29 January 2020

News Flash

ज्वलनशील पदार्थाची गंमत

श्रावण संपला आणि भाद्रपदात येणाऱ्या महालक्ष्मी आणि गणेशाच्या आगमनाची तयारी घराघरात सुरू झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

नीलिमा न्यायाधीश

श्रावण संपला आणि भाद्रपदात येणाऱ्या महालक्ष्मी आणि गणेशाच्या आगमनाची तयारी घराघरात सुरू झाली होती. घरातली सगळी मंडळी जमणार हे निश्चित होतं. सगळे जण त्या दिवसांची वाट पाहत होते. एकदाचा गौरी आगमनाचा दिवस उजाडला. घरात सगळेच जमले होते. त्यात निशाआजी सगळ्यात प्रसिद्ध. सुबक रांगोळी, गौरीपुढची सजावट, सुंदर फुलांची आरास, गौरीचे दागिने.. असं सगळं करताना तिचा सल्ला मोलाचा असतो. बाकी अनिताआजी, मेघनाकाकू, संपदाआत्या, सगळे काका होतेच गौरीच्या दिमतीला.

अवंती, अंतरा, अमेय, अनुजा, अनुराग, सगळीच ‘अ’च्या नामावलीतील नातवंडं, त्यांची तर खास मजा! कारण सगळे तीन दिवस एकत्र राहणार होते. मस्ती, खादाडी, झोप सगळंच सोबत होणार होतं. या तीन दिवसांत फक्त अभ्यास करायचा नाही असाही नियम असल्यामुळे बच्चे कंपनी खूश!

पहिला दिवस- गौरी थाटात मिरवत घरी आल्या, उद्या पूजा होती ती मोठय़ा काका-काकूंच्या हस्ते. पुजेची तयारी चालू होती. कापूर काढून ठेवला होता बाटलीत.

नववीतला अनुराग म्हणाला, ‘‘मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. आज आपण कापूर ठेवू एका ताटलीत. त्यावर एक झाकण ठेवू या. मी ‘आबरा का डाबरा’ करणार आणि तो कापूर उद्या सकाळी गायब झालेला असेल. तुम्ही रात्रभर जागून लक्ष ठेवलंत तरी चालेल.’’

‘‘चल, काहीतरीच काय? ही कोणती जादू? तू तो कापूर तिथून उचलून दुसरीकडे ठेवून देशील आमच्या नकळत. शिवाय आम्ही कुठे जागणार रात्रभर!’’

‘‘अरे खरंच! ही जादू आहे.’’ अनुराग म्हणाला.

नववीतला अनुराग अवंती, अमेय यांच्यावर नेहमी दादागिरी करायचा. कारण अवंती सहावीत व अमेय पाचवीत शिकत होते. अंतरा आणि अनुज अजून तसे लहानच होते. अनुक्रमे चार आणि सहा वर्षांचे- अगदीच बाल गटातले!

अनुराग सगळ्यांना वेगवेगळ्या गमतीजमती सांगायचा. पण आज मात्र त्यांची वादावादी सुरू झाली. आवाज ऐकून निशाआजी तिथे आली आणि अनुरागची गंमत कळल्यानंतर आता ‘मीच तुम्हाला एक गंमत सांगते,’ असं सांगत तिने सगळ्यांना खाली बसायला सांगितलं.

मुलं निशाआजी भोवती जमली. आजीने सुरुवात केली.

‘‘पेट्रोल कुठे मिळतं रे गाडीत टाकायला?’’

‘‘हं.. हा काय प्रश्न आहे?’’ असं म्हणत सगळी मुलं एका आवाजात ओरडली- ‘‘पेट्रोलपंपावर.’’

‘‘बरोबर.’’ आजी उत्तरली.

‘‘पेट्रोलपंपावर काय लिहिलेले असते?’’ -आजीचा प्रश्न.

‘‘पेट्रोलपंपावर सिगारेट, विडी ओढू नका.’’ अनुराग म्हणाला. आतापर्यंत संपदाआत्या आणि रोहनकाकाही आजीजवळ बसले. तेही तिथे बसलेच.

‘‘अगदी बरोबर अनुराग. चांगलं निरीक्षण करतोस.’’ अनुरागची कॉलर टाइट झाली.

‘‘पण ते तसं का लिहिलेलं असतं हे कळलं का?’’ आजीने विचारलं.

‘‘माहीत नाही बुवा, पण ते असतं.’’ अनुराग म्हणाला. आजीला हसूच आलं.

‘‘अरे, कारण पेट्रोल हा खूप ज्वलनशील पदार्थ आहे.’’

‘‘अगं, हो ना अंतरा. तूपसुद्धा तेलासारखंच मंद गतीने जळतं. शांत समईतील तेल किंवा तुपाचा दिवा जळताना पाहणे आपल्याला छान वाटतं, म्हणून आपण देवाची पूजा करताना दिवा लावतो.’’ आजी पुढे सांगू लागली.

‘‘ज्या गॅसवर आपण स्वयंपाक करतो तो गॅसही ज्वलनशील आहे, पण त्याला जाळण्याकरिता आपल्याला लायटर लावावा लागतो आणि तो गॅस त्या सिलेंडरमध्ये खूप दाब देऊन द्रवरूपात भरलेला असतो.’’

‘हा गॅस म्हणजे ‘एलपीजी’ ना गं आजी.’’ अनुरागने आपलं ज्ञान पाजळलं.

‘‘अगदी बरोबर अनुराग!’’

‘‘एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस- ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन या मूलद्रव्याची बनलेली संयुगे असतात. जी जळतात त्यांना हायड्रोकार्बन असं म्हणतात. पण आपल्या दुचाकी आणि चारचाकीमध्ये मात्र आपण पेट्रोल किंवा डिझेल टाकतो, जे याच पद्धतीचे पदार्थ असतात. म्हणजे हायड्रोकार्बनच, पण वेगवेगळे.’’

आजी काहीतरी महत्त्वाचं सांगते आहे हे सगळ्यांना कळत होतं.

‘‘हे हायड्रोकार्बन आपल्याला जमिनीतून मिळतात, त्यांना तेथे बनण्यासाठी लाखो वर्षे लागलेली असतात, म्हणून त्यांचा वापर आपण संभाळून करायला हवा. कारण आपण जर या हायड्रोकार्बनना (म्हणजेच पेट्रोल, डिझेल यांना) भराभर वापरून टाकलं तर ते संपून जातील आणि त्यांना पुन्हा तयार व्हायला खूप खूप वर्षे लागतील. या पदार्थाना आपण फॉसिल फ्युएल्स म्हणतो, जे जमिनीत आतल्या बाजूला जास्त दबावामुळे मृत प्राण्यांच्या आणि झाडांच्या अवशेषापासून बनलेले असतात.

‘‘पण आजी, हेच जळतं ना गं आपल्या गाडय़ांमध्ये.’’ – इति अनुराग.

अवंती, अमेयला कळलंच नाही. ‘‘ज्वलनशील म्हणजे काय गं आजी?’’ दोघेही एकदम ओरडले.

‘‘अरे, एकदम जळतो ना तो पदार्थ.’’ -इति आजी.

‘‘म्हणजे काय आजी? असेही पदार्थ असतात का ज्यांना जळण्यासाठी वेळ लागतो.’’ अवंतीने विचारले.

प्रत्येकाची उत्सुकता आता ताणली होती. ‘‘ए आजी, जरा नीट सांग ना गं या पदार्थाबद्दल!’’ अनुराग म्हणाला.

अंतरा, अनुज आजीच्या मांडीवर जाऊन बसायचा प्रयत्न करायला लागले तेव्हा संपदाआत्यांने अनुजला जवळ बसवून घेतले. रोहनकाकांनी अंतराला आपल्या मांडीवर बसवले.

आजी म्हणाली, ‘‘ऐका तर मग! अरे आपल्या भोवतीचे बरेच पदार्थ जळू शकतात, पण सगळे पदार्थ जळत नाहीत हे निश्चित. पण जे पदार्थ जळतात त्यांची जळण्याची तऱ्हा मात्र वेगळी वेगळी आहे. त्यांचे जळण्याचे तापमानही वेगळे!’’

‘‘ए आजी, जरा उदाहरण देऊन सांग ना!’’ अमेय उद्गारला.

‘‘अरे हो, तेच सांगते आहे. ऐका आता..’’ आजी रंगात यायला लागली होती.

‘‘हे बघा, आपण आपल्या भोवती कितीतरी पदार्थ जळताना पाहतो. उदाहरणार्थ, आपण रोज संध्याकाळी घरी देवाजवळ दिवा लावतो. त्यात घरी खायचे तेल घातलेले असते व त्यात वात लावून आपण दिवा पेटवतो. याचा अर्थ असा की, हे खायचे तेल- मग ते शेंगदाणा, करडई किंवा सूर्यफुलाचे तेल असेल- ते खूप जास्त ज्वलनशील नाही म्हणून त्याला वातीची गरज पडते. त्या वातीवर थोडं थोडं तेल जळत राहतं आणि वातीतील कापसावर ते तेल येत राहतं जळण्याकरिता.’’

‘‘ए आजी, तुपाचाही दिवा लावतात ना गं!’’ अंतराच्या लगेच लक्षात आलं.

‘‘अरे हो अनुराग, यांच्या ज्वलनामुळे आपल्याला ऊर्जा मिळते वेगवेगळ्या रूपात. शिवाय त्यापासून आपले जेवणही तयार होते. ‘‘पण आजी, जुन्या काळी म्हणे गॅस नव्हताच.’’ अमेय अचानक बोलायला लागला.

‘‘हो रे अमेय! तेव्हा चुलीवर किंवा शेगडीवर स्वयंपाक तयार व्हायचा.’’  संपदाआत्या म्हणाली.

‘‘हो, ते चुलीत जळणारे लाकूड किंवा शेगडीत जळणारा कोळसा हेही ज्वलनशील पदार्थच आहेत. फक्त त्यांची क्षमता कमी आहे, पण लाकूड जाळले म्हणजे झाडे तोडली जातात. म्हणजे त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. लाकूड किंवा कोळसा जाळल्यानंतर हवाही दूषित होते. लाकूड लवकर जळतही नाही.’’आजीने मुलांना माहिती पुरवली.

‘‘म्हणूनच आजकाल लाकूड चुलीत जाळणे हे बऱ्यापैकी कमी झाले आहे.’’ संपदाआत्या म्हणाली.

‘‘आपल्याकडे पूजेसाठी कुंड पेटविताना त्यामध्ये वर तूप घालून कोळसा जाळतो, माहिती आहे ना तुम्हाला!’’ आजीने माहिती पुरवली.

‘‘पण आजी, अनुदादाने कापूर गायब करायची गंमत सांगितली होती. ते तर रहिलेच.’’ अमेयच्या डोक्यातला कापूर काही निघत नव्हता.

‘‘अरे हो की!’’ आजी म्हणाली.

‘‘आता घन कापूर का गायब होतो, तर त्याचे संप्लवन (sublimation) होते.’’

‘‘म्हणजे काय?’’ सगळे एकसुरात ओरडले.

‘‘अरे सांगते ना! कापूर हाही ज्वलनशील पदार्थ आहे. आपण देवाची कापूर आरती करतो ना! पण या कापरामध्ये अजून एक कला आहे. ती म्हणजे कापूर हा घन रूपातून सरळ वायुरूपात जातो, म्हणजेच उडून जातो. म्हणजेच नाहीसा होतो.  यालाच संप्लवन म्हणतात. अनुराग तुम्हाला जी जादू दाखवणार होता त्याच्यामागे शास्त्र आहे, हो ना अनुराग?’’ आजीने विचारले.

‘‘हो गं आजी, मी आताच वर्गात हे शिकलो होतो म्हणून म्हटलं की यांची जरा गंमत करावी.’’ अनुराग म्हणाला.

‘‘अरे अनुराग, पेट्रोल हाही लवकर द्रवरूपातून वायुरूपात जाणारा पदार्थ आहे. म्हणजेच पेट्रोल हा व्होलाटाईल पदार्थ आहे. शिवाय तो लवकर जळणारा म्हणजेच ज्वलनशीलही आहे. म्हणून पेट्रोलपंपावर सिगारेट, बिडी पेटवायची नाही. कापूसही जळतो, पण त्यात हायड्रोकार्बन नाही बरं का अनुराग.’’ आजी उद्गारली. नाही तर मित्रांवर शायनिंग मारण्याकरिता त्यांना सांगशील तसे.’’ असे आजीने म्हणताच अनुराग लाजलाच आणि बाकीचे सगळे हसायला लागले..

First Published on September 8, 2019 1:59 am

Web Title: flammable substance fun abn 97
Next Stories
1 गजाली विज्ञानाच्या : आलिया भोगासी, असावे सादर!
2 तू सुखकर्ता..
3 एकच वाघ!
Just Now!
X