News Flash

मैत्री

आता कोणत्याही क्षणी शाळेची बस येणार होती, पण बससाठी उभ्या असलेल्या अनयला आज शाळेत जावंसंच वाटत नव्हतं.

आता कोणत्याही क्षणी शाळेची बस येणार होती, पण बससाठी उभ्या असलेल्या अनयला आज शाळेत जावंसंच वाटत नव्हतं. त्यानं आईला सांगूनही पाहिलं, ‘‘आई, मला बरं नाही वाटत. आज सुट्टी घेऊ शाळेला?’’ पण आईने त्याला सुट्टीची अजिबात परवानगी दिली नाही. परीक्षाही जवळ आली होती ना! क्षणभर त्याला वाटलं की, आईला खरं खरं सगळं सांगूनच टाकू या. पण मग त्याने विचार केला, नकोच. उगाच तिला कशाला त्रास? आणि ती रागावली आणि म्हणाली की, ‘नसते उद्योग कशाला करतोस,’ तर काय करायचं! त्याने शेवटी आईला काहीच सांगितलं नाही. शाळेची बस आली. अनय बसमध्ये बसला. आता मात्र त्याला अजूनच भीती वाटू लागली, आता काय होईल शाळेत? शाळेतल्या बाई काय म्हणतील? मुख्याध्यापकांकडे घेऊन जातील? पुन्हा आईला फोन करून बोलावून घेतील? सगळे काय म्हणतील? अनयला खात्री होती की, जीतने ‘ती’ गोष्ट नक्कीच त्याच्या आईला सांगितली असणार आणि आज जीतची आई शाळेत बाईंना भेटायला येणार. बसमध्येच रडू येणार की काय असं वाटू लागलं अनयला. आतापर्यंत आपण जसं वागलो त्याची शिक्षा अजूनही मिळणार की काय, या भीतीने तो अधिकच घाबरला.
अनय इयत्ता सातवीत शिकत होता. अगदी बालवाडीपासूनच खूप मस्तीखोर मुलगा म्हणून अनय सगळ्यांना माहीत होता. कुणाला पेन्सिलची टोक टोच, कुणाला चिमटा काढ, कुणाची बॅग फेक, नाही तर कुणाची पाण्याची बाटलीच फेकून दे.. या अनयच्या उद्योगांनी सगळे वैतागले होते. एकदा तर अनयने एका मुलाला धक्का दिला म्हणून त्याच्या डोक्याला खोक पडली आणि टाके घालावे लागले होते. अनयचे आई-वडीलही त्याच्याबद्दलच्या तक्रारींनी हैराण झाले होते. मग अनयला खूप समजावलं. त्याची एनर्जी चांगल्या गोष्टींमध्ये खर्च व्हावी म्हणून त्याला फुटबॉल खेळायला पाठवलं. आता मोठा झाल्यावर अनयची मस्ती आणि त्याच्याबद्दलच्या तक्रारी बऱ्याच अंशी कमी झाल्या होत्या. अनयही समजूतदार झाला होता, पण म्हणतात ना ‘एकदा कानफाटय़ा नाव पडलं की पडलं!’ सगळे त्याला मस्तीखोर म्हणूनच ओळखत होते. पण अनयने मात्र अगदी मनापासून ठरवलं होतं की, आपल्यावरचा ‘मस्तीखोर मुलगा’ हा शिक्का आता चांगल्या वागणुकीने पुसून टाकायचा.
अनयच्याच वर्गात शिकणारा जीत मात्र अगदी शांत, हुशार म्हणून ओळखला जात होता. अनय आणि जीत यांचं एकमेकांबरोबर कधीच पटलं नव्हतं. त्यांना तर एका बाकावरही बसायला आवडत नसे. अनयचा बडबडय़ा स्वभाव, फुटबॉल खेळताना दादागिरी करणं जीतला अजिबात आवडत नसे. मग असं असताना जीत नक्की बाईंजवळ तक्रार करणार याची खात्री होती जणू अनयला. घडलं असं, की काल वर्गात मोकळ्या तासाला सगळी मुलं दंगा करत होती. अनयही त्यांच्यात होताच. फुटपट्टीचा तलवारीसारखा वापर करत युद्धाचा खेळ सुरू होता. अनय हातातली फुटपट्टी तलवारीसारखी लढण्याची अ‍ॅक्शन करत वेगाने फिरवत होता. दोन बाकांच्या रांगांमधून मुलं खेळत होती. अनयची पट्टी खूपच जोरात जीतला लागली. जीत कळवळला. लालचुटूक वळ जीतच्या हातावर उमटला. अनय घाबरला. जीतजवळ जाऊन म्हणाला, ‘‘प्लीज, प्लीज, कुणाला सांगू नकोस. चुकून लागलं रे! मला तुला मारायचं नव्हतं. सांगणार नाहीस ना कुणाला? प्लीज..’’ पण जीत काहीच बोलला नाही. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. हातावर वळ चांगलाच दिसत होता. शेवटचा तास होता. लगेचच शाळा सुटली. जीत काही न बोलता निघून गेला. अनय घाबरला, जीतने तक्रार केली तर? मला खरंच त्याला मारायचं नव्हतं यावर कुणी विश्वास ठेवेल का? का पुन्हा माझी मस्ती करायची सवय गेली नाही असंच वाटेल सर्वाना? बसमध्ये अनयच्या डोक्यात विचारचक्र सुरूच होतं..
बस शाळेत आली. अनय जड पावलांनी वर्गात आला. जीत पहिल्या बाकावर बसला होता. अनय गुपचूप चौथ्या बाकावर जाऊन बसला. अनयचं लक्ष सारखं जीतकडे होतं. जीत मात्र काल काहीच न घडल्याप्रमाणे वागत होता. तरी अनयला भीती होती, अचानक जीतची आई आली तर?
सर्व बळ एकवटून मधली सुट्टी झाल्यावर अनय जीतबरोबर बोलायला गेला, ‘‘जीत, आय अ‍ॅम सॉरी, मला तुला मारायचं नव्हतं रे! तू.. तू.. तक्रार केलीस?’’ जीतने क्षणभर त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, ‘‘अनय, मला खूप जोरात लागलं रे, पण मला समजलं की, तू मुद्दामहून मारलं नाहीस. मग का तक्रार करू? तुला वाटत असलेली भीती मी समजू शकतो. आधीच शाळेत तुझं नाव ‘मस्तीखोर’ म्हणून खराब झालंय, त्यातच तुझी चूक नसताना पुन्हा तुझं नाव खराब होईल म्हणून मी कुणालाच दाखवलं नाही हे लागलेलं. अगदी आईलासुद्धा नाही. तुला खूप भीती वाटतेय का? नको घाबरूस, मी नाही करणार तक्रार.’’
जीतचं हे उत्तर ऐकून अनय ‘थँक्यू जीत, थँक्यू जीत,’ म्हणत राहिला आणि या प्रसंगापासून त्यांच्यात मैत्रीचं घट्ट नातं निर्माण झालं.
राजश्री राजवाडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2016 1:30 am

Web Title: friendship 6
टॅग : Kids Story
Next Stories
1 ऑफ बिट : ऐका तर खरं!
2 खेळायन : केंडामा
3 चित्ररंग :
Just Now!
X