हिरव्या टेकडीवर खूप ससे, हरणं, कबुतरं, पोपट असे प्राणी व पक्षी राहत असत. त्या सगळ्यांची एकमेकांशी खूप दोस्ती होती. सगळे जण तिथे अगदी आनंदानं राहत. टेकडीवरचे जंगल तर त्यांचं अगदी आवडतं ठिकाण होतं. त्या जंगलात खूप हिरवळ आणि झाडे होती. टेकडीच्या बाजूने एक नदी वाहत होती, तर वर एक छोटंसं तळं होतं. तळ्याकाठी वडाची झाडं होती. त्याच्या पारंब्यांशी खेळता येत असे. झाडांच्या सावलीत आरामही करता येत असे. लपाछपी खेळताना लपून बसायला खूप जागा होती.
..असं आनंदी वातावरण असलेल्या टेकडीवर एकाएकी भीतीचं वातावरण निर्माण झालं. दोन-चार दिवस रोज त्यांच्यापकी एकेक प्राणी गायब होऊ लागला. सगळेजण घाबरले आणि यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी तळ्याकाठी एकत्र जमले. टेकडीवर कोणी मोठा प्राणी आला आहे आणि तो शिकार करत आहे, अशी शंका त्यांच्या मनात यायला लागली. तेवढय़ात चार-पाच पोपट तिथे आले आणि त्यांनी टेकडीच्या एका कपारीत सिंह बसल्याचे सांगितलं. सिंहाला ते सगळे प्राणी खूप घाबरत असत. तो सिंहच रोज त्याच्यांपकी कोणाला ना कोणाला खात असणार याबद्दल त्यांची खात्री पटली. आता काय करावे, यावर सर्वाची खूप चर्चा झाली. खूप उपाय सुचवले गेले, पण कोणाला ते पसंत पडले नाहीत. काय करावे काही सुचेना. शेवटी एका हुशार सशाने सुचवलेली युक्ती करून बघायची ठरली. त्याप्रमाणे सगळेजण कामाला लागले.
त्या युक्तीप्रमाणे तळ्याकाठच्या एका वडाच्या झाडामागची जागा निश्चित केली गेली. माकडांनी भराभर वडाच्या पारंब्या तोडून दिल्या. काही प्राण्यांनी त्याची जाळी तयार करून ती जमिनीवर पसरली. हरणांनी जंगलातल्या खाज सुटणाऱ्या काटेरी झाडांच्या फांद्या आणून त्यावर टाकल्या. इतर प्राणी व पक्ष्यांनी हिरवी पाने तोडून आणली आणि ती जाळीवर पसरून टाकली. सगळी तयारी झाल्यावर ससा कपारीत बसलेल्या सिंहाकडे गेला व त्याला विनवणी करून म्हणाला, ‘‘तू कृपा करून आमच्यापकी कोणाची शिकार करू नकोस. तुला कोणता प्राणी हवा आहे ते सांग, म्हणजे तो प्राणी स्वत:हून तुझ्याकडे येईल.’’ सिंहाला ही कल्पना फारच आवडली. काही श्रम न करता अनायसे त्याला त्याचे खाणे मिळणार होते म्हणून तो खूश झाला.
सशाने त्याला विचारले, ‘‘आज कोणता प्राणी पाठवू?’’
सिंह म्हणाला, ‘‘बऱ्याच दिवसांत मी हरणाची शिकार केलेली नाही. दरवेळी ती दूर पळून जातात. आज तू माझ्या जेवणासाठी हरणाला पाठव.’’
ससा म्हणाला, ‘‘बरं! घेऊन येतो हरणाला.’’
इकडे ससा तळ्याकाठी आला व पाण्याने आपले अंग ओले केले. मग तो मातीत जाऊन लोळला. त्याचे सगळे अंग चिखलाने माखल्यावर तो पळत पळत सिंहाकडे आला.
सिंह हरणाची वाट बघत बसला होता; पण ससा एकटाच आलेला बघून तो रागावला. ससा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, ‘‘मी हरणाला घेऊन येत होतो तर वाटेत तुझ्यापेक्षा मोठा सिंह भेटला आणि त्याने हरणाला खाऊन टाकलं. तर आता तू मला खाऊन टाक.’’
सिंह खूप चिडला. तो म्हणाला, ‘‘तुला खाऊन माझं पोट थोडंच भरणार आहे. आणि असला घाणेरडा चिखलाने माखलेला प्राणी तर मला अजिबात नको. तू मला आधी तो दुसरा सिंह कुठे आहे ते दाखव.’’
सशाला तेच पाहिजे होतं. तो सिंहाला घेऊन प्राण्यांनी जाळी पसरून तयार केलेल्या जागी घेऊन गेला व म्हणाला, ‘‘तू इथे झाडामागे लपून बस म्हणजे तुला तळ्याकाठी बसलेला दुसरा सिंह दिसेल.’’
सिंह त्या हिरव्यागार गवतावर गेला. तिथे त्याच्या अंगाला गवताखालचे काटे टोचायला लागले. अंगाला खाज यायला लागली आणि तो गवतावर गडाबडा लोळायला लागला.   सशाचा डाव त्याच्या लक्षात आला. आपली फजिती झाली आहे हे लक्षात येताच त्याने जंगलाकडे जी धूम ठोकली, की तो पुन्हा त्या टेकडीकडे फिरकला नाही.
सशाची युक्ती सफल झाली. सगळ्या प्राण्यांनी त्याचे आभार मानले व त्याच्या युक्तीचे कौतुक केले. त्यानंतर सगळे प्राणी-पक्षी हिरव्या टेकडीवर पहिल्यासारखे आनंदाने राहू लागले.