21 November 2017

News Flash

गणेशोत्सव.. एक कार्यशाळा

‘‘गणपतीबाप्पा येणार म्हणून आम्ही वेगवेगळे डान्स बसवतो. पंधरा दिवस आधीपासूनच आमची प्रॅक्टिस सुरू असते.

प्रा. मीरा कुलकर्णी | Updated: September 3, 2017 1:01 AM

‘‘गणपतीबाप्पाला वंदन करून आणि परीक्षकांना नमस्कार करून मी माझे विचार मांडते,’’ असं म्हणत समोर बसलेल्या स्वागताने आपले विचार मांडायला सुरुवात केली. ‘‘गणपतीच्या आगमनाची आपण दरवर्षी वाट बघतो.. कारण तो येताना खूप आनंद, उत्साह घेऊन येतो. आम्ही गणपतीच्या तयारीला १५ ऑगस्टपासूनच सुरुवात करतो. गणपती येणार म्हटलं की आम्ही सोसायटीतली सगळी मुलं आठ दिवस अगोदरपासूनच हॉलच्या डेकोरेशनला सुरुवात करतो. हॉलच्या भिंतीवर छान चित्रं, सुविचार, स्लोगन पेंट करतो. गणपतीभोवती छान निसर्गरम्य  वातावरणाचा देखावा करतो. वेगवेगळ्या रंगांचे मागे पडदे सोडतो.. लाईटच्या माळा लावतो. मोठे ताई-दादा आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आम्ही गणपतीची छान आरास करतो. एरवी कधी कधी भांडणं होतात आम्हा मित्र-मैत्रिणींत; पण बाप्पा आपला सगळ्यांचा आहे, या भावनेनं आम्ही एकमेकांना समजून घेत एकत्र काम करतो.’’ स्वागता वेगवेगळे मुद्दे मांडत होती आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत होते.

‘गणेशोत्सवामुळे आपल्याला काय मिळते?’ या सोप्या पण, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मुलांची वक्तृत्व स्पर्धा रंगात आली होती. ‘सागरसंगम’ सोसायटीत दरवर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. मुलांसाठी, महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धाचं आयोजन होतं आणि चढाओढ, चुरस याबरोबरच मैत्रीपूर्ण सहकार्याच्या वातावरणात सगळी  सोसायटी बाप्पाच्या सेवेत मग्न असते.

‘‘गणपतीबाप्पा येणार म्हणून आम्ही वेगवेगळे डान्स बसवतो. पंधरा दिवस आधीपासूनच आमची प्रॅक्टिस सुरू असते. गणपतीबाप्पा कलेची देवता आहे नं.. म्हणून आम्ही वेगवेगळे नृत्यप्रकार सादर करतो. मग वेशभूषा, केशभूषेसाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही एकमेकांना देतो. कधी कुणी आपल्याकडचा ड्रेस, साडी, नाकातली नथ, डोक्यावरचा रेडिमेड अंबाडा किंवा मुलांसाठी फेटे, जाकीट असं सगळं एकमेकांना देतो. त्यामुळं मदतीची भावना वाढते. आम्ही सगळी मुलं नाच करायला लागलो की आमचे आई-बाबा खूश असतातच, पण सोसायटीतले सगळे लोक आमचं कौतुक करतात. मग खूप छान वाटतं. हे सगळं गणपतीबाप्पामुळं होतं. म्हणून गणेशोत्सव मला खूप आवडतो.’’ छोटीशी स्वरा थांबत थांबत बोलत होती; पण तिचे हावभाव आणि भाषणातला खरेपणा बघून सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

आता स्टेजवर रसिका आली. ‘‘गणपतीबाप्पामुळे दरवर्षी मला एक छान वेगळा आनंद मिळतो. तो मी सांगणार आहे,’’ असं म्हणत तिनं सुरुवात केली. ‘‘गणपतीबाप्पा आला की घरी, सोसायटीत रोज सकाळी-संध्याकाळी आम्ही आरतीला जातो. टाळ्या, झांज, वाद्यं यांच्या गजरात वेगवेगळ्या आरत्या म्हणतो. त्यामुळं आम्हा मुलांच्या आरत्या आपोआपच पाठ होतात. आम्ही भरपूर श्लोक म्हणतो, मंत्रपुष्पांजली म्हणतो. त्यामुळं छान मंगलमय वातावरण तयार होतं. आमच्या संस्कार वर्गाच्या अलका मावशीनं आम्हाला अथर्वशीर्षही शिकवलंय. ज्यांच्याकडे गणपती असतो ते लोक आम्हाला अथर्वशीर्ष म्हणायला बोलावतात. त्यांच्याकडे अलका मावशी आम्हाला घेऊन जाते. सोबत शांता आजीपण येते. आम्ही मुलं नटूनथटून जातो आणि छान खडय़ा आवाजात अथर्वशीर्षांची आवर्तनं करतो. आमच्या ग्रुपचं कौतुक होतंच, पण छानसा खाऊ आणि दक्षिणाही मिळते- वही, पेन, पुस्तकरूपाने! एकत्र मिळून अथर्वशीर्ष म्हणताना समूहभाव वाढतो. वाचाशुद्धी होते. हिंदी लोक ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती म्हणतात आणि आम्ही ‘ओम जय गणेश, जय गणेश देवा’.. ‘माता जाकी पार्वती पिता महादेवा’ आरती म्हणतो. मला तर गणपतीबाप्पा येतात ते दहा दिवस म्हणजे एक वर्कशॉपच वाटतं. दूर्वाचा, फुलांचा हार करायचा. आजी रोज फुलवात कौशल्यानं करते. उकडीचे मोदक करताना तर सुगरणपणाची परीक्षाच असते, असं शांताआजी म्हणते. आपल्या सोसायटीतले कामतकाका तर आम्हा मुलांकडून विश्वप्रार्थना म्हणून घेतात. त्यामुळे फक्त स्वत:साठी काही मागण्यापेक्षा सगळ्यांसाठी देवाकडं प्रार्थना करायची असते, हे आम्हाला माहिती आहे. संत ज्ञानेश्वरांनीही देवाकडे सगळ्यांसाठी पसायदान मागितलं ना! मी माझ्या भाषणाचा शेवट त्या प्रार्थनेनेच करते. सब का भला.. सब का कल्याण.. सब का मंगल. हरी ओम!’’ टाळ्यांचा पुन्हा कडकडाट झाला. रसिकाचे विचार ऐकून आपली मुलं किती छान विचार करतात, ते विचार उत्तम वक्तृत्वानं मांडतात याचं आयोजकांना कौतुक वाटलं.

‘‘आपल्या सोसायटीत वेगवेगळ्या स्पर्धा असतात. जसं चित्रकला, फॅन्सी ड्रेस, गीतगायन, अभिनय.. त्यामुळं या सगळ्यात भाग घेताना आपलं ‘बेस्ट’ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नंबर मिळवायचाच असतो, पण गणपतीबाप्पामुळे आपली कला सादर करायला मिळते याचा आनंद जास्त असतो. आपली सगळी मित्रमंडळी काय करणार, याची उत्सुकता असते. पंधरा दिवस आम्ही मित्र-मैत्रिणी याचीच चर्चा करतो. चित्रकलेमुळे तुमच्या मनातले विचार चित्रात उतरतात. फॅन्सी ड्रेसमुळे निरीक्षण कौशल्य, बोलणं, अभिनय या गोष्टी लक्षात येतात.’’ स्मृती म्हणाली.

आता करण स्टेजवर आला आणि सगळे हसायला लागले. हा मुलगा काय बोलणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. आपल्या सोसायटीत मुलांसाठी स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असतात. एस्ऽऽऽ मला ते फार आवडतं. सायकलिंग, लिंबू चमचा, कॅरम, बुद्धिबळ, धावणे अशा स्पर्धामुळे मज्जा येते. सोसायटीतली मुलं ग्राऊंडवर येतात. हो.. कधी कधी पार्शिलिटी होते, मग आम्ही मुलं ओरडतो.. न्यायासाठी भांडतो.. मस्त गंमत असते. शाळेला सुट्टी असते. मग आम्ही सगळी मुलं दहा दिवस सोसायटीच्या हॉलमध्येच एकत्र असतो, गणपतीच्या अवतीभवती! जाम भारी वाटतं बाप्पामुळे..’’ करण बोलताना मुलं होकारार्थी माना डोलावत होती.

आता चिमुकली जीविका आपली ओढणी सांभाळत स्टेजवर आली. ‘गणपतीबाप्पा मोरयाऽऽऽ’ असं तिनं म्हणताच सगळ्यांनी एका सुरात ‘मोरयाऽऽऽ’ असं म्हटलं आणि वातावरणात कमालीचा उत्साह पसरला. ‘‘गणपतीबाप्पाला दूर्वा आवडतात म्हणून आम्ही मुलं रोज दूर्वा, फुलं आणतो. त्यामुळे निसर्गाच्या सहवासात जायला मिळते. बाप्पासमोर रांगोळी काढतो. बाप्पा आपल्याकडे पाहुणा म्हणून येतो ना.. मग त्याला वाईट वाटू नये म्हणून आम्ही मुलं अजिबात भांडत नाही. तो बुद्धीची देवता आहे नं.. म्हणून आम्ही त्याची खूप सेवा करतो. तो जेव्हा परत आपल्या आईकडे घरी जातो तेव्हा खूप वाईट वाटतं.. कारण त्याच्यामुळेच तर सोसायटीतली आम्ही सगळी मुलं एकत्र येतो ना!’’ पुन्हा टाळ्या वाजल्या.

आता श्रावणीचा हात धरून ओमु स्टेजवर आला आणि माईक हातात घेऊन स्वत:च हसायला लागला. सगळीकडे हास्याचा कल्लोळ उडाला. ‘‘गणपतीबाप्पामुळे दहा दिवस खाण्याची खूपऽऽ चंगळ असते..’’ पुन्हा सगळे हसायला लागले. ‘‘रोज सकाळ-संध्याकाळ वेगवेगळा प्रसाद असतो ना.. त्यामुळे आईच्या पोळीभाजीची कटकट नाही. रोज रात्री प्रसाद म्हणून छान  बेत असतो. आम्हा मुलांना आवडतं म्हणून नूडल्स.. पनीर.. पावभाजी.. मिसळ.. असं रोज काहीतरी नवं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही सोसायटीतली सगळी मुलं एकत्र अंगतपंगत करत जेवतो. त्यामुळे भारी वाटतंय. एरवी आई-बाबांबरोबर हॉटेलमध्ये जातो; पण त्यापेक्षा बाप्पासमोरची आम्हा मुलांची ही पंगत मला खूप आवडते. म्हणून मला गणेशोत्सव आवडतो.’’ समोर फोटो काढणाऱ्या सानियानं खुणेनंच त्याला ‘बास कर’ म्हणून सांगितलं आणि ‘ओकेऽऽ’ म्हणत ओमु खाली उतरला.

ईश्वरी म्हणाली, ‘‘मला गणेशोत्सव आवडतो, कारण त्यामुळे आम्ही भाषणं पाठ करतो, नाच बसवतो, नाटक बसवतो.. त्यामुळे आमच्यातली एकी तर वाढतेच, पण प्रत्येक जण एकमेकाला सुधारणा सांगतो, त्यामुळे ‘हए’ फीलिंग वाढते.’’ टाळ्या.

‘‘आम्ही सगळीकडे गणपती बघायला जातो. त्यामुळे वेगवेगळी आरास कशी केली याची आयडिया मिळते आणि बेटी बचाओ, निसर्गासोबत चला.. वाहनं सावकाश चालवा.. असे वेगवेगळे संदेश कळतात. वेगवेगळ्या उंचीचे, वेगवेगळ्या रूपांतले, विविध रंगछटांचे गणपती बघायला मला खूप आवडतात!’’ मनू म्हणाली.

‘‘गणपतीमुळे सगळे नवीन ड्रेस वापरायला मिळतात.. सगळे नटतात.. गाणी म्हणतात. अंताक्षरी खेळतात. हौजी खेळतात आणि शिवाय फॅशन शोही असतो. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो. मज्जा येते.’’ तनिशानं सांगितलं.

अंतरा म्हणाली, ‘‘माझ्या घरी गणपती असतो ना.. मग मी घराची स्वच्छता करायला आणि इतर लहान-मोठय़ा कामांत आईला खूप मदत करते. त्यामुळे आईला कित्ती काम असतं हे समजतं आणि मला शिकायलासुद्धा मिळतं.’’

‘‘‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ या स्पर्धेमुळं टाकाऊतनं टिकाऊ वस्तू तयार करायला मिळतात तो एक मस्त अनुभव असतो,’’ असं निकितानं सांगितलं. तर गोपी म्हणाली, ‘‘माझी देवावर खूप श्रद्धा आहे. मी आजीबरोबर सत्संगलाही जाते. मला प्रसाद वाटायला खूप आवडतं, कारण ‘सव्‍‌र्हिस टू मॅन इज सव्‍‌र्हिस टू गॉड’ हे मला माहीत आहे.’’

स्पर्धा छान रंगली होती. केदारनं छान सूत्रसंचालन केलं होतं, तर प्रोत्साहन द्यायला सृजन, दिलू, सागर, मधुर, अनिकेत, अंगद, शर्वरी अशी सगळी मुलं आणि मोठी माणसंही होती. मुलांना स्वत:ची अशी छान मतं आहेत आणि ती मांडता येतात, हे महत्त्वाचं होतं.

आता स्पर्धेबद्दल बोलण्यासाठी परीक्षक असलेले कामतकाका उभे राहिले. ते मुलांचे लाडके होते नं.. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ‘‘गणपतीबाप्पा मोरयाऽऽ,’’ असं म्हणत काका बोलू लागले, ‘‘बरं का मुलांनो, छान बोललात आणि अगदी खरं बोललात. रसिकानं छान सांगितलं. गणेशोत्सव म्हणजे दहा दिवसांचा वर्कशॉपच असतं. कित्तीतरी गोष्टी शिकतो आपण या दहा दिवसांत. शिस्त, समूहभाव, नातलगांचं गेट टुगेदर. बघा ना, एरवी आपण सगळे शाळा, कॉलेज, ऑफिस या गडबडीत असतो; पण गणपतीच्या निमित्ताने आपण मित्रमैत्रिणींना भेटतो, सोसायटीत एकत्र जमतो. लायटिंग, पूजा, आरती, प्रसाद, वेगवेगळे कार्यक्रम यामुळे सोसायटीत उत्साहाचं वातावरण असतं. तुम्ही डेकोरेशन करता, त्यामुळे कला-कौशल्य विकसित होतात. स्पर्धेमुळे  चढाओढीबरोबरच प्रतिस्पध्र्याबरोबर मैत्री असायला हवी हे शिकता. आपण हरलो तरी खचून जायचं नाही आणि दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक करायचं. यामुळे मनाचा मोठेपणा वाढतो. संस्कृत श्लोक, आरत्या यामुळे पाठांतर चांगलं होतं. उच्चार स्पष्ट होतात. कलेची सेवा होतेच, पण तुम्ही ‘सगळे’ मिळून-मिसळून एकत्र असता हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे उत्तम संस्कार शिबीरच असतं.

आता बाप्पा आपल्या घरी परत जाईल तेव्हा किती रिकामं रिकामं वाटेल. बाप्पाची आपल्या आई-वडिलांवर भक्ती होती, प्रेम होतं. म्हणून त्यानं त्यांनाच प्रदक्षिणा घातली. मुलांनो, तुम्हीपण आपल्या आई-बाबांवर प्रेम करा. त्यांच्याशी सगळं बोला. चांगली संगत करा. चांगले विचार करा. भरपूर वाचा आणि खूप कष्ट करा. अभ्यास करा. मग बघा गणपतीबाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असेल, कारण तुम्हाला माहीत आहे ना, तो जसा कलेचा देव आहे तसा बुद्धीचा दाता, विघ्नांचा हर्ता, सुखकर्ता आहे.

तुम्हा सर्वाना आता छान बक्षिसं मिळतील. तुम्ही बाहेर शाळेत बक्षिसं मिळवताच, पण आपल्या घरी झालेलं कौतुक जास्त आवडतं ना! म्हणून सोसायटीत कार्यक्रम ठेवायचे. तुमच्यामुळे मलासुद्धा या  वर्कशॉपमध्ये सहभागी होता आलं. चला, आपण सगळे गणपती बाप्पाकडे प्रार्थना करू या लवकर परत ये म्हणून.. चला म्हणा सगळे.. गणपतीबाप्पा मोरयाऽऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’’

सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवत एका सुरात प्रार्थना केली. सगळी मुलं हातात हात घालून उभी होती.

प्रा. मीरा कुलकर्णी meera.kulkarni@gmail.com

First Published on September 3, 2017 1:01 am

Web Title: ganesh utsav a workshop story for kids