एका बागेतील टय़ुलिप्सच्या ताटव्यांमध्ये तीन फुलपाखरं राहत असत. त्यातलं एक होतं लाल, दुसरं होतं पिवळं आणि तिसरं होतं पांढरंशुभ्र. ती फुलपाखरं दिवसभर टय़ुलिप्सच्या फुलांवर इकडून तिकडे उडय़ा मारत, सूर्यकिरणांशी खेळत आणि खेळून खेळून दमली की टय़ुलिपच्या पानांवर झोपून जात. ते तिघे कायम एकमेकांच्या बरोबर असत. एके दिवशी फुलपाखरांचा मध खाऊन झाला, टय़ुलिप्सच्या ताटव्यामध्ये लपाछपी खेळून झाली आणि उडय़ाही मारून झाल्या. ती सूर्यकिरणांची वाट बघत होती, पण त्यांचा पत्ताच नव्हता. एकाएकी अंधारून आलं आणि पाऊस सुरू झाला. मग तिघंजण पावसाच्या थेंबांशी खेळले आणि पावसात चिंब भिजले. थोडय़ा वेळानं त्यांना थंडी वाजायला लागली म्हणून ते पाऊस लागणार नाही अशी जागा शोधू लागले. उडत उडत ती एका लाल रंगाच्या टय़ुलिपच्या फुलाजवळ गेली आणि त्याला म्हणाली, ‘‘आम्हाला पाऊस लागतोय आणि थंडीही वाजायला लागली आहे, तर तू तुझ्या पाकळ्यांमध्ये आम्हाला पाऊस संपेपर्यंत बसू देतोस का?’’
त्यावर लाल टय़ुलिप म्हणाले, ‘‘तिघांना नाही, पण मी तुमच्यापकी फक्तलाल फुलपाखराला माझ्या पाकळ्यांमध्ये जागा देईन.’’
लाल टय़ुलिपच्या या उत्तरावर लाल फुलपाखरू म्हणाले, ‘‘तू मला एकटय़ाला तुझ्या पाकळ्यांमध्ये जागा दिलीस तर मग माझ्या इतर दोघा मित्रांनी कुठे जायचं? तू आम्हाला तिघांना जागा दिली नाहीस तर आम्ही दुसऱ्या फुलाकडे जातो..’’
तिघा फुलपाखरांनी आपला मोर्चा पिवळ्या रंगाच्या टय़ुलिपकडे वळवला; पण त्याने लाल टय़ुलिपसारखेच उत्तर दिले. ते पिवळ्या फुलपाखराला म्हणाले, ‘‘मी फक्त तुला एकटय़ाला माझ्या पाकळ्यांमध्ये जागा देईन.’’
पिवळे फुलपाखरू लाल आणि पिवळ्या टय़ुलिपच्या फुलांना म्हणाले, ‘‘आमच्या तिसऱ्या मित्राला जर जागा देत नसाल तर आम्ही तिघे पावसात भिजू; पण त्याला एकटे सोडणार नाही.’’
आता काय करावे? कोठे जावे? असा विचार करत असतानाच त्यांना टय़ुलिपच्या बागेच्या कडेला उमललेले पांढऱ्या लीलीचे फूल दिसले. त्यांनी लीलीच्या फुलाला विचारले, ‘‘पाऊस थांबेपर्यंत आम्हाला तिघांना तुझ्या पाकळ्यांमध्ये बसायला जागा देशील का?’’ त्यावर लीली म्हणाली, ‘‘हो. देईन जागा; पण फक्त पांढऱ्या फुलपाखराला. तुम्ही दोघांनी दुसरीकडे जागा शोधा.’’
लीलीच्या या उत्तरावर तिन्ही फुलपाखरे अगदी हिरमुसली झाली आणि आपल्या नेहमीच्या जागी- टय़ुलिपच्या पानामागे जाऊन बसली. पण तिथे पाऊस लागतच होता. पावसामुळे त्यांना आता खूपच थंडी वाजायला लागली होती. ऊब येण्यासाठी मग ती तिघं एकमेकांना बिलगून बसली.
ढगांच्या मागे लपलेला सूर्य फुलांचे आणि फुलपाखरांचे सगळे बोलणे ऐकत होता. त्याला टय़ुलिप्सचा आणि लीलीचा खूप राग आला. त्याला माहीत होतं की, ही तीन फुलपाखरं एकमेकांचे घट्ट मित्र आहेत आणि संकटातसुद्धा ते एकमेकांची साथ सोडणार नाहीत. त्याने तीन फुलपाखरांना मदत करायचं ठरवलं. तो हळूच ढगांमधून बाहेर आला आणि त्यानं पावसाला पळवून लावलं. टय़ुलिप्सच्या बागेत स्वच्छ ऊन पडलं. फुलपाखरांच्या पंखांवरचं पाणी वाळून गेलं आणि त्यांना सूर्यकिरणांमुळे ऊब मिळाली.
ताजीतवानी झालेली तिन्ही फुलपाखरं खुशीत सूर्यकिरणांशी आणि टय़ुलिप्सच्या फुलांशी खेळायला पानावरून उडून फुलांजवळ आली. त्यांचा निरागसपणा बघून टय़ुलिप्स आणि लीलीला आपली चूक उमगली.
ते फुलपाखरांना म्हणाले, ‘‘खरंच, आमचं चुकलं. तुम्ही एकमेकांचे खरे मित्र आहात. तुम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा आमच्या पाकळ्यांमध्ये येऊन बसा.’’
(डच कथेवर आधारीत)