डॉ. नंदा हरम

काजवा महोत्सवाला तुम्ही गेलात का? काजव्यांचा दीपोत्सव बघणं हा एक आनंददायी अनुभव असतो. पण बालमित्रांनो, लक्षात ठेवा की निरीक्षणाच्या वेळी काजव्यांना त्रास द्यायचा नाही की निसर्गाचा काही विद्ध्वंस करायचा नाही.

काजवे जो प्रकाश निर्माण करतात, त्याला ‘जैविक प्रकाश’ म्हणतात. तसेच त्याला ‘शीत प्रकाश’ही म्हणतात. ओळखा बरं, काय कारण असेल? सर्वच काजवे जैविक प्रकाशक्षम नसतात, तर २००० जातींच्या काजव्यांमध्ये ही क्षमता असते. ते समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंध प्रदेशात आढळतात.

प्रकाश निर्माण करायला ऊर्जेची गरज असते, हे तर तुम्हाला ठाऊक आहे. मग हे काजवे कुठून आणतात ही ऊर्जा? ही असते रासायनिक ऊर्जा. ल्युसिफेरिन नावाचा रासायनिक घटक असतो. ल्युसिफरेज हे विकर ल्युसिफेरिनवर अ‍ॅडिनोसिन ट्रायफॉस्फेट (ATP, ऊर्जास्रोत), मॅग्नेशियम आयन्स आणि ऑक्सिजनच्या उपस्थितीत प्रक्रिया करतं आणि प्रकाशाची निर्मिती होते. प्रजातींप्रमाणे प्रकाशाचा रंग फिकट लाल, हिरवा व पिवळा असतो. तसेच प्रकाशनिर्मिती करणाऱ्या अवयवाची काजव्याच्या शरीरातील स्थिती (Position) वेगवेगळी असते.

काजवे जो प्रकाश निर्माण करतात, तो एका सेकंदात कितीदा आणि किती वेळा चमकतो, याचं एक सांकेतिक स्वरूप असतं. चित्रात दाखविल्याप्रमाणे हे स्वरूप प्रजातींप्रमाणे बदलतं. त्यामुळेच याचा उपयोग काजवे एकमेकांशी संपर्क साधण्याकरिता तसेच जोडीदार शोधण्याकरिता करतात.

उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या फोटय़ुरिस (Photuris) आणि फोटिनस (Photinus) या काजव्याच्या दोन प्रजाती आढळतात. फोटय़ुरिस प्रजातीची मादी फोटिनस मादीच्या प्रकाशाच्या पॅटर्नची नक्कल करू शकते. त्यामुळे ती फोटिनस नराच्या चमकण्याला प्रतिसाद देते. तो नर जवळ येताच त्याच्यावर झडप घालून खाऊन टाकते. अर्थात केवळ अन्न मिळविणे हा उद्देश नसून, फोटिनस नराच्या रक्तात असलेलं ल्युसिबुफॅजिन (Lucibufagin) हे प्रभावी विष मिळवणं हा असतो. हे विष स्वसंरक्षणार्थ पक्षी, कोळी, मुंग्या व तत्सम भक्षकांच्या विरोधात वापरता येते. फोटिनस नरावर हल्ला झाला की हे विष छोटय़ा थेंबाच्या रूपात बाहेर पडतं (चित्र पाहा) फोटय़ुरिस मादींनी या नराचं भक्षण केलं की ते विष त्या शोषून घेतात. त्यांना स्वरक्षणाकरिता तर फायदा होतोच; शिवाय पुढच्या पिढीतही सुरक्षा यंत्रणा संक्रमित होते.

या मादी काजव्यांना फमफटल (femme fatale – फ्रेंच शब्द) म्हणतात. याचा अर्थ ‘प्राणघातक मादी!’ किती सुयोग्य आहे ना? अशी धूळफेक आणखी कोणाला जमेल?

nandaharam2012@gmail.com