आजच्या बहुतांश बच्चेकंपनीला किल्ले माहिती असतात ते इतिहासाच्या पुस्तकात पाहिलेले, किंवा मग मोबाइलवरच्या फोर्ट कॉन्कर किंवा असल्याच कुठल्यातरी गेम्समधले. मात्र, यंदाच्या दिवाळीत काही लहानग्या एकत्र आल्या आणि त्यांनीच उभारले दगड, विटा, माती, चिखल यांतून अस्सल भुईकोट किल्ले. दगड-विटा रचायच्या. मातीत पाणी ओतून त्याचा चिखल करायचा आणि त्याचा वापर करून किल्ला उभारायचा.. यातली मजा काही औरच. किल्ला बांधला की त्याच्या बंदोबस्तासाठी मोक्याच्या जागी मावळे उभे करायचे. मोहरी पेरून त्या किल्ल्यावर रान उगवू द्यायचे. पायथ्याशी एखादे तळे तयार करायचे.. हा खेळ कमालीचा आनंददायी. हा आनंद या किल्लेदार मुलींनी यंदा घेतला. मग काय, पुढच्या वर्षी तुम्हीही होणार ना किल्लेदार..?