कुहूला तिच्या टुमदार घराभोवतालची बाग खूप खूप आवडायची. पांढराशुभ्र मोगरा, रंगीबेरंगी गुलाब, जर्बेरा, पिवळे-केशरी झेंडूचे वाफे, सोनचाफा.. अशी कित्तीतरी फुलं तिच्या बागेत नेहमी बहरलेली असायची. कुहू सगळ्या झाडांना रोज पाणी घालायची, फुलांशी भरपूर गप्पा मारायची, त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवायची आणि बागेतल्या झोपाळ्यावर बसून गोड गोड गाणी गायची. ती गायला लागली की फुलं, पानं, झाडं.. सगळीच जणू डोलायची. पोपट विठुविठु करायचा, कोकिळ कुहू कुहू करायचा. तेव्हा तर कुहूला वाटे की कोकीळ तिच्याशीच गप्पा मारतोय..

एकदिवस कुहू बागेत बॉलशी खेळत असताना, बॉल तिच्या हातून निसटून बागेच्या कुंपणावर लावलेल्या काटेरी निवडुंगाच्या झुडपांमध्ये गुडूप झाला. अलीकडेच तिच्या आईने ही निवडुंगाची झाडं कुंपणाजवळ लावली होती. खरं तर या निवडुंगाच्या काटय़ांची कुहूला खूप भीती वाटायची. पण बॉल शोधण्याच्या नादात कुहू कुंपणाजवळ गेली आणि तिच्या दोन्ही हातांना निवडुंगाच्या काटय़ांमुळे चांगलंच खरचटलं. त्यामुळे ती रडतच घरांमध्ये पळत गेली.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

इथे कुहूला खरचटल्याचं पेरूच्या झाडावर बसलेल्या पोपटदादांनी पाहिलं. त्यांनी तडक ही बातमी फुलपाखरांना दिली. त्यांच्याकरवी ती बागभर पसरली.

‘‘काय रे, कुहू बॉल घेताना तुला तुझ्या काटय़ांना थोडं बाजूला नाही का करता आलं?’’ बातमी ऐकल्यावर निवडुंगाच्या शेजारीच असलेल्या गुलाबाच्या झाडाने त्याला चांगलंच फैलावर घेतलं.

‘‘मी कुठे काय केलंय? मला काटे आहेत तर ते लागणारच!’’ निवडुंग मुद्दाम त्याच्या आवाजात स्वाभाविकपणा आणत म्हणालं.

‘‘काटे मलापण आहेत. पण कुहू जेव्हा माझं फूल खुडायला येते, तेव्हा तिला लागू नये म्हणून मी काळजीपूर्वक माझे काटे तिच्यापासून दूर ठेवतो. तिला आत्तापर्यंत एकदाही माझा काटा बोचलेला नाहीये. नाहीतर इथे काल-परवा आलेला तू! एकतर एकलकोंडा राहतोस. कुणाशी बोलत नाहीस. लगेच आमच्या कुहूला त्रास मात्र दिलास!’’ गुलाबाच्या बोलण्याचं जवळच्या इतर झाडांनीही समर्थन केलं.

‘‘मुळात फुलं खुडूच नयेत. ती झाडावरच छान दिसतात. फुलं तोडली की आपल्याला किती इजा होते!’’ निवडुंगानं प्रत्युत्तर दिलं.

‘‘ही घरची बाग आहे! त्यातली फुलं कुणी तोडली तर काय बिघडलं? हा, सार्वजनिक बागांमधली फुलं तोडू नयेत, हे तू अगदी बरोबर म्हणतोयस. पण मुद्दा तो नाहीये. तू विषयांतर करू नकोस. कुहूने माझी फुलं तोडलेली मला खूप आवडतात. कारण ती दररोज माझी फुलं शाळेतल्या तिच्या आवडत्या शिक्षकांसाठी घेऊन जाते.’’

‘‘आणि माझी फुलं तोडून ती गजरा माळते तिच्या लांबसडक वेण्यांमध्ये. आम्हालाही जाम आवडतं ते!’’ मोगरा गुलाबाची साथ देत म्हणाला.

‘‘पण ती येते तुमच्या सगळ्यांजवळ. तुमच्यावर किती प्रेम करते! माझ्या या घाणेरडय़ा काटय़ांना घाबरून ती माझ्याजवळ कधीच येत नाही. याचाच मला खूप राग येतो.’’ निवडुंगानं नेमकं मनातलं दु:खं बोलून दाखवलं.

‘‘तुला राग नक्की कसलाय? तुझ्या काटेरी रूपाचा की कुहू तुला घाबरते याचा?’’

‘‘दोन्हींचा! म्हणूनच तर मी मुद्दाम..’’ निवडुंगानं वाक्य अर्धवट सोडलं.

‘‘तुझ्या रूपावर इतका का चिडतोस? माझंही रूप काटेरीच आहे. पण लोक माझे गरे, भाजी किती मिटक्या मारत खातात!’’ जवळच स्वत:च्याच झाडाच्या खोडावर चिकटलेला एक फणस उद्गारला.

‘‘कुहूला मी तरी कुठे आवडतो? तिच्या आईने माझी भाजी बनवली की ती माझ्या कडू चवीमुळे लगेच नाक मुरडते. पण मला नाही राग येत तिचा!’’ कुंपणावरची कारल्याची वेल म्हणाली.

‘‘आम्ही तर चिखलात उमलतो. आम्ही काय म्हणायचं? पण आम्ही गणपतीबाप्पाला, सरस्वतीदेवीला खूप आवडतो. तसंच तुझ्या काटय़ांमध्ये तू भरपूर प्रमाणात पाणी साठवू शकतोस. म्हणून वाळवंटात तुला किती महत्त्व असतं. देवानं प्रत्येकाची भूमिका ठरवून ठेवलेली आहे.’’ कुहूच्या आईने बागेत बनवलेल्या छोटेखानी तळ्यांमधलं एक कमळ म्हणालं.

‘‘तू असा विचार कर की, तुझ्या काटय़ांमुळे तू आमचं आणि कुहूच्या घराचं संरक्षण करतोयस.’’ बराच वेळ एकाच ठिकाणी चिकटल्यामुळे थोडं ‘स्ट्रेचिंग’ करत फणस म्हणाला.

‘‘मुळात तू जे केलंस, ही सूडवृत्ती झाली मित्रा! आपल्या या निसर्गाच्या नंदनवनात प्रेम हाच एकमेव भाव असायला हवा. आपल्या जगात क्रौर्य, मत्सर या वाईट भावनांना मुळी थारा असायलाच नकोय. आपल्याकडे पाहून कुणालाही प्रसन्नच वाटलं पाहिजे.’’ गुलाब निवडुंगाला समजावत होतं.

‘‘आणि कुठल्याही परिस्थितीत आपला आत्मसन्मान का म्हणून ढळू द्यायचा? आपण स्वत:ला कधीच कमी लेखू नये.’’ कमळाने पुन्हा समजावून पाहिलं. पण यावर निवडुंग मात्र गप्पच राहिलं, आपल्याच कोषात हरवल्यासारखं.

दुसऱ्या दिवशी उजाडल्या उजाडल्या कुहू तिच्या हातांमध्ये एक मोठी परडी घेऊन बागेत आली. आज तिच्या आजीचा साठावा वाढदिवस होता. त्यासाठी कुहूला आजीकारिता ‘स्पेशल’ पुष्पगुच्छ बनवायचा होता.

पहाटेच पावसाची हलकी सर येऊन गेल्यामुळे सगळ्या पाना-फुलांवर दवबिंदू साठले होते. थोडक्यात, बाग एकदम ‘फ्रेश’ दिसत होती. त्यात कुहू बागेत येण्याची वर्दी आधीच पोपटदादांनी फुलपाखरांकरवी दिल्यामुळे सगळी बाग आणखीनच आनंदात होती.

कुहूने नुकतेच उमललेले काही लाल आणि पांढरे गुलाब हळुवारपणे तोडले. पिवळी आणि गुलाबी जरबेऱ्याची फुलं तिनं वेचून तोडली. थोडी झेंडू, सदाफुली, मोगरा आणि प्राजक्ताची फुलंही घेतली. फर्न, बोगनवेल, कर्दळीच्या झाडांची पानं तोडली. अशी बरीच फुलं आणि पानं गोळा करून ती बागेतल्या झोपाळ्यावर बसली. सगळी फुलं-पानं व्यवस्थित निवडून तिनं तिच्या परडीमध्ये छानपैकी सजवली. लाल, गुलाबी, पिवळ्या, केशरी, हिरव्या, पांढऱ्या अशा वेगवेगळ्या रंगांमुळे तिची परडी अगदी आकर्षक दिसत होती. तरी कुहूचं काही केल्या समाधान होईना. तिचे डोळे सारखं काहीतरी शोधत होते. अख्खी बाग हुडकून काढली तरी तिला तिच्या आजीच्या आवडीच्या जांभळ्या रंगाचं एकही फूल मिळेना.

शोधत शोधत ती कुंपणापाशी आली आणि तिचे डोळे एकदम चमकले. आईने नवीनच लावलेल्या त्या निवडुंगाला जांभळ्या रंगाची दोन सुरेख फुलं उमलली होती. फुलांचा सुगंधही खूपच मनमोहक होता. निवडुंगासारख्या काटेरी झाडालाही इतकी सुंदर फुलं येतात, हे कुहूला माहीतच नव्हतं. तिला आता ती फुलं तोडायचा मोह आवरेना. मात्र काल लागलेल्या काटय़ांमुळे ती थोडी घाबरली. पण कुणाला घरातून बोलवायचाही तिला आता धीर नव्हता. मग अलगदपणे काटय़ांना सांभाळत ती त्या निवडुंगाच्या फुलांजवळ गेली आणि हळुवारपणे तिने ती दोन्ही फुलं तोडली, तसं निवडुंग एकदम शहारलं.

कुहूने तिच्या परडीमध्ये ती दोन्ही जांभळी फुलं सर्वात मधोमध रचली. तिची ‘फुलांची परडी’ आता अगदी तिच्या मनासारखी सजली होती. परडी घेऊन ती गाणं गुणगुणत घरांमध्ये पळाली.

निवडुंगाच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. त्याला त्याच्याभोवती गुंजन करणाऱ्या फुलपाखराची एकदम जाणीव झाली.

‘‘निवडुंगा, मित्रा, कुहूच्या परडीप्रमाणे आपली बागसुद्धा एक परडीच आहे. इथे सुंदर, कुरूप, काटेरी, मखमली असा कुठलाच भेद नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण ही बागेची परडी सजवतो. पटलं नं तुला आता?’’ असं म्हणत ते फुलपाखरू निवडुंगाच्या काटय़ांवर अलगद विसावलं.

निवडुंगही मनापासून हसलं. ते आता त्याच्या न्यूनगंडाच्या कोषातून संपूर्णपणे बाहेर पडलं होतं. अगदी कायमचं!

mokashiprachi@gmail.com