11 August 2020

News Flash

गंमत विज्ञान ; चालणारे पाणी

टिश्यूपेपर अशाप्रकारे दुमडा, जेणेकरून त्याचा आकार एखाद्या पट्टीप्रमाणे दिसेल.

साहित्य : ७ मध्यम आकाराचे पाण्याचे पारदर्शक ग्लास (काचेचे/प्लॅस्टिकचे), द्रव – रूपातील रंग (लाल, पिवळा, निळा)- चित्रकलेतील वॉटर कलरसुद्धा चालतील. जाड टिश्यू पेपर, पाणी, चमचा.

कृती : प्रथम सातही ग्लास एका सरळ रेषेत जवळजवळ ठेवा. आता एकाआड एक ग्लासमधे अध्र्यापेक्षा थोडे जास्त पाणी भरा. म्हणजेच १-३-५-७ क्रमांकाच्या ग्लासमध्ये पाणी असेल आणि २-४-६ क्रमांकाचे ग्लास रिकामे असतील. आता पहिल्या आणि सातव्या ग्लासमध्ये लाल रंगाचे दोन-तीन थेंब टाका. तिसऱ्या ग्लासमध्ये पिवळ्या आणि पाचव्या ग्लासमध्ये निळ्या रंगाचे थेंब टाका. रंग पाण्यात नीट मिसळण्यासाठी चमच्याने ढवळा.

टिश्यूपेपर अशाप्रकारे दुमडा, जेणेकरून त्याचा आकार एखाद्या पट्टीप्रमाणे दिसेल. आता अशा एकूण सहा पट्टय़ा बनवून त्या मध्यात दुमडून घ्या. दुमडलेल्या पट्टीच्या एका बाजूचा भाग पहिल्या ग्लासमध्ये आणि दुसऱ्या बाजूचा भाग दुसऱ्या ग्लासमध्ये जाईल अशा प्रकारे पट्टी ठेवा. पट्टीची दुमड ही दोन्ही ग्लासांच्या कडांवर असली पाहिजे. आता उरलेल्या पट्टय़ा अशाच प्रकारे २-३, ३-४, ४-५, ५-६ आणि ६-७ ग्लासांमध्ये ठेवा. दोन ते सहा क्रमांकाच्या ग्लासांमध्ये प्रत्येकी दोन पट्टय़ा असतील. (एक डावीकडील ग्लासातून आणि एक उजवीकडील ग्लासातून आलेली असेल.)

अशाप्रकारे आपली प्रयोगासाठी आवश्यक रचना आणि कृती करून झालेली आहे. आता थोडा वेळ जाऊ द्या. काही वेळाने रिकाम्या ग्लासांमध्ये (क्रमांक २,४,६) टिश्यू पेपरच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या ग्लासांमधून पाणी जमा झालेले दिसेल. अर्थातच इतर सर्व ग्लासांमधील (१,३,५,७) पाणी कमी झालेले दिसेल. आपण जे रंग ज्या क्रमाने वापरले आहेत त्यानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या ग्लासात लाल+पिवळा = केशरी, चौथ्या ग्लासात पिवळा+निळा = हिरवा आणि सहाव्या ग्लासात निळा+लाल = जांभळा रंग तयार होईल. टिश्यूपेपरच्या पट्टय़ांवरदेखील या रंगछटा दिसतील.

सदर प्रयोग  https://www.youtube.com/ watch?v=k8YtroKjVxo&feature=youtube या लिंकवर तुम्ही पाहू शकाल.

असे का होते?

टिश्यू पेपरमध्ये पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. हा गुणधर्म केशाकर्षणाने (capillary action) निर्माण होतो. या केशाकर्षणाच्या तत्त्वानेच जमिनीतील पाणी मुळांद्वारे झाडांच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. या पेपरमधील कागद आणि पाणी यांच्या रेणूंमधील आकर्षण हे पाण्याच्या दोन रेणूंमधील आकर्षणापेक्षा जास्त असल्याने या कागदात पाणी ओढून घेण्याची क्रिया होते. त्यामुळे आपल्या प्रयोगात भरलेल्या ग्लासातील पाणी, टिश्यू पेपर पूर्ण भिजल्यावर शेजारच्या रिकाम्या ग्लासामधे जाऊ लागते. (ही क्रिया तत्त्वत: सर्व ग्लासांमधील पाणी एकाच पातळीत येईपर्यंत चालू राहते.) अशा प्रकारे रिकाम्या ग्लासांमध्ये त्यांच्या दोन्ही बाजूंच्या ग्लासांमधील भिन्न रंगांचे पाणी एकत्र येऊन वेगळे रंग तयार होतात.

मनाली रानडे manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 1:28 am

Web Title: fun science experiments for kids 2
Next Stories
1 खेळायन : उनो
2 चित्ररंग : गणपती रंगवा
3 मंगलमूर्ती मोरया!!
Just Now!
X