16 October 2019

News Flash

पहिली कमाई

‘‘ हो काका, नक्की येतो.’’ त्यांना उत्तर देता देता त्याच्या मनात एक विचार चमकून गेला.

प्रतिनिधिक छायाचित्र

भारती महाजन-रायबागकर – bharati.raibagkar@gmail.com

तेजसच्या सोसायटीत आनंदमेळा भरवण्याचे ठरले होते. पार्किंगच्या मोकळ्या जागेत आयोजक स्टॉल्ससाठी जागा आखून देत होते. तिथेच खेळत असणाऱ्या तेजसने त्यांना विचारलं, ‘‘काका, कशाकशाचे स्टॉल्स लागणार आहेत इथं?’’

‘‘ अरे, भरपूर आहेत स्टॉल्स. खेळणी, कपडे, दागिने, गेम्स.. तू ये संध्याकाळी, मज्जा कर.’’

‘‘ हो काका, नक्की येतो.’’ त्यांना उत्तर देता देता त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. आपणही एक स्टॉल लावला तर? नेहमी आपण आई-बाबांकडून पैसे घेऊन गेम्स खेळतो. खाऊ घेतो. या वेळेस आपणच स्टॉल लावायचा.. ठरलं तर मग! लगेच त्यानं आयोजकांना विचारलं, ‘‘काका, मीपण लावू स्टॉल?’’

‘‘ तू? तू कशाचा स्टॉल लावणार? लहान आहेस. तू मज्जा करायची सोडून..’’

‘‘ हो काका, मज्जा मी नेहमीच करतो, पण या वेळेस मला स्टॉल लावायचाय, प्लीज!’’

काकांनी तेजसचा हिरमोड केला नाही आणि त्यांनी त्याला स्टॉल लावण्याची परवानगी दिली.

‘‘ थँक्यू काका,’’ असं म्हणत तो घरी पळाला.

‘‘ आई, ए आई, मला आनंदमेळ्यात स्टॉल लावायचाय.’’

‘‘ काहीतरीच काय, लहान आहेस तू अजून. तिथं सगळे मोठय़ा माणसांचे स्टॉल असणार आहेत.

‘‘ म्हणून काय झालं? मला लावायचाय स्टॉल.’’

‘‘ बरं, कशाचा स्टॉल लावणार? चॉकलेट्स, बिस्कीट्स, पॉपकॉर्न..’’

‘‘ छे, काहीतरी स्किल दिसलं पाहिजे. कशाचा स्टॉल लावावा बरं?  हं.. आयडिया, माझ्याकडे खूप गेम्स आहेत, त्यातला एखादा चॅलेंजिंग गेम ठेवतो खेळायला. वन मिनिट गेम, १० रु. तिकीट, कसं?

‘‘ अरे व्वा! छान, आता आईलाही गंमत वाटू लागली होती.

‘‘आणि आई, हा गेम वेळेत पूर्ण करतील त्यांना आपण काहीतरी बक्षिस देऊ या. कशी आहे आयडिया?’’

‘‘ हो, हो, ते तर द्यावेच लागेल.’’

संध्याकाळी आईच्या मदतीनं एका टेबलवर आपला गेम मांडला. कागदावर ठळक अक्षरांत- ‘दाखवा आपल्या बुद्धीची कमाल, फक्त १० रुपयांत’ असं लिहून तो कागद टेबलावर चिकटवून टाकला आणि एखाद्या सराईत विक्रेत्यासारखा टेबलामागे जाऊन उभा राहिला.

त्याच्या शेजारीच नमिताच्या मत्रिणीचा स्टॉल होता. ‘‘अगंबाई नमिता, तेजसनं स्टॉल लावलाय. भारीच स्मार्ट आहे हं तेजस. खूपंच छान!’’ नमिताच्या  मत्रिणीला तेजसचं कौतुक वाटलं.

‘‘ हो गं, हट्टच धरला बघ, अनायासे तुझा स्टॉल शेजारीच आहे. मी थांबते तुला मदत करायला, म्हणजे तेजसवरही लक्षही ठेवता येईल. हळूहळू लोक यायला सुरुवात झाली. सर्वजण या छोटय़ा स्टॉलवाल्याकडे बघून त्याचं कौतुक करत होते. सोसायटीत तेजसचे मित्रही होते. चिन्मय येऊन त्याला म्हणाला,

‘‘तेजस, चल आपण धम्माल करू. पण तू तर स्टॉल लावलास! कुठला गेम आहे? मी खेळू?’’

‘‘१० रु. तिकीट,’’ तेजस कागदाकडे बोट दाखवून म्हणाला.

‘‘ ठीक आहे, मी बाबांकडून घेऊन येतो.’’ येताना तो आणखी काही मित्रांना घेऊन आला. सर्वच मित्रांनी एकदम गर्दी केलेली पाहून नमिता म्हणाली, ‘‘ तेजस थांब, मी मदत करते तुला.’’

‘‘ नको आई, मी करतो सर्व बरोबर.’’  सगळ्यांनी रांगेत उभे राहा बरं, म्हणजे प्रत्येकाला गेम खेळायला मिळेल. निलेश, तू त्या कार्तिकच्या मागे उभा राहा. या आता एकेक जण.. नमिताला कौतुक वाटलं. नितीन कंपनीतून घरी आल्यावर आनंद-मेळ्यात चक्कर टाकण्यासाठी खाली आला. पैसे खर्चून धम्माल करण्याऐवजी तेजसनं स्वत:चा स्टॉल लावलेला पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं. तो काही बोलणार तोच नमितानं त्याला बाजूला बोलावून सर्व सांगितलं. मग तोही एका बाजूला मित्रांबरोबर गप्पा मारत उभा राहिला. आनंद-मेळा संपला. तेजस गेम आणि पशांची डबी घेऊन आईबरोबर घरी आला.

‘‘ आई-बाबा, काय मज्जा आली. सर्वाना आवडला माझा गेम आणि स्टॉल लावण्याची आयडियासुद्धा. आणि माहितीय का बाबा, त्या जोशीकाकांनी तर शूटिंगपण केलं. भारी नं. या, आता पैसे मोजू आपण.’’ आई-बाबा आनंदानं आपल्या या छोटय़ा बिझनेसमनच्या मदतीला आले. रात्री झोपेतही तेजस ‘ए, रांगेत उभे राहा. १० रु.तिकीट.. प्राईझ घ्या.’ असंच काहीसं बडबडत होता.

दुसऱ्या दिवशी तेजस बाबांबरोबर हॉलमध्ये बसला होता. आई किचनमध्ये ब्रेकफास्टची तयारी करत होती.

‘‘काय तेजस, काय करणार मग काल कमावलेल्या पशांचं? तुझ्यासाठी पुन्हा एखादा गेम आणणार की नवे कपडे.. की आणखी काही?’’ बाबांनी विचारलं.

‘‘काहीच नको बाबा, थोडे पैसे मी पिगी बँकेत टाकणार. आपलं ठरलंय ना ते आश्रम-शाळेतल्या मुलांचं आणि उरलेल्या पशांचं.. इकडं कान करा.. सांगतो..’’ आईचा कानोसा घेत तेजसनं बाबांच्या कानात काहीतरी साांगितलं.’’

‘‘व्वा, ग्रेट,शाब्बास.’’ बाबा मोठमोठय़ानं उद्गारले..‘‘बाबा हळू, सिक्रेट आहे नं आपलं. सरप्राइज आहे.’’ संध्याकाळी ते दोघंच बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी तेजसचे आजोबा गावाहून परत आले. आजीच्या मांडीवर बसून त्यानं त्यांनाही आपल्या स्टॉलची गंमत सांगितली.

‘‘अरे व्वा, मोठा बिझनेसमन होणार वाटतं आमचा तेजस.’’ आजी कौतुकानं म्हणाली.

‘‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.’’ आजोबांनी शाबासकी दिली.

दुसऱ्या दिवशी नमिताचा वाढदिवस होता. तिने आजी-आजोबांना नमस्कार केला. आजीनं आईचं औक्षण केलं आणि केक कापल्यावर तिला एक छानशी पर्स भेट म्हणून दिली. बाबांनीही आईच्या आवडीच्या रंगाचा ड्रेस आणला होता. आता ती उठणार एवढय़ात तेजस एक सुंदरसं मोबाइल कव्हर पुढं करत म्हणाला, ‘‘आई, तुला माझ्याकडून गिफ्ट, माझ्या पहिल्या कमाईचं.. आवडलं?’’ नमिता अवाक् झाली. आपलं एवढंस पिल्लू केवढं मोठं आणि समजूतदार झालंय..

‘‘खूप आवडलं रे राजा. खूप गुणी बाळ ते..’’ तेजसला जवळ घेत आई म्हणाली.

 

First Published on October 28, 2018 1:15 am

Web Title: heart touching inspirational story for kids with moral