लीला तांबे

चिंटूच्या घरासमोर एक झाड होतं, अगदी हिरवंगार- त्या झाडावरची पानं हिरवी, फळं हिरवी. गंमत म्हणजे त्यावरचे पक्षीसुद्धा हिरवेच. वाऱ्याची झुळूक आली की झाडाच्या डहाळ्या हलायच्या. पानं डोलायची. पक्षी बागडायचे नि किलबिल सुरू व्हायची. एके दिवशी गंमतच झाली. चिंटू त्या दिवशी नेहमीपेक्षा जरा लवकर उठला होता. उठला नि अंगणात गेला. कुणी तरी त्याला हाक मारली.

‘‘चिंटू, ए चिंटू. गुड मॉर्निग चिंटू.’’

हाक कोणी मारली त्याला कळेना. शिवाय आवाज ओळखीचा वाटत नव्हता. ही गंमत सांगायला चिंटू त्याच्या आईकडे गेला. त्याची आई अंगणात आली. चिंटू तिच्यासोबत होताच. पुन्हा एकदा तोच आवाज आला.

‘‘चिंटूऽऽ चिंटूऽऽ’’ झाडावरचे पक्षी चिंटूला हाक मारत होते.

‘‘पक्षी कसे बोलतात गं आई?’’ चिंटूने आईला विचारलं.

‘‘कसे म्हणजे? आपल्यासारखेच बोलतात. कुणी तरी त्यांना  बोलायला शिकवतं.’’ चिंटूच्या आईने त्याला समजावलं.

चिंटू घरात आला. त्याने दात घासून तोंड धुतलं. तो अभ्यासाला बसला. धडे वाचायला लागला. पण तो एकसारखा अडखळू लागला. धडे वाचण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. झाडावरच्या त्या हिरव्या पक्ष्यांकडे बघत होता तो.

चिंटूला हाक मारून ते पक्षी उडून गेले. लवकरच ते येतील असं त्याला वाटलं होतं. पण ते पक्षी आले नाहीत.

पक्ष्यांची गंमाडीगंमत त्याला मित्रांना सांगायची होती. तो शाळेत लवकर गेला. मित्रांची वाट पाहू लागला. जरा वेळाने मिनू आली. अर्चू आली. राजू आला. अभय आला. सगळे चिंटूभोवती जमा झाले.

‘‘आज ना सकाळी पक्षी माझ्याशी बोलले. अगदी खरं खरं देवाशपथ सांगतो. पक्ष्यांनी मला ‘चिंटू’ अशी हाकसुद्धा मारली.’’ चिंटू म्हणाला.

‘‘काही तरीच काय सांगतोस चिंटय़ा!’’ तोंड वाकडं करत अभय निघूनही गेला.

‘‘मला दाखवशील ते पक्षी?’’ चिंटूजवळ येत मिनूने म्हटलं.

‘‘मी मिनूबरोबर तुझ्या घरी येऊ?’’ अर्चूने हळूच विचारलं.

‘‘मी पक्ष्यांसाठी काही तरी खाऊ घेऊन येईन.’’ राजू म्हणाला.

‘‘आज नको. आधी माझी आणि त्यांची चांगली ओळख होऊ दे, मग तुम्ही या.’’ चिंटू सगळ्यांकडे बघत म्हणाला.

शाळा सुटल्यावर चिंटू घरी आला. जरा वेळ अंगणात थांबला. त्याने झाडाकडे पाहिलं, पण ते पक्षी आले नव्हते. कपडे बदलून, दूध पिऊन चिंटू खेळायला गेला. काळोख पडल्यावर तो घरी आला. त्याचे बाबा ऑफिसातून नुकतेच घरी आले होते.

‘‘बाबा, मी तुम्हाला एक गंमत सांगू?’’ असं विचारून चिंटय़ाने ती गंमत बाबांना सांगितलीसुद्धा. घरी येताना बाबा नेहमीच भाजी आणत असत. त्यात कोबी होता. पालक होता. मिरच्या होत्या. पेरू होते. डाळिंब होतं. चणेसुद्धा आणले होते त्यांनी.

‘‘अभ्यासाला बसलास का चिंटू?’’ सकाळच्याच पक्ष्यांचा आवाज होता तो म्हणून चिंटय़ाने इकडे तिकडे पाहिलं. ते पक्षी चिंटूच्या घराच्या खिडकीवर येऊन बसले होते आणि चिंटूकडे पाहत होते. चिंटू खिडकीजवळ गेला. त्याने पक्ष्यांना हळूच हात लावला. पक्ष्यांनी आपले हिरवे पंख फडफडवले. ‘‘अरे, हे तर पोपट!’’ चिंटू म्हणाला.

‘‘विठू विठू. आम्ही पोपट. बरोबर ओळखलंस.’ हिरवे पक्षी बोलले. ‘‘ए, पण तुम्हाला माझं नाव कसं समजलं? कोणी सांगितलं?’’ हातांचा चाळा करत, लाजत, अडखळत चिंटूने विचारलं.

‘‘त्यात काय.. अगदी सोप्पं आहे. तुझे आई-बाबा तुला हाक मारतात. ते आम्ही ऐकलंय.’’ पोपट म्हणाले.

‘‘म्हणजे, आमच्या घरातलं तुम्हाला सगळं ऐकू येतं?’’ चिंटूने विचारलं.

‘‘होऽऽऽ तू रडतोस. तू हट्ट करतोस. मग आई तुला रागावते.. सगळं सगळं ऐकू येतं.’’ एक पोपट म्हणाला.

‘‘जरा तुम्ही थांबा हं. मी आई-बाबांना बोलावून आणतो.’’ चिंटू म्हणाला.

‘‘कोणाशी बोलतो आहेस रे चिंटू?’’ आईने चिंटूला विचारलं.

‘‘आई-बाबा, हे बघा सकाळचे पक्षी. आता हे पक्षी माझे मित्र झाले आहेत. हो ना रे?’’ चिंटय़ा पोपटांकडे बघत म्हणाला.

‘‘विठ्ठऽऽऽ विठूऽऽऽ’’ एक पोपट बोलला. त्याने दाद दिली. चिंटय़ाच्या आईने पोपटांना पेरू, मिरच्या, डाळिंबाचे दाणे दिले. छान छान खाऊ मिळाल्यामुळे पोपट चिंटूवर खूश झाले.

‘‘मित्रांनो, तुम्ही पुन्हा उद्या याल? मी माझ्या दोस्तांना घेऊन येतो.’’ चिंटू पोपटांना म्हणाला. पोपट विचारात पडले. काय करावं बरं?

‘‘बाबा, तुम्ही या माझ्या मित्रांसाठी छानसा मोठा पिंजरा घेऊन याल?’’ चिंटूने बाबांना विचारलं.

‘पिंजरा’ हा शब्द कानावर पडल्यावर पोपट घाबरले. ते एकमेकांकडे बघू लागले. छानसा पिंजरा बाबा आणणार असल्याची बातमी चिंटूने लगेच पोपटांना सांगितली. पोपट चिंटूकडे रागाने बघू लागले, म्हणाले- ‘‘म्हणजे तू आम्हाला तुरुंगात ठेवणार तर?’’ पोपटांनी चिंटूला विचारलं.

‘‘तुरुंगात नाही काही, पिंजऱ्यात ठेवणार.’’ चिंटूने खुलासा केला.

‘‘म्हणजे तेच. पिंजरा म्हणजे आमच्यासाठी तुरुंगच असतो. स्वतंत्रपणे स्वैरपणे उडायला नको. झाडावरची ताजी ताजी फळं खायला नको. असंच ना?’’ पोपटांनी विचारलं.

‘‘मी देईन ना तुम्हाला खायला ताजी फळं.’ चिंटूने पोपटांना सांगितलं.

‘‘नको नको, तसं नकोच. आम्ही इथून जातोच. शिवाय तू मित्रांना घेऊन येणार म्हणतोस. मित्र आम्हाला त्रास देतील. पकडतील नि पिसं ओढतील. पायाला दोरासुद्धा बांधतील. आम्ही जातोच इथून.’ पोपटांनी निक्षून सांगितलं.

चिंटू रडवेला झाला. बाबांकडे बघू लागला. बाबा म्हणाले, ‘‘पोपट तुला खरं तेच सांगताहेत. पक्ष्यांनासुद्धा स्वातंत्र्य, मोकळेपणा हवाच. तू त्यांच्याशी दुरूनच बोल.’ पोपट चिंटूच्या रडवेल्या तोंडाकडे बघत राहिले. नंतर थोडय़ा वेळाने चिंटूचा निरोप घेऊन निघून गेले. त्यांनी रानात जायचा निर्णय घेतला.

पोपट उडून गेले तरी त्यांचा ‘विठूऽऽ विठूऽऽ’ ओरडण्याचा आवाज चिंटूच्या कानात घुमत होता.