21 September 2018

News Flash

पुस्तकवाल्या बाई

शबाना सकाळी आपली सगळी कामं आवरत होती.

शबाना सकाळी आपली सगळी कामं आवरत होती. रेश्मा मात्र कुठंच दिसत नव्हती. ‘‘रेश्मे, का मरी गे सुब्बु सुब्बु..’’ शबानाचा आवाज घरभर दणाणला. छोटी रेहाना तिच्या बाहुलीशी अंगणात खेळत होती. अम्मीच्या हाकेने ती घरात आली.

HOT DEALS
  • Micromax Vdeo 2 4G
    ₹ 4650 MRP ₹ 5499 -15%
    ₹465 Cashback
  • I Kall Black 4G K3 with Waterproof Bluetooth Speaker 8GB
    ₹ 4099 MRP ₹ 5999 -32%

‘‘दीदी शब्बोच्या गाडय़ावर बसलीय.’’ रेहानाच्या या वाक्यावर शबाना चिडली. सकाळपासून ती कामाने पार वाकून गेली होती आणि रेश्मा मात्र खेळायला गेलीय. आजकाल ती न चुकता शाळेला जाते. रेहानालाही सवय लागलीय शाळेची.

‘‘हमारे नवे बाई लई चकोट हांई.’’ कुणी इंगळे बाई म्हणून आहेत तिच्या शाळेत. नवीन आहेत. मुलांना खूप जीव लावतात. रेश्माचे खूप लाड करतात. रेश्माला त्या बाई खूप आवडल्या. ती सारखी त्यांच्या आसपास भटकत असते. घुटमळत असते. बाईंनी दिलेला सगळा अभ्यास ती पूर्ण करते. वाचायचा भलता नाद लागलाय तिला. बाई तिला पुस्तकं देतात आणि ही सारखी वाचत बसते. काल रेश्माच्या दप्तरात तिला अलादिनच्या गोष्टीचं पुस्तक सापडलं. चित्रं खूप सुंदर होती त्यातली. शबाना चार इयत्ता शिकलेली. वाचता येत होतं थोडं थोडं. अडखळत का होईना, ती वाचू शकत होती. शाळा खूप आवडायची तिला. सजूनधजून जायची ती शाळेत. तिची अम्मी अल्लाह घरी गेली आणि तिची शाळा सुटली; घरात रोटी बनवायला कुणीच नव्हतं म्हणून. अलादिनची गोष्ट थोडी वाचली तिने. नवीन पुस्तकाचा वास घेतला. छातीभर वास भरून घेतला. पुस्तक पुन्हा जपून रेश्माच्या पिशवीत ठेवून दिलं. पोरीचं कौतुकही वाटत होतं आणि रागही येत होता. सुरुवातीला खूप मार खाल्ला रेश्माने अम्मीचा; पण रेश्माच्या हातून पुस्तक काही सुटलं नाही. आताशा शबाना तिला मारत नाही. आत्ताही रेश्मा वाचत असणार.. शबानाने गाडय़ावर जाऊन बघितलं. रेश्मा अलादिनचं पुस्तक वाचत होती. रुबाबात बसली होती पोर. हरवून गेली होती.

‘‘रेश्मे, घर में आ जल्दी.’’ शबानाच्या हाकेने रेश्माची तंद्री तुटली. तोंड वाकडं करत ती घरात आली. शबाना भाकरीसाठी पीठ मळत होती.

‘‘रेश्मा, ओ किताब मजेबी पड के सुना तो.’’ अम्मीच्या बोलण्याचं रेश्माला खूप हसू आलं. अम्मी असं प्रेमाने खूप कमीदा बोलते.

‘‘हसती कैकू गे? पड एक बार.’’

रेश्माने गोष्ट वाचायला सुरुवात केली. तिघी गोष्टीत रंगून गेल्या. रेश्माला एवढं चांगलं वाचायला कधी यायला लागलं? शबानाला नवल वाटलं. आता हे रोजचंच झालं. स्वयंपाक करता करता रेश्मा गोष्टी वाचून दाखवू लागली. शाळेतल्या गमतीजमती सांगू लागली. रेहानाही आपलं काहीबाही मधे मधे सांगू लागली. शबानाला पुन्हा एकदा शाळेत जाऊन बसल्यासारखं वाटू लागलं.

एके दिवशी दुपारी शबाना गोधडी शिवत होती. अचानक रेश्माला घरी आलेलं पाहून तिला नवल वाटलं. ‘‘इंगळे बाई आईं.’’ हे वाक्य ऐकताच शबाना गडबडली. अंगावर जुनासा ड्रेस होता तिच्या. तिने गडबडीने बसायला सतरंजी टाकली. हसऱ्या, बोलक्या इंगळे बाई आत आल्या. बसल्या. पाणी पिऊन शबानाशी बोलू लागल्या.

‘‘रेश्मा गुणी आहे. शाळेत आता पूर्ण लक्ष देते ती.’’

‘‘बाई, हे तुमच्यामुळं झालं. नाय तर ही पोर शाळंत जयालाबी राजी नसायची. तुमीच जादू किली बगा.’’ शबानाने बाईंसाठी चहा बनवला.

‘‘मलाबी लई नाद होता वाचायचा. पन अम्मी गेली आणि माझी शाळा सुटली. रेश्मा वाचून दावती मला गोष्टी.’’ शबानाच्या डोळ्यांत बालपण दाटून आलेलं.

‘‘रेश्मा सांगते सर्व, तुम्हाला गोष्टी आवडतात म्हणून. अहो, मग तुम्हीपण वाचा की! सुरुवातीला जरा अडचण वाटते, पण सरावानं होईल सुधार. मी तुम्हाला काही छोटी पुस्तकं पाठवून देते. तुम्ही ती वाचा.’’ बाईंच्या या बोलण्यावर शबाना खूश झाली.

सगळ्यात जास्त आनंद रेश्माला झाला होता. तिच्या आवडत्या बाई तिच्या घरी आल्या, चहा प्यायल्या. मैत्रिणीसमोर ऐट मारायला तिला चान्स मिळणार होता आणि तिची लाडकी अम्मीही आता पुस्तक वाचणार होती.

आता त्या घरात दोघी दोघी पुस्तक वाचत होत्या. बाई आवर्जून शबानासाठीही पुस्तकं निवडून पाठवत होत्या. रेश्मा आणि रेहाना अम्मीच्या कामात तिला मदत करत होत्या. पुस्तकवाल्या बाईंनी काहीतरी जादू केली होती.

तुम्हाला समजली का ती जादू?

– फारुक एस. काझी

farukskazi82@gmail.com

First Published on February 18, 2018 1:02 am

Web Title: faruk s kazi story for kids part 2