गणपतीच्या दिवसांत मूर्तिकारांकडे जाऊन मूर्ती घडवताना पाहत बसणं हे खूप छान वाटतं. पण सध्या बाजारात गेलो तेव्हा गणपतीच्या इतक्या मूर्ती पाहून थोडं घाबरायला झालं. मला आवडणारे गब्दूल, हसरे, प्रसन्न असे गणपती फार कमी व आकाराने छोटे होते. पण मोठ्ठाले गणपती थोडे शिष्ट असल्यासारखे वाटले. हातात कसकसली शस्त्रे-आयुध घेतलेली, चमचमते कपडे, दागिने वगैरे काय! त्यांचे वाहन उंदीरमामा तर कुठच्या कुठे गायब झालेले. त्या जागी सिंह, वाघ. तेही भयानक रागात आपल्याकडे पाहत असतात.. जणू काही आपण दोनदा प्रसाद घेतलाय!

म्हटलं, त्यांनी मूळ गणपतीची वाट लावलीये. म्हणून मूळ गणपती कसा होता याची नेटवर शोधाशोध करावी. अष्टविनायक पाहिले तर त्यात ‘गणपती’ नीट स्पष्ट दिसेना. शेंदुराने एकदम गुळगुळीत झालेले. पण याच शोधात देश आणि देशाबाहेरील गणपतीसुद्धा पाहायला मिळाले. कुठल्या देशात गणपती क्युट तर कुठल्या देशात रागीटण् काही गणपती हृतिक रोशनसारखे पिळदार, तर काही पोट सुटलेले!

आपल्याकडे नोटेवर गांधीजी असतात तसा  इंडोनेशियाच्या (मुस्लिमबहुल) नोटेवर व पोस्टाच्या तिकिटावर गणपतीचे चित्र आहे. तिकडे जपानमध्ये गणपतीला शोतेन किंवा कांकितेन म्हणतात. सुमो कुस्तिगीरांसारखे एकत्र मिठय़ा मारत असतात. चीन, इराणी, सुमात्रा, जावा, श्रीलंका, रशिया व्हिएतनाम, तिबेट या ठिकाणी जुन्या गणेशमूर्तीच आहेत.

काही ठिकाणी भक्ती म्हणून तर काही ठिकाणी केवळ हा आकार, संकल्पना आवडली म्हणून गणपती प्रभाव टाकत गेला.

आता जीव चित्रात गणपती कशाला म्हणून विचार करू नका, गणपतीचे मुख्य अर्धे शरीर, म्हणजे डोकं हे हत्तीचं असल्याने त्याला जीवचित्रात सहभागी व्हायला आरक्षण आहे.

श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in