News Flash

फुलांच्या विश्वात : राज्यफूल तामण

तामणाची साल गुळगुळीत असते. या सालीचा देखील औषधात वापर केला जातो.

flowers world 
तामणाचे फूल आकाराने मोठे आणि त्याला ६ पाकळ्या असतात

उन्हाळा सुरू झाला की आपसूकच तामणाची आठवण येते, कारण या काळात मनमोहक फुले फुलायला सुरुवात होते आणि संपूर्ण झाडाचे शेंडे फिकट निळ्या- जांभळ्या फुलांनी भरून जातात. अत्यंत नाजूक आणि देखणं सौंदर्य लाभलेलं हे फूल. एप्रिल ते जून हा याच्या फुलांचा कालावधी आहे

तामण ही भारतीय वंशाची एक वनस्पती. Lagerstroemia speciosa (लाजरस्ट्रोमिया स्पेसिओसा) हे त्याचं शास्त्रीय नाव. तामण ही वृक्ष वर्गातील वनस्पती असून याची उंची अंदाजे ५० फुटांपर्यंत असू शकते. शोभेची वनस्पती म्हणून याची लागवड केली जाते; त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी याची छाटणी करून उंची मर्यादित ठेवली जाते. याला ‘जारूळ’ असे देखील म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Pride of India आणि Queen crape Myrtle अशी सुंदर नावे आहेत.

तामणाचे फूल आकाराने मोठे आणि त्याला ६ पाकळ्या असतात. याच्या पाकळ्या अत्यंत पातळ अतिशय नाजूक असतात. या पाकळ्या जणू काही क्रेप पेपरने बनविल्या आहेत अशा दिसतात. अत्यंत नाजूक आणि सुंदर दिसणाऱ्या या फुलाला हलकासा सुगंध येतो. फुले गुच्छाने येतात. झाडाच्या शेंडय़ाला फुलांचे घोस येतात. फुले कोमेजली की ती गळून खाली पडतात नि लगेच सुकतात. गुच्छात जुनी फुले खाली तर नवीन फुले आणि कळ्या वरच्या बाजूला असतात. तामणाची पाने मोठी, लांबट नि हिरव्या रंगाची असतात. याची पाने औषधी असून या पानांपासून बनविलेला चहा औषधी असतो. या पानांमध्ये इन्सुलिन असते. कोवळ्या पानांपेक्षा पक्व पानांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असते. वेगवेगळ्या रोगांवर औषध म्हणून याचा वापर केला जातो. विशेषकरून मधुमेहावर ही पाने गुणकारी आहेत. तसेच तापात देखील ही पाने गुणकारी आहेत.

तामणाची साल गुळगुळीत असते. या सालीचा देखील औषधात वापर केला जातो. फुले गळून पडली की याला घुंगरांच्या आकाराची फळे येतात. सुरुवातीला ही फळे हिरवी असतात आणि पक्व झाली की ती चॉकलेटी होतात. त्यात पातळ चपटय़ा बिया असतात. या फळांच्या आकारावरून तामणात छोटे घुंगरू, मध्यम घुंगरू आणि मोठे घुंगरू असे तीन प्रकार पडतात. फळे पूर्ण पिकली की झाडावरच तडकतात आणि त्यातून पातळ बिया हवेवर उडून जातात. बियांना पातळ पंखासारखा भाग असतो. याच्या नवीन रूपांची निर्मिती बियांपासून तसेच फांदी आणि मुळांपासून देखील करता येते.

तामणाचे फूल हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. याच्या फुलाचे सौंदर्य इतके की भारत सरकारच्या टपाल खात्याने देखील ही फुले असलेले पोस्टाचे तिकीट काढले आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरात तामणाची खूप झाडे आहेत. तामणाच्या झाडाच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहेत.  फिलिपाइन्स या देशात पारंपरिक औषधात तामणाच्या प्रत्येक भागाचा वापर केला जातो. अनेक रोगव्याधींवर औषध म्हणून तामणावर अनेक संशोधने झाली आहेत. तामणाचे लाकूड मजबूत असून इमारत बांधणी, जहाज बांधणी, पूल बांधणी तसेच रेल्वे स्लिपर्स बनविण्यासाठी तसेच सरपणासाठी देखील याच्या लाकडाचा वापर केला जातो. आपल्या सुंदर फुलांमुळे बगीचा, घराचे आवर या ठिकाणी स्थान मिळालेला तामण वृक्ष आपल्याही सोसायटी, शाळांच्या आवारात असायलाच हवा.

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2017 2:09 am

Web Title: flowers world most beautiful flowers in the world
Next Stories
1 जीवचित्र : च्यांव म्यांवऽऽ
2 शंखोबा
3 जलपरीच्या राज्यात : या बर्फाखाली दडलंय काय?
Just Now!
X