04 August 2020

News Flash

कार्टूनगाथा : दोस्तीचं विमान!

जगात बऱ्याच देशांत प्रवास हा असाच होत असल्याने यापेक्षा वेगळा पर्याय  तर मलाही सुचत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीनिवास बाळकृष्णन

२०१९ च्या दिवाळीच्या सुटीत कुठे जाणार आहात? मुंबई, पुण्याला? की रत्नागिरी-मालवणला? हिवाळ्यात नागपूर, औरंगाबादही छानच असतंय. बरं, यापैकी एक ठिकाण निवडायचं ठरलं तर कुठलं निवडाल? आणि तिथपर्यंतचा प्रवास कशाने कराल? एस.टी. बस, एसी स्लीपर बस, रेल्वे, स्वत:ची गाडी, क्रूझ, ट्रक, जीप, टॅक्सी, रिक्षा, सायकल की चालत?

जगात बऱ्याच देशांत प्रवास हा असाच होत असल्याने यापेक्षा वेगळा पर्याय  तर मलाही सुचत नाही. बरं, हाच प्रवास १९४० काळात (म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्याही आधी) आजपासून ८० वर्षांपूर्वी करायला सांगितला तर कशाने केला असता?

विमानाने? पडला ना कोडय़ात! पण एक शहर मला महित्येय की तिथं १९४० पासून सर्व म्हणजे सर्वच प्रवास विमानाने होत असे. आणि ती सर्व मानवविरहित विमाने होती. म्हणजे सर्व विमाने प्राणी चालवायची.

साधं हॉटेलात जायचंय तरी काढलं विमान! इथं आपलं प्राणी.. सॉरी, आई-बाबा आपल्याला ‘जवळच जायचं’ सांगून लांब लांबपर्यंत चालवत नेतात. होय ना!

हे जे विमानांचं शहर आहे ते भारतात तर नसणारच. अजूनही नाही. जगातही कुठेच नसणार. हेही तुम्हाला महित्येय. कारण अशी शहरं आणि त्यातली अचाट कल्पना केवळ कार्टूनमध्येच असू शकतात. अर्थात हे खोटं असणारे! हेही आपल्याला महित्येय, पण इथं १००% धमाल असणारे! जे मोठय़ांना माहीत नाही.

उसलँड/ असलँड देशातल्या केप सुझेट नावाच्या बंदरावर ही कथा घडते. हे बंदर उंच पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. अगदी समुद्रातल्या विहिरीसारखं!

बाजूला- खाली समुद्रच समुद्र. केवळ शंभरएक फुटाची दोन पर्वतांमध्ये उभी चीर आहे. तिथूनच विमान येणार-जाणार.

जगभराशी संपर्क साधणारी वाट! इथूनच शत्रू प्रवेश करू शकत असल्याने दोन तोफा या दोन्ही पर्वतांवर लावल्या आहेत. मुख्य शत्रू, हवाई डाकू कुख्यात डॉन कर्नाज (लांडगा)! एका प्रचंड मोठय़ा आकाराच्या विमानाने (विमान कसलं, हवेतलं प्रशस्त क्रूझच म्हणा.) इतर छोटय़ा मालवाहू, प्रवासी विमानांना लुटत असे. या अजस्र विमानात त्याच्या गँगची बंदूक असणारी छोटी विमानेदेखील आहेत. पण हा डाकू खूप स्मार्ट नाही. डोक्यात थोडा वेडसरपणा आहे. त्यामुळे त्याची गँग त्यापेक्षाही वेडसर! पण त्याची दादागिरी शहराबाहेर- तीही हवेत.

हा कमी की काय म्हणून महाविचित्र कायदे असणाऱ्या (जंगली डुकरांचा) केप सुझेटशी व्यावसायिक संबंध येत असतात. स्पिगोट नावाचा हुकूमशहा लष्करप्रमुख हा अत्यंत मूर्ख व धूर्त! त्यामुळे तो सर्व देश टेन्शनमध्ये आहे. तिथं म्हणे सर्वात छोटी शिक्षा म्हणजे १००० वर्षे जेल! सारं सन्य यांच्या मुठीत. नको ते निर्णय घेतं आणि स्वत:सोबत इतरांनाही गोत्यात आणतात. मूर्ख युद्धखोरांचा त्रास काही कमी समजू नका.

शहराबाहेर हे तर शहरात दहशत आहे ती धनाढय़ व्यावसायिक शेर खान याची. खान इंटरप्रायझेस ही इतकी मोठी कंपनी आहे, की तिच्या मालकीचे हवाई सन्य व नौदल आहे. त्यामुळे समुद्री, हवाई डाकू शेर खानच्या नादी लागत नाहीत. हा खान अतिशय मितभाषी, रुबाबदार, गंभीर, कठोर हृदयाचा, खुनशी, पार डेंजरच होता. ‘खानाशी नडला तो खड्डय़ातच पडला’. साहेबांचं सर्वात आवडतं काम म्हणजे प्रचंड पसा कमवत राहणे व केप सुझेटमधल्या इतर छोटय़ा व्यावसायिकांना भिकेला लावणं. यासाठी तो काहीही करत असे.

या तिघांच्या तावडीत सापडलेली हायर फॉर हायर ((higher for hire) ही हवाई मालवाहतूक करणारी अत्यंत छोटी कंपनी. जिची मालकीण होती हिृतिका महालिंगम्! (इंग्रजीत हिचं नाव रेबेका) अत्यंत कुशल व्यवस्थापक, चतुर आणि क्यूट मियोची एकटी आई!

तिच्या कंपनीचा पार्टनर कम विमानचालक बल्लू (अस्वल)! विमान चालविण्यात जगात याचा हात कोणीच धरू शकत नाही. हवाई लुटेऱ्यांपासून कसे वाचायचे, हे याला पक्के ठाऊक. मनात आणलं तर शेर खानच्या कंपनीत चिकटून चिक्कार पसा जमवता आला असता, पण इतकं काम याच्या आळशी स्वभावाला झेपतंय कुठं? म्हणून हा हायर फॉर हायरमध्ये स्वतंत्रपणे काम करतो. याला आवडतं खायला, नाचायला आणि झोपायला.. आणि त्याच्या ‘सी डक’ नावाच्या विमानात बसून नुसतेच फिरायला. लाँग ड्राइव्ह हो!

हे सी-डक टोकाकडून खरेच बदकाची चोच असल्यासारखं आहे. जाडजूड, खूप वेगवान नाही, हायटेक तर मुळीच नाही. पण बल्लूला लकी! त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम! ‘सी डक’ हाच तर या कार्टूनचा हिरो आहे.

बल्लूचं हे वागणं त्या नॅव्हिगेटर किट क्लाऊडवाला (अस्वल)अजिबात आवडत नाही. तो बल्लूचा राइट हॅन्ड. त्याला मोठय़ा भावासारखा किंवा बापासारखाच म्हणा ना! (होय किट अनाथ आहे.) परिस्थितीने आलेलं शहाणपण त्याच्यात पुरेपूर आहे! त्यात छोटा असल्याने त्या वयात येतो तसला बिनधास्तपणा आहेच. थोडासा तापटही!

तुम्ही तर केवळ हात सोडून सायकल चालवता, ट्रेनच्या दरवाजात लटकता.. पण हा किट रश्शीच्या साहाय्याने ढगांवर स्केटिंग करतो. आत्ता बोला! याचा फायदा बल्लूला अनेक ठिकाणी होतो म्हणा, पण छोटा आहे म्हणून काळजीही असते. या कौशल्याच्या जोरावर किटला अनेक ठिकाणी काम मिळालं असतं, पण त्याला केवळ पैसे नाहीत तर कुटुंबाचे प्रेमही हवंय- जे इथंच मिळतं.

हवाई डाकू- नको ते साहस असल्यावर विमानाची नासधूस व कामाचे तीनतेरा वाजणारच. आणि बॉस म्हणून हृतिका वैतगणारच! शिक्षा, दंड, अपमान अगदी नोकरीहून काढून टाकले तरी यांचे विनानुकसान एकही काम होतच नाही. त्यात अपमानाच्या आगीत तेल ओतायला रेस्टो-क्लबचा लुई (औरंगओटान) मालक आहेच. बल्लूलाही त्याची कंपनी व क्लब आवडतोच की! उधार देणारे सर्वानाच आवडतात.

बल्लूचा पंटर नावाचा भोळा मित्र! कुणाच्या अध्यात ना मध्यात! त्याची विमान दुरुस्ती ही बल्लूच्या कंगालपणामुळे जुगाडूही होते आणि मग आपल्याला आणखीनच मजा येते.

ही सारी टीम देशापरदेशात अनेक चमत्कारिक प्रसंगांना सामोरे जाते. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडते. आणि पुन्हा नव्याने वेगळ्या संकटासाठी तयार राहते. या आर्थिक, नैसर्गिक, व्यावसायिक संकटमालिकेतून हा व्यावसायिक असलेला परिवार पुढे पुढे एकत्र कुटुंबसारखा होत जातो. इथं कुणीच कुणाचे नातलग नसले तरी त्यांच्यात मित्रप्रेमाची गुंफण तयार होत जाते. जिवाला जीव देणारे मित्र तयार होत जातात. ही शिकवण आपसूक कार्टून पाहणाऱ्या मनावर उमटते.

या सर्वाचे रोमांचकारी, खिळवून ठेवणारे, साहसी, भावनिक असे विमान वाहतुकीचे किस्से म्हणजे ही ६५ भागांची कार्टून मालिका!

वॉल्ट डिस्ने अ‍ॅनिमेशन कंपनीने १९९० साली छोटय़ा कालावधीसाठी एक सिरीज द्यायचं ठरवलं. ती सिरीज थोडी मागच्या लेखात पाहिलेल्या डकटेल्ससारखी आहे. मॅगॉन आणि मार्क झास्लोव यांनी विकसित केली. त्यातील पात्र डिस्नेच्याच ‘द जंगल बुक’ या गाजलेल्या अ‍ॅनिमेशनपटाला मध्यवर्ती ठेवून केलं. म्हणून आपल्याला बल्लू (बल्लू), पंटर (बगिरा), शेर खान (शेर खान), किट (मोगली) अशी रचना दिसते. फक्त सर्व शहरी!

इतर कार्यक्रमांना त्यातील पात्रांना घेत आणखी पात्ररचना केली गेली. डकटेल्सचे लेखक डॉन रोझा यांनी कोही भागांचे लिखाण केले.

डिस्ने (फ्रान्स), जेड, हांन हो हेंग अप, वांग, एस. ए. सनऊ फिल्म प्रॉडक्शन कंपन्यांनी या मालिकेचे अ‍ॅनिमेशन केलं.

आजही ही साहसी आणि विनोदी मालिका तुम्ही नेटवर पाहू शकता.

chitrapatang@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2019 2:09 am

Web Title: friendship plane cartoon gatha article srinivas balkrishnan abn 97
Next Stories
1 नीलपंखी
2 गजाली विज्ञानाच्या : कुणी निंदा, कुणी वंदा माझा स्वहिताचा धंदा!
3 मित्र गणेशा!
Just Now!
X