मधुरा वसईच्या आजीकडे निघाली तेव्हा वाटेत आई म्हणाली, ‘‘आश्रमशाळेत माझे थोडे काम आहे, तेव्हा आधी थोडा वेळ तिथे जाऊ या?’’ त्यावर मधुराने जरा घुश्शातच मान हलवली. कालपासून तिची आई-बाबांशी कट्टी होती. कारण तिचा पुढच्या महिन्यात येणारा वाढदिवस तिला इतर मैत्रिणींप्रमाणे मॅकडोनाल्डमध्ये साजरा करण्याच्या तिच्या हट्टाला त्यांनी अजून होकार दर्शवला नव्हता.

आश्रमशाळा म्हटल्यावर तिच्या डोळ्यांपुढे रामायण-महाभारतासारखा अरण्यातला आश्रम आला. पण आईने गाडी मोठे पटांगण असलेल्या दोन लांबलचक बैठय़ा इमारतींसमोर थांबवली, तेव्हा ती बुचकळ्यात पडली. ‘या मावशी,’ म्हणत १२-१३ वर्षांच्या काळ्या-सावळ्या मुलीने त्यांचे स्वागत केले. आईला तिथले सारे बहुतेक ओळखत होते. ‘‘कार्तिकी, कशी आहेस? आज मधुराला- माझ्या मुलीला तुमच्याशी ओळख करायला आणलेय. आताच पाचवीत गेलीय. तिला जरा शाळा वगैरे दाखवतेस? तोपर्यंत मी मावशींबरोबरचे काम संपवते.’’

मधुरा जरा नाखुशीनेच कार्तिकीबरोबर गेली. जेमतेम ४-५ वर्गाच्या त्या शाळेत पाचवी ते सातवीपर्यंत मुलींच्या शिक्षणाची सोय होती. मधले पटांगण ओलांडल्यावर समोरच्या इमारतीत लांबलचक हॉल होता. ज्याच्या सर्व भिंतींमध्ये पाच फुटांपर्यंत बिनदाराची कपाटे होती. त्यातल्या फळ्यांवर प्रत्येक मुलीसाठी अंथरूण, कपडय़ांची बॅग आणि दप्तरासाठी जागा नेमून दिली होती. तिथे सुमारे ७०-८० मुली एकत्र रहात, झोपत आणि अभ्यास करीत. एवढय़ा मोठय़ा हॉलमध्ये फक्त तीन पंखे आणि तीन दिवे होते. कम्प्युटर, एसी अगदी टीव्हीसुद्धा नव्हता. तोपर्यंत मधुराच्या भोवती बऱ्याच मुली जमल्या. त्यांची राहणी, कपडे, बोलणे सर्वच मधुराच्या मैत्रिणींपेक्षा वेगळे होते. ‘‘तुम्ही तुमच्या आई-बाबांकडे का रहात नाही?’’ मधुराच्या या प्रश्नावर त्या मुली म्हणाल्या, ‘‘आमचे घर दूर पाडय़ावर आहे. तिथे शाळाच नाही. तिथून इथे यायचे तर रोज दोन तास पायपीट करावी लागते, कारण पाडय़ापर्यंत रस्ते नाहीत. म्हणून तिथे गाडी बस काहीच पोचत नाही. शिवाय पाडय़ावर विजेचे दिवेपण नाहीत. घरात आम्ही घासलेटचे कंदील वापरतो.’’ एकीचा हा खुलासा संपेपर्यंत दुसरी सरसावत म्हणाली, ‘‘आणि आमचे आई-बाबा वीटभट्टय़ांवर नाहीतर कुणाच्या तरी शेतावर मजुरीला जातात. आश्रमशाळेत आमचा जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च भागतो ना! आम्ही फक्त दिवाळीला आणि मोठय़ा सुट्टीत घरी जातो.’’

इतक्यात जेवणाची घंटा झाली. आईचे काम अजून पूर्ण झाले नव्हते. म्हणून सर्वानी मधुराला त्याच्याबरोबर जेवण्याचा आग्रह केला. व्हरांडय़ात जमिनीवर लांबलचक पंगतीत काही मुली भात, कोशिंबीर आणि मुगाची उसळ वाढत होत्या. ते पाहताच मधुराचं तोंड जरा वाकडं झालं, कारण तिला पानात रोज काहीतरी चटकदार निदान गोड तरी हवं असायचं. इतरांना मनापासून जेवताना पाहून तिने घास घेतला खरा, पण दुसऱ्या क्षणी तिला प्रचंड ठसका लागला. कार्तिकीने पटकन पाणी दिले, पण पाण्याच्या त्या मचूळ चवीने तिचं तोंड आणखीच कसंतरी झालं. तितक्यात तिथल्या मावशींनी तिथे येऊन ‘‘आज मधुराने तुमच्यासाठी लाडू आणलेत बरं का!’’  असं जाहीर करून सगळ्यांच्या पानात वाढले, तेव्हा तिनं आईला नजरेनेच थँक्यू  म्हटलं. जेमतेम चार घास खाऊन मधुरा हात धुवायला गेली तोवर मुलींनी व्हरांडा स्वच्छ करून आपापली ताटेवाटय़ाही घासून ठेवल्या होत्या. मधुराला हे सर्व नवीन होतं. पण त्यांना म्हणे इथेच काय घरीही कामाची सवय होती. सुट्टीत घरी गेल्या की स्वयंपाकापासून खूप लांबवर जाऊन त्यांना पाण्याचे हंडे आणावे लागत. पोळीशिवाय रोजच्या रोज ह्य असेच जेवतात कळल्यावर  ‘‘तुमच्या वाढदिवसाला तरी वेगळी पार्टी असते का?’’ या तिच्या प्रश्नावर सर्वजणी तिच्याकडे बघतच राहिल्या. कारण वाढदिवस म्हणजे काय आणि तो साजरा वगैरे करतात हे त्यांना माहितीच नव्हतं. त्यामुळे पिझ्झा-कोकचा मेनू जाऊच दे, पण पावभाजी-आइस्क्रीम ही नावेही त्यांच्या फारशी ओळखीची नव्हती. आईचे काम संपेस्तोवर मधुरा त्यांच्यात छान रमली. कुणी तिला झाडांची माहिती दिली, कुणी मधुमालतीची वेणी करायला शिकवलं, तर कुणी त्यांच्या वेगळ्याच भाषेतल्या गाण्यावर नाचून दाखवलं.

‘‘चला मधुरा, आजी वाट बघत असेल.’’ आईच्या आवाजाने त्याच्या गप्पांत खंड पडला. सगळ्यांनी तिला राहण्याचा आग्रह केला, पण ‘पुन्हा केव्हातरी नक्की येऊ ,’ असं आईनं परस्परच उत्तर दिलं. गाडी सुरू होता होता कार्तिकीनं तिला द्रोणातून रायआवळे आणून दिले. तेव्हा मधुराला रडू येईलसं वाटलं. गाडी खूप दूर जाईपर्यंत तिला टाटा करणारे हात दिसत होते. गप्प बसून विचारात हरवलेल्या तिच्या नजरेसमोर  घरातील खेळणी, पुस्तकं, कपडे, खूप लाड करणारे आई-बाबा आले आणि यातले काहीच न मिळालेल्या तरीही आई-बाबांना सोडून आनंदाने जिद्दीनं शिकणाऱ्या मुली आठवल्या. मनाशी काही विचार करून ती पटकन म्हणाली, ‘‘आई, माझा वाढदिवस आपण सर्वानी इथे येऊन साजरा केला तर? आणि हो.. त्या दिवशी माझ्याप्रमाणेच या माझ्या नव्या मैत्रिणींनापण काहीतरी गिफ्ट द्यायची का?  खूप मज्जा येईल ना?’’

मॅकडोनाल्ड पार्टी स्पष्टपणे नाकारण्याऐवजी कुठलाही उपदेश न करता या जगाची थोडीतरी ओळख मधुराला करून देण्याचा आईचा हेतू आपसूकच साध्य झाला होता. आईनं तिच्या या कल्पनेला आनंदाने होकार दिला.

alaknanda263@yahoo.com