश्माने हात वर करून पहिलं आपलं नाव दिलं. त्याला कारणही होतं. स्पर्धेत पाहिलं बक्षीस ५०० रुपयांचं होतं. त्यात तर रेहानाला सुंदर सँडल घेता येईल. आपण पहिलाच नंबर काढू. ती आता अब्बाचा डबा द्यायला जोरात धावतच जात होती. पायात चप्पल नसल्याने खडे बोचायचे. टाचेतून कळ यायची, पण मग लगेच रेहानाचं गिफ्ट आठवायचं. रेश्मा जीव तोडून धावायची. तिला दुकानातले ते सुंदर सँडल दिसायला लागे. रेश्मा आता जिथं तिथं धावतच होती. शाळेला जाताना, अब्बूंचा डबा देताना, मंडई आणताना..

शबानाला काहीच कळेना, ही पोरगी सारखी का पळतेय ते? तिने रेश्माच्या मैत्रिणीला विचारायचं ठरवलं. शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला. इतर मुलं शूज घालून आलेली होती. मुली फारशा कुणी नव्हत्या. रेश्मा वाट पाहू लागली. मुलांच्या स्पर्धा संपल्या. आता मुलींच्या स्पर्धा सुरू झाल्या. शिट्टी वाजली आणि रेश्मा जीव तोडून धावत सुटली. धावण्याच्या धुंदीत तिला पायात बोचलेल्या खडय़ाची जाणीवही झाली नाही. एक कळ सणसणत मेंदूपर्यंत गेली, पण जाणवलं काही नाही. रेश्मा मधेच अडखळून पडली होती. पायाला रक्ताची धार लागलेली. बाईंनी तिला उठवून औषध लावलं. प्यायला पाणी दिलं. बाकीच्या मुली पुढं गेल्या. रेश्मा हरली. रेश्माचे डोळे पाणथळले होते. तिचं स्वप्न आज अपूर्ण राहिलं होतं. ती लंगडत लंगडत घरी आली. ती अजून दारात आहे तोवरच..

‘‘दिदे ये देक’’ असं म्हणत रेहाना समोर आली. ती तिच्या पायातले सँडल दाखवत होती. हे तेच सँडल होते, जे रेश्मा रेहानाला आणणार होती.

‘ये किसने लाया?’’ असा प्रश्न दचकून रेश्माच्या तोंडून बाहेर पडला.

‘‘मई लाई. तू भागने के स्पर्धेमे भाग क्युं लीती ओ समज्या मजे. ये तेरी तरफ से गिफ्ट हाय.’’ रेश्मा अम्मीच्या गळ्यात पडून रडू लागली.

‘‘नै रोते गे. जिंदगी शर्यत हाय. कबी जितने का तो कबी हारने का. नै रोने का. गुना की हाय मेरी लाडो.’’

तिने रेश्माच्या दोन्ही गालांवरून हात फिरवून बोटं आपल्या कानशिलाजवळ नेऊन कडाकड मोडली. तिची पापी घेतली. रेश्मा अम्मीला बिलगली. तिला शर्यत हरूनही जिंकल्यासारखी वाटली. तिने शांतपणे डोळे मिटून घेतले. खूप थकली होती. ती तिथेच झोपी गेली. शबाना तिच्या डोक्यावरून हात फिरवत तशीच बसून होती. रेहाना गल्लीत सगळ्यांना सँडल दाखवायला गेली होती. झोपेतही हसणाऱ्या रेश्माच्या चेहऱ्याकडे पाहून शबानाही मंद हसत होती.

farukskazi82@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 4:19 am

Web Title: faruk s kazi story for kids 2
Next Stories
1 विज्ञानवेध : नवा चॅम्पियन
2 हितशत्रू : ‘सांगायला काय जातंय?’
3 डोकॅलिटी
Just Now!
X