परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यावर रतीचे मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये ‘इच्छाभोजन’ झाले. नंतर दिवाळीचे चार दिवस तर तिने नुसती धमाल केली, आता एकच कार्यक्रम बाकी होता- कुठंतरी ‘आऊटिंग’ला जाण्याचा. bal06त्यामुळे उदयकाकाने खर्डीचा प्रस्ताव ठेवताच सगळ्या बालगोपाळांनी उडय़ाच मारल्या.
‘‘तिथे मस्त गच्चीत उघडय़ावर झोपायचं बरं का!’’ आजीने सूतोवाच केले.
‘‘ए, मला उघडय़ावर झोपायला आवडत नाही. एसी लागतोच.’’ रती कुरकुरली.
‘‘अगं, तिथला एसी ‘चांदण्यां’नी भरलेला असतो.’’ -इति आजी.
‘‘हे काहीतरीच हं तुझं,’’ म्हणत गौरांगीने रतीची बाजू उचलून धरली. पटापट बोलता बोलता ‘सॅक्स’ भरल्या गेल्या आणि गाडय़ा शहापूर मार्गावर धावू लागल्या. तासाभरातच मुख्य रस्ता सोडून गाडय़ा गावात वळल्या.
‘‘आजी, किती झाडांच्या फांद्या आपटताहेत नं काचेवर आणि पुढचा रस्ता दिसतच नाहीये.’’ चौकस विराजने वातावरणातला बदल मोठय़ांसारखा टिपला.
‘‘वळणावळणाची पायवाट आहे आणि सभोवताली रानच आहे.’’ वैभवदादाने शंकानिरसन केले.
‘‘कशी छोटी छोटी घरं आहेत नं! खेडं म्हणतात बरं का ह्य़ाला, विराज.’’ रतीने ताई‘गिरी’ दाखवली.
‘‘किती छोटा रस्ता आहे. आजी, गाडी जाईल ना गं आपली?’’ इतका वेळ झोपलेल्या ओंकारला जाग आली.
खर्डीच्या निवांत, निर्जन, अगदी चिटपाखरू दिसणार नाही अशा परिसरातील बंगल्यासमोर गाडय़ा थांबल्या आणि मुलं सुसाट धावत सुटली. दिवेलागण झालीच होती.
‘‘आजी, सगळीकडे हिरवेगार लॉन असल्यासारखं दिसतंय; पण एकही घर नाही, दुकान नाही आणि दिवेही नाहीत. मिट्ट काळोख. आपण एकटय़ानंच इथे राहायचं रात्री?’’ बहुतेक गौरांगीच्या पोटात भीतीचा गोळा आला असावा.
‘‘अगं, काका, बाबा सगळे आहेत की आपल्याबरोबर.’’ -आजी.
पोटपूजा पार पडली. अंताक्षरी खेळून झाली. जिन्याच्या कठडय़ावरून घसरगुंडी झाली; आणि सगळ्यांचा मोर्चा गच्चीकडे वळला.
‘‘चला, सगळ्यांनी मिळून गाद्या घाला.’’ कोणीतरी फर्मान काढलं. कोणी कुठे झोपायचं यावरून ‘तू तू- मैं मैं’ होत गाद्या घातल्या गेल्या.
‘‘आम्ही कडेला नाही झोपणार. आम्ही मध्ये झोपणार. आम्हाला काळोखाची भीती वाटते.’’ ओंकार आणि विराजने गादीवर लोळत जाहीर केलं.
‘‘अरे, वरती बघितलंस का? केवढा मोठा चांदोबाचा शुभ्र दिवा लावलाय तो आकाशात! शरद ऋतू आहे ना! पावसाचे काळे ढग पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे आकाश कसं स्वच्छ, निरभ्र आहे. चांदण्या कशा छान चमचम करत आहेत. मोजा बघू चांदण्या. तुम्हाला मोजता येतात का बघू.’’ इति आजी.
ओंकार, विराज हे लिंबूटिंबू आज्ञाधारकपणे मोजायला लागले. ‘मला शंभराच्या पुढे आकडे येत नाहीत, मग आता कसे मोजू?’ विराजला प्रश्न पडला.
‘‘अरे वेडय़ा, ह्या चांदण्या न मोजता येण्याजोग्याच असतात. अगणित.. पण निळंभोर आकाश आणि त्यातल्या चंद्र-चांदण्या, किती सुंदर दिसतंय ना, रती. शुक्ल पक्षात हा चंद्र कलेकलेने वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण चंद्राचे दर्शन देतो. कृष्ण पक्षात तो आकाराने कमी कमी होत जातो. पूर्ण चंद्राइतकीच चंद्राची कोरही सुरेख दिसते. याला ‘रजनीनाथ’ असेही म्हणतात. या चंद्रामुळेच पृथ्वीवरील सागराला भरती-ओहोटी येते. पौर्णिमेला पृथ्वीच्या सावलीत आल्यामुळे चंद्रग्रहण लागते, तर कधी कधी चंद्राभोवती खळे पडते. आपले पंचांग काय किंवा सणवार काय, सगळे चंद्रावरच अवलंबून असतात. सत्तावीस नक्षत्रे पंचांगाचे वेळापत्रक जुळवून आणतात. रात्रीच्या पूर्वी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन सूर्योदयापूर्वी पश्चिमेला मावळतात. ही नक्षत्रे चंद्र-चांदण्यांप्रमाणेच आकाशाचे सौंदर्य द्विगुणित करतात. आकाशात वर्षांतील ठरावीक दिवशी दिसणारा उल्कावर्षांव पाहणे म्हणजे एक पर्वणीच. याशिवाय आकाशात जराही उपद्रव न करणाऱ्या ‘धूमकेतू’चा पिसारा बघायला मिळणे ही भाग्याची गोष्ट. म्हणून नेहमी न येणारी व्यक्ती क्वचित कधी आली की आपण म्हणतो, अगदी धूमकेतूसारखी ही आज उगवली.. खरं ना!’’
‘‘आजी, आपण दुर्बीण आणायला हवी होती.’’ वैभवच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली.
‘‘ग्रह, तारे, सूर्य, त्यांची फिरण्याची दिशा, शनीची वलये, तारकापुंज, ग्रहणे, उल्कापात, पिधानयुतीचा आविष्कार अशा असंख्य गोष्टी या आकाशात बघण्याजोग्या असतात. किंबहुना हा आकाशातला दीपोत्सवच आहे. दिवाळीत पणती, आकाशकंदील लावताना निसर्गातल्या तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या या दीपावलीकडे बघण्यास विसरून चालणार नाही. त्याच्याविषयी आणखीन माहिती ऐकायला आवडेल ना तुम्हाला? मनोरंजनाबरोबर ज्ञानही मिळेल. सध्या मंगळाविषयीची माहिती आपल्याला मिळू लागलीय. पुढेमागे तिथे मानव पाठविण्याचे प्रयत्नही चालू असतील. परंतु त्यासाठी हा चांदण्यांचा सोहळा पाहायची सवय लागायला हवी आणि त्यासाठी सवड काढायला हवी.’’
‘‘आजी, खरंच येऊ या आपण खर्डीला पुन्हा. येताना दुर्बीण आणू आणि एखाद्या माहीतगार खगोलप्रेमीला बरोबर घेऊन येऊ.’’ इतका वेळ अलिप्त असलेल्या उदयकाकाने योग्य वेळी पुढाकार घेतला.
‘‘आजी, खरंच एकदम मस्त वाटतंय. मोकळी हवा, मिट्ट काळोख आणि चांदण्यांचं आकाश पांघरून झोपलेलो आपण सर्व. घरातल्या एसी रूमपेक्षा छान. जराही गुदमरल्यासारखे वाटत नाहीये. उघडय़ावर झोपणं ही कल्पना कशीतरी वाटत होती; पण आता तसं वाटत नाही. उलट खूप आवडलंय. डोळे केव्हाचे मिटायला लागलेत.’’ रतीने प्रामाणिकपणे कबूल केलं. सगळेच सरळकोनात पसरले.
‘‘पण ते आकाश रात्री आपल्या अंगावर पडणार नाही ना?’’ ओंकारच्या शंकेने हास्याची खसखस पिकली.