दिवाळी आली हे माणसांच्या लगबगीवरून जाणवत होतं.  घराघरातून खमंग पदार्थाचे वास सुटले आहेत. मुलांचे किल्ले बांधण्याचे बेत सुरू आहेत. विविध तऱ्हेचे आकाशकंदील, पणत्या यांनी परिसर सुंदर भासत आहे.
माणसांच्या लगबगीची पशुपक्ष्यांनाही चाहूल लागली असावी. त्यांनी तातडीने एक सभा बोलावली. गोमातेला अध्यक्षस्थान बहाल केले. प्राण्यांच्या वतीने कुत्रा आणि पक्ष्यांच्या वतीने चिमणी बोलायला उभी राहिली. कुत्रा आणि चिमणी यांनी गाईला प्रथम वंदन केले आणि सभेसमोर विषय मांडण्याची परवानगी मागितली. विषय होता- ‘प्राण्यांवर प्रेम करून दिवाळी साजरी करा.’
काही माणसे सण साजरे करतात, पण त्याचा आम्हाला उपद्रव होतो, याबद्दल यांच्या मनात जराही विचार येत नाही. काय हे कानठळ्या बसणारे फटाके आणि त्यातून निघणारा हा धूर. कुठेतरी लांब पळून जावंसं वाटतंय. पण कुठे जाणार?’ प्रथम कुत्र्याने भुंकत आपली तक्रार मांडली.
‘हो ना! एकेक काडी वेचून उभारलेली आमची घरटी या फटाक्यांमुळे जळून खाक होतात. आम्हाला इजाही होते. धुराने आमचाही जीव गुदमरतो.’ चिमणी दुजोरा देण्यासाठी चिवचिवली.
‘आवाजाच्या भीतीने आम्ही सरभर होतो. सरावैरा धावताना जायबंदी होतो. लपण्यासाठी जागा शोधावी लागते. अन्नपाण्यावाचून दिवस काढावे लागतात. आम्ही रस्ताही चुकतो.’ प्राण्यांची व्यथा कुत्र्याच्या शब्दातून व्यक्त होत होती.
‘आमची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. पेटती रॉकेट झाडावर पडतात तेव्हा जिवाच्या भीतीने आम्हाला उडून दूर जावे लागते. पिल्लांनाही गमवावे लागते. आमचीही उपासमार होते. यावर उपाय काय?’ हे सांगताना चिमणीचा जीव कासावीस होत होता.
यावर गोमाता त्यांचे सांत्वन करून म्हणाली, ‘मला तुमच्या भावना कळल्या आहेत.’
आपल्या कुटुंबाप्रमाणेच प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचे, पशुपक्ष्यांनाही आनंदाने जगू देण्याचे हे आवाहन तुम्हाला पटते ना!  तर मग या दिवाळीमध्ये आपण मोठय़ा आवाजाचे फटाके टाळू या. इतर फटाकेही आपली आणि पशुपक्ष्यांची सुरक्षितता सांभाळून उडवू या.
ही दीपावली सर्व प्राणिमात्रांना आनंदाची, सुखा-समाधानाची, सुरक्षिततेची जावो!