एक जंगल होतं. मोठमोठाल्या वृक्षांचं, नागमोडी वेलींचं, झुळझुळणाऱ्या झऱ्यांचं अन् मस्तवालपणे उडी घेणाऱ्या धबधब्यांचं! या जंगलात लुसलुशीत चारा होता. जांभूळ- आंब्यासारखे अनेक वृक्ष होते. आणि त्यामुळे तिथे खूप पशू-पक्षी राहायचे. तिथेच एका जांभळीच्या झाडावर मैना, साळुंखी व पोपट असे तीन मित्र राहायचे. या तिघांची घट्ट मैत्री होती. मैनेनं आणलेला गावरान मेवा, पोपटाचे पेरू आणि बडबडय़ा साळुंखीनं आणलेलं चिटीरपिटीर असं सारं एकत्र करून तिघेजण जेवायला बसायचे. कधी फावल्या वेळात पोपटय़ा नकला करून दाखवायचा. उत्साही मैना टुणटुण-टुणाटुण उडय़ा मारून दाखवायची, तर गडबडगुंडी साळुंखी बोल-बोलून साऱ्यांना बेजार करायची. दिवस कसे छान, मस्त चालले होते.
एक दिवस एक कावळाही त्याच झाडावर राहायला आला. काळुराम आला आणि त्या दिवसापासून कटकटींना सुरुवात झाली. कावळ्याचं सारंच कसं विचित्र अन् कर्कश! दुपारी सारे झोपले की हा मुद्दाम काव काव करून गोंधळ घालायचा, तर कधी घरटय़ात शिरून हळूच दाणे चोरायचा. लहानग्या पिल्लांना त्रास द्यायचा. एक दिवस पोपटय़ा पेरू घेऊन त्याच्या घरी गेला.
‘कावळेदादा, का हो असे वागता? उगाच वाकडय़ात शिरता? बरं नाही असं वागणं. उगाचंच छळणं. आपण सारे भाऊ-भाऊ आनंदानं राहू अन् खूप मजा करू.’
पोपटय़ानं त्याला समजावलं, पण कावळा काही ऐकेना. त्याचा आपला एकच हेका- ‘‘मला कुण्णाची गरज नाही. तुमच्यासारख्या मूर्खाची तर मुळीच नाही. जा इथून चालता हो.’’ कावळा ओरडला तसा पोपटय़ा एवढुसं तोंड करून घरी परतला.
त्यानंतर थोडय़ा दिवसांनी पावसाला सुरुवात झाली. एक दिवस धो-धो पाऊस पडू लागला. पावसाच्या माऱ्यानं जंगल बेजार झालं. पाऊस कोसळत होता. सों सों वारा वाहत होता. थंडी-पावसानं सारेच कुडकुडले होते. बिचाऱ्या साळुंखीची पिल्लं फारच लहान होती. तिनं घाईघाईनं आपल्या पिल्लांना पोपटय़ाच्या ढोलीत नेऊन ठेवलं. स्वत: साळुंखी मात्र जा-ये करण्यात भिजून गेली. छीं छीं शिंकू लागली. तापानं फणफणली. अन् थंडीने काकडू लागली. तिची अवस्था बघून मैनाताई धावत-पळत कावळ्याच्या घरी गेली. ‘‘कावळेदादा, थोडी मदत करा. साळुंखीला थंडी वाजतेय. एखादं पांघरूण द्या.’’ मैनेनं असं सांगताच कावळा वसकन् केकाटला, ‘‘क्रॉव, क्रॉव. मुळीच नाही. सारा दिवस बडबड, वटवट करीत राहते. वैताग नुसता!’’ असं म्हणत कावळ्यानं धाडकन दार बंद केलं.
दोन दिवसांनी पाऊस थांबला. साळुंखी बरी झाली आणि सर्वानी ठरवलं, की या काळुरामशी कोणीही संबंध ठेवायचा नाही.
अमावस्येची रात्र होती. सुसाट वारा सुटला होता. रातकिडे किरकिरत होते. सर्वत्र किर्र्र शांतता पसरली होती. अचानक कुठेतरी खसखस झाली अन् खालचं गवत भीतीने शहारलं. झाडावरची टिटवी मोठय़ानं ओरडली आणि त्याच वेळी एक
भलामोठा नाग कावळ्याच्या घरात शिरला. कावळ्यानं एकच आकांत केला. मदतीसाठी फडफडाट केला. पण कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही. नागानं कावळ्याची सारी अंडी फस्त केली आणि तो निघून गेला.
रात्र सरली. दिवस उजाडला. दु:ख व पश्चात्तापानं अधिकच काळवंडलेला कावळा खाली मान घालून साऱ्यांची क्षमा मागू लागला. सगळेच त्याच्यावर चिडले होते. बोलायला तयार नव्हते- पण शेवटी मैनेला त्याची दया आली. मैनेनं साऱ्यांची समजूत घातली. केवळ तिच्या विनंतीला मान द्यायचा म्हणून सर्वानी कावळ्याला मोठय़ा मनानं क्षमा केली. आता मात्र कावळा पूर्णपणे बदलला. सर्वाशी मैत्रीनं वागू लागला. कावळा बदलला आणि जंगल तोंडभरून हसलं. पूर्वीसारखं गुण्यागोविंदानं नांदू लागलं.
मुलांनो, मैत्री व सहकार्याचं
महत्त्व फार मोठं आहे. मैत्री करणं अन् ती शेवटपर्यंत टिकवणं
फार कठीण असतं बरं!
मैत्रीविषयी बोलताना समर्थ
लिहितात-
समाधाने समाधान वाढे, मैत्रीने मैत्री जोडे
मोडीता क्षणमात्र मोडे, बरेपण।।