‘आई, न्यू इयर रेझो.. रेझो..’’ दुपारी शाळेतून आल्यावर घरात शिरल्या शिरल्या रिंकीचा प्रश्नाचा सूर.

‘‘रेझोल्यूशन..’’ आईने रिंकीचा अडखळलेला शब्द पूर्ण केला.

‘‘हा! न्यू इयर रे-झो-ल्यू-श-न.. म्हणजे काय गं?’’ रिंकीने आता शब्द व्यवस्थित उच्चारला.

‘‘म्हणजे ‘नवीन वर्ष संकल्प’. नव्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच काही तरी चांगली कामगिरी करण्याचा किंवा स्वत:मध्ये काही चांगला बदल घडवून आणण्यासाठी केलेला निश्चय.’’ आईने समजावण्याचा प्रयत्न केला.

‘‘नाही कळलं अजून.’’ रिंकी ओठांचा चंबू करत म्हणाली.

‘‘असं समज की मला आत्ता झालेल्या सहामाहीच्या परीक्षेमध्ये कमी मार्क्‍स मिळाले. त्याचं मला खूप वाईट वाटलं. पण मला हेही समजलं की माझा अभ्यास कमी पडला. मग मी ठरवते की फायनल परीक्षेमध्ये जर मला चांगले मार्क्‍स मिळवायचे असतील, तर त्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये भरपूर अभ्यास करायचा, दररोज धडे वाचायचे, कविता तोंडपाठ करायच्या, नियमित पाढे म्हणायचे. थोडक्यात म्हणजे, खूप मेहनत घ्यायची. मग हा होतो माझा ‘नवीन वर्ष संकल्प’ किंवा ‘रेझोल्यूशन’ – चांगले मार्क्‍स मिळवण्यासाठी. कळलं?’’ आई हे मुद्दामच म्हणाली.

‘‘म्हणजे गेल्या वर्षांपासून आपल्या जयदादाने जसं व्हिडीओ गेम्स खेळणं खूप कमी केलंय, हे त्याचं ‘न्यू इयर रेझोल्यूशन’ होतं का? आधी तो त्याच्या खोलीतच तासन्तास गेम्स खेळत बसलेला असायचा.’’ रिंकी ते आठवत म्हणाली.

‘‘अगदी बरोब्बर. त्याचं खूप डोकं दुखायचं ते गेम्स खेळून. त्यामुळे त्याच्या अभ्यासावरही परिणाम होत होता. त्याचं त्यालाच मग समजलं की आपण कुठे चुकतोय ते. आणि विशेष म्हणजे, आता एक वर्ष झालंय तरी तो चिकाटीने त्याचा संकल्प पाळतोय! तेच खूप महत्त्वाचं आहे.’’ आई कौतुकाने म्हणाली.

‘‘काही जण नवीन वर्षांमध्ये एखादी चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करतात, जसं की भरपूर पुस्तकं वाचणं, व्यायाम करणं वगैरे. किंवा आपण एखादी वाईट सवय मोडण्याचाही प्रयत्न करू शकतो.’’ आई पुढे म्हणाली.

‘‘म्हणजे कुठली सवय?’’ रिंकीचा प्रश्न.

‘‘नखं न खाणं, दात न कोरणं, टेक्स्ट बुकवर न लिहिणं, बूट घालून घरभर न फिरणं वगैरे..’’ आई रिंकीच्या पायांकडे बोट दाखवत म्हणाली. तिच्या आवाजातला सूर थोडा वरचढ झाला होता. रिंकी शाळेचे बूट न काढताच स्वयंपाकघरात आली होती. रिंकीला आईचा बदललेला सूर बरोब्बर कळला. तिने धावत जाऊन बूट काढले आणि शू-रॅकमध्ये व्यवस्थित ठेवले, तिच्या खोलीत जाऊन शाळेचे कपडे बदलले, हातपाय धुतले आणि डायनिंग टेबलपाशी येऊन बसली.

‘‘पण काय गं, तुला का एकदम असा प्रश्न पडला?’’ आईने उत्सुकतेने विचारलं.

‘‘आज घरी येताना स्कूल बसमध्ये मनुताई आणि तिची मैत्रीण एकमेकींना विचारत होत्या. मनुताई म्हणाली की ती या वर्षी फिटनेससाठी दररोज सकाळी लवकर उठून धावायला जाणार आहे. मग तिची मैत्रीण म्हणाली की खूप टी. व्ही. पाहून तिला चष्मा लागलाय. तो जायला पाहिजे म्हणून ती आता टी. व्ही. कमी बघणार आहे.’’

‘‘अरे व्वा! मस्त संकल्प आहेत दोघींचे.’’ आई हसत म्हणाली.

‘‘मनुताईने मग मलापण विचारलं की मी काय करणार ‘न्यू इयर रेझोल्यूशन’ म्हणून. पण मला काहीच नाही सांगता आलं. मी काय रेझोल्यूशन करू?’’ रिंकी निराश होऊन म्हणाली.

‘‘मी सांगून काय उपयोग आहे? तूच विचार कर की!’’ आई ताट वाढत म्हणाली. रिंकी आताशी पाचवीत होती. तिच्या बिल्डिंग मध्ये राहणारी मनुताई सातवीला होती. अर्थातच मनुताईने दिलेली ही नवी माहिती रिंकीच्या मनात रेंगाळू लागली. जेवणाचं वाढलेलं ताट पाहून रिंकीला तंद्री लागली. दोन दिवसांपूर्वी घडलेली एक गोष्ट तिला एकदम आठवली..

रिंकी आणि तिची आई मनुताईच्या छोटय़ा भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. मनुताईच्या आईने, म्हणजे जयू मावशीने सर्वाना आवडेल असा झक्कास बेत केला होता- वेफर्स, गुलाबजाम, पावभाजी, स्ट्रॉबेरी केक आणि कोल्डड्रिंक. सगळ्या मुला-मुलींनी खाण्यावर मस्त ताव मारला. पण रिंकीला काही तो बेत फारसा आवडला नाही. तिने फक्त थोडे वेफर्स खाल्ले, गुलाबजाम खाल्ला, कोल्डड्रिंक प्यायलं आणि उरलेली प्लेट बेसिनमध्ये तशीच नेऊन ठेवली. जयू मावशीने नेमकं ते पाहिलं पण ती काहीच बोलली नाही. ‘रिंकीने काहीच खाल्लं नाही’ हे तिने रिंकीच्या आईला नंतर सांगितलं. तिला काळजी वाटत होती की रिंकी भुकेली तर राहिली नसेल नं, याची. यावर रिंकीच्या आईला काहीच बोलता आलं नाही.

‘‘रिंकी, मावशीने प्लेटमध्ये वाढलेलं सगळं संपवलं का नाहीस?’’ घरी आल्यावर आईने जरा चिडूनच तिला विचारलं. आईला माहिती आहे हे पाहून रिंकी दचकलीच.

‘‘तुला कुणी सांगितलं?’’ रिंकीने घाबरत विचारलं.

‘‘जयू मावशी म्हणाली. तिला वाटलं की तू भुकेली राहिलीस म्हणून.’’ – इति आई.

‘‘कुठे? गुलाबजाम आणि वेफर्स खाल्ले की मी! कोल्डड्रिंकपण प्यायले.’’ रिंकीचं स्पष्टीकरण.

‘‘पण केक आणि पावभाजी का नाही खाल्लीस?’’ आई विषय सोडणारच नव्हती.

‘‘मला नाही आवडला केक. मी थोडा टेस्ट करून बघितला होता.’’ रिंकी कुरकुरली.

‘‘आणि पावभाजीचं काय? तिखट होती का ती?’’ आईने विचारलं.

‘‘नाही. पण मला नाही आवडत पावभाजी.’’ रिंकी वैतागून म्हणाली.

‘‘मग मला का नाही आणून दिलीस तुझी प्लेट? मी सगळं संपवलं तरी असतं!’’ आई पुढे म्हणाली.

‘‘माझ्या नाही लक्षात आलं तेव्हा.’’ रिंकी कावरीबावरी होऊन म्हणाली.

‘‘काय हे, रिंकी? इतक्या लहानशा कारणासाठी तू न खाता अख्खी प्लेट टाकून दिलीस? किती वेळा तुला सांगितलंय की अन्न असं टाकू नये म्हणून! तुझं हे नेहमीचंच झालंय आता. कितीही सवय लावण्याचा प्रयत्न करा, पण काही म्हणून उपयोग होत नाहीये त्याचा..’’ आई खूप रागावली होती. रिंकीकडे न बघताच ती स्वयंपाकघरात निघून गेली. एव्हाना बाबाही ऑफिसमधून घरी आले होते. झालेला प्रकार ऐकून तेही रिंकीवर रागावले.

त्या रात्री जेवणं झाल्यानंतर बाबा टी. व्ही.वर एका न्यूज चॅनल वर चाललेली एक चर्चा मन लावून ऐकत बसले होते. रिंकी खट्टू होऊन शेजारीच बसली होती. एरवी तिने कार्टूनचं चॅनल लावण्याचा हट्ट केला असता, पण आज तिची तशी हिम्मतच झाली नाही. कारण आज आई आणि बाबा तिच्यावर चांगलेच रागावलेले होते. दोघेही तिच्याशी संध्याकाळपासून अगदी गरजेपुरतंच बोलत होते. रोजच्यासारख्या गप्पा नव्हत्या की कसली धम्माल-मस्ती नव्हती. नाइलाजाने मग रिंकीपण ती चर्चा ऐकू लागली.

चर्चा एका आदिवासी भागातील मुलांमधल्या कुपोषणाविषयी सुरू होती. रिंकीला त्यांचं बोलणं फारसं काही समजत नव्हतं, पण अधून मधून दाखवलेल्या क्लिप्स आणि फोटोंमधली ती अंगाकाठीने बारीक, भुकेली मुलं पाहून तिला अगदी गलबलून आलं.

‘‘बाबा, ही मुलं अशी बारीक बारीक का आहेत?’’ रिंकीने विचारलं.

‘‘कारण या मुलांना एक वेळचंसुद्धा व्यवस्थित जेवायला मिळत नाही, दूध प्यायला मिळत नाही. आपल्याला अन्नामधून जे मिनरल्स, व्हिटामिन्स, प्रोटीन्स मिळतात नं, ते काहीच त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे ते अंगाकाठीने असे एकदम बारीक आहेत.’’ बाबा म्हणाले.

‘‘आणि आपण देवाने दिलेलं पोटभर अन्न असंच टाकून देतो. हो की नाही?’’ आई स्वयंपाकघरातून बाहेर येत, पुन्हा तोच विषय छेडत म्हणाली. रिंकीने मान खाली घातली.

‘‘रिंकी, आपण जर अन्न टाकलं नं, तर तेही आपल्याला टाकतं. आपण टाकलेला एक-एक घास हा कदाचित कुणासाठी तरी एक वेळचं जेवण होऊ  शकतं. आमच्या ऑफिसमध्ये मी रोज मोठी मोठी माणसं अन्न टाकताना पाहतो. आमच्या कँटीनमध्ये तर दररोज बोर्डच लावतात की आज किती अन्न वाया गेलं आणि त्यांमध्ये किती लोक जेवले असते.’’ बाबा टी. व्ही.चा आवाज बंद करत म्हणाले.

‘‘आणि जेवायला बसताना आपण काय म्हणतो, ग?’’ आईने विचारलं.

‘‘वदनी कवळ घेता..’’ रिंकीने श्लोक म्हणून दाखवला. तिला तो अख्खा पाठ होता.

‘‘त्यामध्ये म्हटलंय नं- ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’. मग देवाचा असा अपमान करायचा?’’ आई पुन्हा चिडून म्हणाली.

‘‘बेटा, तुला एखादा पदार्थ नाही आवडला तर पुन्हा घेऊ  नकोस! पण ताटामध्ये वाढलेलं तर संपवायलाच हवं नं?’’ बाबांनी समजावलं.

‘‘आणि तो पदार्थ बनवण्यात कुणाची तरी मेहनत असते. आज जयू मावशीने तुला भरलेली प्लेट बेसिनमध्ये टाकताना पाहिलं. तिला किती वाईट वाटलं असेल?’’ आई आता जरा मवाळ होत म्हणाली.

‘‘आपल्या आईलापण असंच वाईट वाटतं, तू अन्न टाकतेस तेव्हा! आणि मला सांग, आमची ताटं कशी असतात जेवण झाल्यावर?’’ बाबांनी मुद्दामच विचारलं.

‘‘एकदम स्वच्छ.’’ रिंकी हळू आवाजात म्हणाली.

‘‘मग? आता पुन्हा असं करू नकोस, बरं? चला आता झोपायला. उद्या शाळा आहे, लवकर उठायचंय..’’ आई तेव्हा हे खरं तर उगाचच म्हणाली होती. रिंकीमध्ये काही फरक पडेल याची तिला मुळीच खात्री नव्हती..

‘‘अगं रिंकी, जेवतेस नं? कसला एवढा विचार करते आहेस?’’ आईच्या आवाजाने रिंकीची लागलेली तंद्री मोडली. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या त्या प्रसंगामध्ये ती एकदम हरवून गेली होती.

‘‘आणि हो, ती दोडक्याची भाजीपण खायची आहे.’’ आई ठणकावून म्हणाली. आईने रिंकीच्या ताटात तिच्या आवडीची बटाटय़ाची आणि थोडी दोडक्याची भाजी वाढली होती.

‘‘आई, मला माझा नवीन वर्षांचा संकल्प सापडलाय.’’ रिंकी आनंदाने म्हणाली.

‘‘कुठला, गं?’’ आईचा प्रश्नार्थक चेहरा.

‘‘मी आता अन्न कधीच वाया घालवणार नाही. परवा त्या बारीक बारीक मुलांना बघून मला खूप वाईट वाटलं. म्हणून मी हे ठरवलंय. मी जयू मावशीलापण ‘सॉरी’ म्हणणार आहे. आणि तुलापण एकदम ‘सॉरी’.’’ शेजारी उभ्या असलेल्या आईला रिंकीने गच्च मिठी मारली. आईनेपण तिचा छानसा पापा घेतला.

रिंकीला होणारी ही जाणीवच महत्त्वाची होती. बाकी तिच्या ‘न्यू इयर रेझोल्यूशन’चं पुढे काय होईल हे येणारं नवीन वर्ष ठरवणार होतं. पाहू या आपली रिंकी तिचं रेझोल्यूशन किती पाळते ते!

दोस्तांनो, तुम्हीही रिंकीप्रमाणे या नवीन वर्षांत तुमच्यामधली एखादी वाईट सवय बदलण्याचा प्रयत्न करा किंवा एखादी चांगली गोष्ट करायला सुरुवात करा. न्यू इयर रेझोल्यूशन पाळतानासुद्धा आपल्याला एक शिस्त लागते. बघा तर करून!! हॅप्पी न्यू इयर..

प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com