‘आई गं.. माझ्यासाठी मोठ्ठ फ्रेंडशिप बेलटचं बंडल आणून ठेव हं! माझ्या मित्रांची लिस्ट मोठ्ठी आहे. त्या दिवशी आम्ही सगळे मित्र एकत्र जमून धम्माल करणार आहोत!’ रसिकानं फ्रेंडशिप डेच्या चार दिवस आधी आईला फर्माईश दिली होती.
‘हो, पण काय कार्यक्रम ठरवलाय तुम्ही?’ आईनं उत्सुकतेनं विचारलं.
‘ते नाही सांगणार बाई आत्ताच.. सस्पेन्स आहे आमचं ते. सरप्राइज ऽऽऽ! ’असं म्हणत रसिका खेळायला पळालीसुद्धा.
आज फ्रेंडशिप डे म्हणून सकाळी लवकर उठून, आवरून आईनं आणलेलं बेलटचं बंडल घेऊन बाईसाहेब सोसायटीतल्या मित्रांकडे निघाल्यासुद्धा. जाताना ‘आई ऽऽऽ, आजी ऽऽऽ लक्षात असू दे हं.. संध्याकाळी आम्ही सगळे मित्र जमणार आहोत आपल्या घरी. आर्या, सानू, आदिती, नील, नचिकेत, केदार सगळे येणार आहेत हं. मस्त पावभाजी कर!’ असं सांगायला ती विसरली नाही.
सकाळची गडबड आवरल्यावर घर आवरण्यासाठी सरसावलेली आई काही क्षणातच आवाक् झाली. हॉलपासून बेडरूमपर्यंत सगळीकडे फ्रेंडशिप बेलटनी घट्ट बांधलेले मित्रच मित्र होते रसिकाचे. हॉलमधला टीव्ही, आजोबांच्या मुव्हचा स्प्रे, औषधाचा, खडीसाखरेचा डबा, मधाची बाटली, सगळं गुंडाळलं होतं मैत्रीच्या धाग्यांनी!
‘अगं, बघितलंस का! तुझ्या लेकीनं माझा दासबोध, अंगाऱ्याचा डबा, सगळ्यांना बेल्ट बांधलाय!’ आजी बोलत हसत हसतच हॉलमध्ये आली.
‘कम्माल आहे पोरीची. आता संध्याकाळी सगळे मित्र मिळून धम्माल करतील.. लागलं पाहिजे तयारीला.’ म्हणत आई आणि आजीनं आपला मोर्चा किचनकडे वळवला.
दरवर्षीचा हा मैत्रदिनाचा उत्सव म्हणजे मित्र मंडळीसमवेत साजरा होणारा आनंदोत्सवच असतो. त्या निमित्तानं मैत्रीचा धागा अधिक दृढ होतो. या भावनेनं आईही खूश होती.
संध्याकाळी सगळ्या बच्चेकंपनींची पार्टी सुरू झाली. छान नटूनथटून आलेल्या सगळ्या मित्रांनी एकमेकांना फ्रेंडशिप बेल्ट बांधले.
‘ए आजी, इकडं येऽऽऽ! मला तुला बेल्ट बांधायचाय!’ आर्यानं आजीला हाक मारली.
‘अगंऽऽऽ मला म्हातारीला काय करायचाय बेल्ट?’’ आजी हसत हसत म्हणाली.
‘अगं आजी, घरात कुणी नसतं तेव्हा तूच तर माझा मित्र असतेस. गोष्टी सांगतेस.. प्रोजेक्टसाठी मदत करतेस! आमच्या बाईंनी सांगितलंय वेळेला जो मदत करतो तोच खरा मित्र!
‘हो.. गं बाई!’ म्हणत हसणाऱ्या आजीनं हात पुढं केला.
यावर ऋजुताने घरात घडलेली एक गंमत सांगितली. ‘आज ना आमच्याकडे एक गंमतच झाली. मी आणि आजोबांनी ठरवले. आजोबा फिरायला जाताना मला म्हणाले, ‘मन्या ऽऽऽ माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन ये बघू..!’
‘आजोबांची गर्लफ्रेंड!’ सगळे आवाक् होऊन बघायला लागले. आजीचे डोळे तर ‘हे’ ऽऽ मोठ्ठे झाले..
‘मी पळत जाऊन त्यांची काठी आणली. फ्रेंडशिप बेल्ट बांधलेली! कारण आजोबांना फिरताना तीच मदत करते ना आधार देऊन!’ ऋजुताची गंमत ऐकून मान डोलवत सगळे हसायला लागले.
‘अग, मीपण माझ्या केदारदादूच्या सायकलला फ्रेंडशिप बेल्ट बांधला!’ परकर पोलकं सावरत आदिती म्हणाली. ‘अगं दादाचं सायकलवर जीवापाड प्रेम आहे. खूप जपतो ती. ऑईलिंग करतो, स्वच्छ ठेवतो. सायकल आणि तबला हे मित्र आहेत त्यांचे. कंटाळा आला की विरंगुळा देणारे..!’
जमलेल्या सगळ्यांनाच आता मैत्रीबद्दल काहीतरी सांगायचं होतं!
‘ऐ, मलापण काहीतरी सांगायचं.. ’ म्हणून सानू हातवर करत म्हणाली, ‘आमच्या बागेत काम करणारा गजामाळी झाडांशी छान गप्पा मारतो. झाडांना आंजारतो काय ऽऽ गोंजारतो काय..! तो म्हणतो की, हा बगिचा म्हणजे लई भारी मैतर हाय माझा. कवा बी रागवत न्हाय. रुसत न्हाय. उलट मायाच करतो माझ्यावर! म्हणून मी माळीकाकांना बेल्ट देऊन आले.. झाडांना बांधायला!’
‘अय्या ऽऽ खरंच! म्हणत सगळ्यांनी दाद दिली.’
एव्हाना मुलं छान गप्पा मारताना बघून आजी खूश झाली. ‘ऐ आजी तुझा मित्र दत्तगुरुबाप्पा आणि टीव्ही आहे, हो की नाही खरं सांग!’ रसिकाचं बोलणं आजी कौतुकानं ऐकत होती. ‘म्हणजे दत्तगुरू बाप्पाच्या बर्थडेला..’
‘अगं दत्तजयंती गं’ आजी म्हणाली!
‘तेच ते.. आजी त्याला हार घालते. पेढे ठेवते. आपण नाही का वाढदिवसाला बुके, कॅडबरी देत..अगदी तस्सच! आणि आपण बर्थडे साँग म्हणतो तसं ती प्रार्थना म्हणते. आणि संध्याकाळी नऊ वाजले की बसते टीव्ही समोर शीव-गौरीची वाट बघत. टीव्ही बघताना तिची गुडघेदुखी पार पळून जाते. खरं की नाही.. आजीऽऽऽ!’
अगदी बरोब्बर, ‘अरे, ज्याच्यामुळं आपल्याला आनंद मिळतो तोच खरा मित्र असतो आपला!’ इति आजी’
ऐवढय़ात मुलांना थंडगार सरबताचे ग्लास देत आईही गप्पात सामील झाली.
‘बरं का रे मुलांनो, माझ्या कॉलेजच्या आवारातसुद्धा एक गुलमोहराचं झाड आहे. रोज भेट होते ना आमची. आता तर चांगली मैत्रीच झालीय. मी त्याच्याबरोबर गप्पाही मारते, पण मनातल्या मनातच हं! मी त्याला म्हणते, ‘वा! छान दिसतोस बहरलास की अगदी! माझंही आयुष्य तुझ्यासारखंच बहरलेलं सुख-दु:खांनी.. आनंद समाधानानी! अरे, तुलाही झेलावं लागतं ना ऊन, पाऊस. आणि तुझ्या अंगाखांद्यावर चिवचिवणारी पाखरं.. अगदी माझ्या बाळांसारखी.. अंगाखांद्यावर खेळणारी!’
मुलं मनापासून ऐकत होती. तेवढय़ात चिमुकला नचिकेत म्हणाला, ‘आजी, मला चित्रकला खूप आवडते. वेगवेगळी चित्र काढताना पेन्सिल, ब्रश, रंग.. सगळे माझ्या मदतीला येतात. मग तेच माझे मित्र ना गं? त्यांच्यामुळेच माझं चित्र छान होतं की नाही?’
‘खरंच रे चिक्या!’ म्हणत आजीनं नचीचा गोड पापा घेतला.
‘केदार आता तुझा नंबर हं!’ आजीनं केदारला बोलतं केलं.
केदार म्हणाला, ‘माझ्या विनू आजोबांचा मित्र.. रेडिओ आहे. घरात चौपाटीवर कुठंही असलं तरी त्यांच्या सोबत रेडिओ असतोच. तासन्तास रेडिओ कानाला लावून ऐकतात. ते म्हणतात, ‘हाच माझा खरा मित्र! जो माझा एकटेपणा दूर करतो. मनोरंजन करतो. माहिती देतो. गावाला जातानासुद्धा कपडय़ांच्या आधी बॅगेत रेडिओ ठेवतात ते.’
‘अरे दादा, माझे आजोबा तर तासन्तास वृत्तपत्र, पुस्तकं, मासिकं वाचतात.’ नीलनं सुरुवात केली.
‘आजोबा म्हणतात की, माझी मैत्री अक्षरांशी आहे. कोणतंही कारण नं सांगता रोज नेमानं येणारं वर्तमानपत्रंच माझा खरा मित्र आहे.’
मुलांचं बोलणं ऐकणारी आई म्हणाली, ‘बाळांनो, आपण माणसं राग, रुसावा, हेवेदावे करतो. पण आपल्याला रोज आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या मित्रच असतात की! नेहमीच्या वाटेवरचे रस्ते, दुकानं.. एखादं कोपऱ्यावरचं देऊळ, रेल्वे स्टेशन, रोजचा प्लॅटफॉर्म, नेहमीचा लोकलचा डबा, रोजच्या गजरेवालीनं दिलेला गजरा.. या सगळ्यांशी आपली गाढ मैत्री असतेच की! गाडीत बसल्यावर पळणारी झाडं, शेजारच्या सीटवरचा गप्पा मारणारा प्रवासी हे त्या क्षणाचे मित्रच असतात. घरातले पाळीव प्राणी, बाबांची कार, आईची अंगणातली तुळस यांच्याबरोबर आपली छान मैत्री असते. म्हणूनच जीवापाड प्रेम करतो आपण या साऱ्यांवर!’
आई बोलत असतानाच रसिकानं तयार केलेलं ग्रीटिंग सगळ्यांना दाखवलं. त्यावर तिनं सगळ्या वस्तूंची चित्र काढली होती. आणि हा मजकूर लिहिला होता- ‘माझ्या आजीचे हेच खरे मित्र आहेत. पाय दुखायला लागला की मूव्हचा स्प्रे धावून येतो मदतीला. अंगाऱ्यानं समाधान मिळतं आजीला. औषधाची सोबत तर लागतेच; आणि दासबोधाच्या वाचनानं खूप आनंद मिळतो तिला! चांगली मैत्री तीच असते- जी मनाला आनंद देते आणि निरपेक्ष असते.’
ग्रीटिंगमधला मजकूर ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हा मजकूर आनंद देणारा होताच, पण त्याही पलीकडे निर्विवाद सत्य सांगणारा होता. या भावनेनं आनंदलेली आई म्हणाली, ‘अरेऽऽऽ भूक लागली असेल बोलून. चला सगळेजण मस्तपैकी कांदा, कोथिंबीर, बटर घातलेली गरमागरम पावभाजी खायला. आणि माझ्या मित्रांसाठी मी ड्रायफ्रुटचं आईस्क्रीमसुद्धा आणलंय बरं का!’ हसत हसत आजी म्हणाली.
आज मुलांना मैत्रीचा खरा अर्थ समजला होता. आनंदानं खूश झालेल्या मुलांनी एकमेकांचे हात हातात घेऊन शुभेच्छा दिल्या- ‘हॅपी फ्रेंडशिप डे ऽऽऽ’ आणि पावभाजीवर ताव मारला! आईस्क्रीमची स्वीट डिश होतीच.. सोबतीला मित्रासारखी!
मीरा कुलकर्णी meerakulkarni@gmail.com