News Flash

येतो भेटाया!

बाप्पा, मला आता तुझी खूप आठवण येतेय. तू कधी भेटशील असं झालंय. लवकर ये ना रे तू. तुला भेटायला मी खूप खूप आतूर झालो आहे.

| August 24, 2014 01:36 am

बाप्पा, मला आता तुझी खूप आठवण येतेय. तू कधी भेटशील असं झालंय. लवकर ये ना रे तू. तुला भेटायला मी खूप खूप आतूर झालो आहे. लवकर ये ना रे बाप्पा, ये ना लवकर. मला खरंच तुला भेटायचं आहे.
तुझाच
यश

प्रिय यश,
तुझी मेल वाचून खूप आनंद झाला. खरं सांगू, कित्तीतरी दिवसांनी मला कोणीतरी एव्हढी प्रेमाने आळवणी करून बोलावलंय. तुझ्या वयाच्या सगळ्या मुलांचीच ही आळवणी आहे असं तू म्हटलंयस. आणि तुम्हा सगळ्यांना मी एवढा आवडतो हे वाचून मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. तुला एक सांगू का, कोणालाही आपण दुसऱ्या व्यक्तीला आवडतो हे ऐकून आनंदच होतो. ए, असा हसू नकोस. मी देव असलो तरी मलाही भावना आहेतच ना! त्यामुळे मी तुम्हाला आवडतो हे ऐकून मला आनंद झालाच आहे. म्हणजे बघ ना, त्या दिवशी तू खेळायला निघाला होतास आणि बॉल विसरलास म्हणून तो नेण्यासाठी घरी परत आलास, तर तुझी दीदी तुझ्या पप्पांकडे तुझं कौतुक करत होती. ते ऐकून तुला आनंद झाला होताच की नाही? पण ती घटना तू फार लवकर विसरून गेलास आणि त्यानंतर काही दिवसांतच आईवर चिडचिड करत होतास, की तुझं कुणी ऐकतच नाही. तुला कुणी चांगलं म्हणतच नाही. सगळेजण तुला नावंच ठेवतात, वगरे वगरे. पण विचार करून पाहा बरं, तूच त्यांच्यावर तशी वेळ आणतोस की नाही अनेकदा. तू कोणाचं काही न ऐकताच हट्टीपणा करतोस. जोरजोरात दंगा करून घरातल्यांचा जीव नकोसा करतोस. आपलंच म्हणणं जोरजोरात मांडत सुटतोस. आणि त्यामुळे काय होतं माहीत आहे का, तुझ्याबद्दल जेव्हा कुणाला काही चांगलं बोलायचं असतं, तेव्हा तो बिचारा या गदारोळात विसरूनच जातो सारं. आणि परत आपलं तुझं म्हणणं तेच म्हणजे- मी कोण्णाला आवडत नाही वगरे. असो.
बरं यश, तू माझी खूप आतुरतेनं वाट पाहतोयस हे ऐकून- म्हणजे वाचून मला खूप म्हणजे खूपच आनंद झाला. कित्ती विचार करताय रे तुम्ही सगळे माझ्या आगमनाचा! तुझे आणि तुझ्या मित्रांचे प्लान वाचून मन अगदी भरून आलं. मलाही कधी एकदा पृथ्वीवर पाऊल टाकतोय असं होऊन गेलंय. पण बघ ना, प्रत्येकाला वेळेचं बंधन पाळावंच लागतं. मलाही गणेश चतुर्थीचा दिवस उजाडायच्या आधी नाही येता येणार तुमच्याकडे. आणि मी त्या दिवसाची वाट पाहीन. कारण ही वाट पाहून मिळणारा आनंद मला माहीत आहे. धीर धरला की समजतं, की धीरापोटी किती सुंदर फळं असतात ते. म्हणजे बघ हं, मी गणेश चतुर्थीच्या आधी आलो तर मोदक कसे मिळतील मला? बरं, माझं भजन- पूजनही कोण करणार?
सगळे असतील आपापल्या कामात. आणि तुला एक गंमत सांगू का, मोदक म्हणजे माझा जीव की प्राण. आणि तुमच्या भजन-पूजनाचा मी तर भोक्ताच! म्हणून मी संयम राखतो. आणि मला कितीही वाटत असलं तरी गणेशोत्सवाआधी येतच नाही तिकडे. म्हणून ज्यावेळी जे करणं योग्य असतं तेव्हा ते करावं, हे बरं! तुलाही एक सांगतो बरं का यश, बघ बरं पटतं का ते. रोज आई तुला अभ्यासाला बसवते आणि तू अभ्यासाच्या वेळातच कधी कम्प्युटर गेम्स खेळ, कधी मोबाइलवर खेळ, तर कधी खेळायलाच पळ.. असे उद्योग आईचा डोळा चुकवून करत असतोस. अशा वेळी तूही माझ्यासारखा संयम राखलास आणि आईने नेमून दिलेल्या वेळेत अभ्यास आणि नेमून दिलेल्या वेळेत इतर बाबी केल्यास तर खरंच तुला खूप फायदा होईल. हो, हो, मला माहीत आहे, आईने तुला मोबाइल, कम्प्युटर, व्हॉटस्अप यासाठीही वेगळा वेळ दिला आहे. हे मला कसं माहीत? सगळं माहीत आहे मला. अगदी सगळं. अरे बाबा, मी तुझा मित्र असलो तरी देवबाप्पा आहे. या गोष्टी लपत नाहीत माझ्यापासून..
तुझ्या मेलमध्ये तू लिहिलंयस- माझ्या उत्सवाची तू आणि तुझे मित्र अनेक महिने तयारी करताय. त्याची आखणी करताय. पण रागावणार नसलास तर तुला एक सांगू का यश. अरे, गणेशोत्सव आणि दिवाळी हे अनेक सण उत्सवांपकी एक आहेत. त्यांच्यात थोडेसे मोठे आहेत, एवढंच. पण तुम्ही एक विचार करा बरं यापुढे. या ठराविक उत्सवांव्यतिरिक्त इतर सणावारांचाही थोडासा विचार करत जा. म्हणजे श्रावणातले सण वगरे आहेतच रे, पण पतेती, ईद, गुड फ्रायडे यांच्याबाबतही म्हणतोय मी. आठवून पाहा बरं, तुम्ही या सणांच्या सुट्टय़ा उपभोगता; पण या सणांबद्दल काय माहीत आहे तुम्हाला? या सणांबाबत माहिती मिळवाल, त्यात सामील व्हाल, तर खरंच जगाशी बंध घट्ट कराल की नाही? अरे, सण-उत्सव यांचा गाभाच प्रेम, आपुलकी, माया निर्माण करणे हा आहे. ते बंध घट्ट करणे हा आहे. हे छोटे-मोठे सण-उत्सव समाजाशी आणि निसर्गाशीही आपले भावबंध घट्ट करतात. म्हणून ते साजरे करणं महत्त्वाचं असतं.
हं, आणि अजून एक- असे छोटे छोटे सण-उत्सव साजरे करत, व्यक्ती आणि परिसराशी नातं जोडत माझ्या आगमनाची तयारी करायची असते. म्हणजे शाळेत नाही का तुमच्या छोटय़ा-छोटय़ा घटकांच्या अभ्यासातून खूप मोठ्ठा विषय शिकवला जातो. तसंच आहे हे, हे तुझ्या लक्षातच आलं नव्हतं ना. नसेना का, आता तर मी लक्षात आणून दिलंय ना. तेव्हा तूही असं कर, की छोटय़ा छोटय़ा गोष्टी करत मोठय़ा ध्येयाकडे वाटचाल कर. तू स्वत:ला सचिनसारखा क्रिकेटपटू बनवण्याचं स्वप्न पाहतोयस ना. ठिकाय की! पण त्यासाठी सचिनसारखा क्रिकेटमधील प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा नीट अभ्यास आणि अंगिकार कर आणि मग मोठ्ठया मॅचसाठी तयार हो. बघ बुवा यश, मी काय म्हणतोय ते पटतंय का? हे बघ, मी माझे हत्तीसारखे कान धरून माफी मागतो. नाही, नाही, मी नाही जास्त उपदेश करत. हो मान्य, उपदेश करणं वगरे काम आई-बाबांचं. मान्य, मान्य. बाकी सगळं भेटीमध्ये बोलेनच. चल बाय. पुरे करतो आता. पण एकच सांगतो. यावर्षी माझ्या पुजेसाठी लागणारी फळं, फुलं, पत्री जेवढं काही तुला स्वत:ला जमवता येईल तेवढं तू स्वत: जमव. आणखी जे अगदीच मिळणार नाही ते बाजारातून आण. काय म्हणतोस? हे आई-बाबांना विचारावं लागेल. अरे, विचार ना. नाहीतर असं कर- ही मेलच दाखव त्यांना. बघ, ते नक्कीच परवानगी देतील. आखिर मं उनका भी लाडम्ला बाप्पा हूं। क्या?
चल, भेटू लवकरच.
तुझाच,
गणपतीबाप्पा

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2014 1:36 am

Web Title: ganesh festival coming soon
Next Stories
1 छोटय़ा चिपळ्या
2 डोकॅलिटी
3 गोविंदा रे गोपाळा
Just Now!
X