12 July 2020

News Flash

एकमेकां साह्य करू!

नूतन विद्यामंदिर नावाची मराठी माध्यमाची एक प्रथितयश शाळा!  शाळा अनुदानित असल्यामुळे शाळेची फी खूपच माफक होती

(संग्रहित छायाचित्र)

मीनाक्षी सावरकर

नूतन विद्यामंदिर नावाची मराठी माध्यमाची एक प्रथितयश शाळा!  शाळा अनुदानित असल्यामुळे शाळेची फी खूपच माफक होती. शाळेचा निकालही दरवर्षी चांगलाच लागत असे. शाळेत येणारे बहुसंख्य विद्यार्थी जवळच्या कॉलनीतील मध्यमवर्गीय आणि नोकरदार कुटुंबांतील होते. अलीकडेच कॉलनीला लागून असलेल्या कामगार वस्तीतील मुलेही या शाळेत शिकत होती. याचे मुख्य कारण- शाळेतील मराठमोळे साधे वातावरण आणि शाळेची माफक फी!

असे सर्व काही सुरळित चालू असताना, अचानक घाटेबाईंना त्यांच्या वर्गातील काही मुलांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ही सर्व अभ्यासात हुशार होती. सर्वाचे वर्तनही चांगले होते. असे असूनही त्यांना जाणवले, ही मुले अस्वस्थ आणि बेचैन वाटत होती. आणि त्यातील काही मुले वर्गातील मोहन नावाच्या मुलाकडे पाहून एकमेकांना खाणाखुणा करीत होती. आपापसात कुजबुजत होती. याबाबत घाटेबाईंना त्या मुलांना हटकलेही, पण सगळे मूग गिळून बसले होते.

मोहन जवळच्याच कामगार वसाहतीत राहत होता. या वस्तीत राहणारे बरेच लोक छोटे-मोठे व्यवसाय करून घर चालवीत होते. कोणी भंगार विकत असे, कोणी रद्दी पेपरचा व्यवसाय करीत असे. कोणी संध्याकाळी भेळ-पुरी, पाणीपुरीची गाडी लावीत असे, तर कोणी सकाळी हातगाडीवरून भाजी विकत असे. त्यामुळे या सर्वाचे हातावर पोट होते. आपल्या मुलाने खूप शिकावे असे वाटून मोहनच्या वडिलांनी त्याला या शाळेत घातले होते. मोहनदेखील मनापासून अभ्यास करीत असे. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तो सर्वाचा लाडका होता.

पण मागील पंधरा दिवसांपासून मोहनने वेगळेच सत्र आरंभले होते. त्याच्या वर्गातील सुनील, रिया आणि त्यांच्या ग्रुपमधील मुलांच्या डब्यातील थोडेथोडे खाणे तो लंपास करीत होता. या सर्व ग्रुपच्या ही गोष्ट लक्षात आली होती. पण आपली फजिती करण्यासाठी किंवा टर उडवण्यासाठी कोणी तरी हे करत असावे, असा विचार करून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. पण त्यामुळे मोहनचे धाडस हळूहळू वाढू लागले आणि एक दिवस सुनील आणि रियाने मोहनला ही चोरी करताना पाहिले. पण त्याच्या गरीब स्वभावाकडे पाहून हे दोघे गप्प बसले. पण आता रोजच कुणाचा ना कुणाचा तरी डबा खाल्ला जात होता. त्यातील खाणे कमी झालेले दिसत होते. हे लक्षात आल्यावर एक दिवस त्या सर्वानी त्यांच्या वर्गशिक्षिका घाटेबाईंकडे मोहनच्या या चोरी करण्याच्या सवयीबाबत तक्रार केली. आतापर्यंत मारामारी, चिडवाचिडवी, पेन्सिल-रबर पळवणे अशा किरकोळ तक्रारी सहजपणे सोडवणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. पण ही जगावेगळी चोरी आणि विचित्र तक्रार ऐकून बाई स्वत:च थोडय़ा गोंधळून गेल्या. क्षणभर त्यांचा विश्वासच बसेना या गोष्टीवर! कारण एरवी मोहन एक चांगला विद्यार्थी होता. त्याच्याकडून असे काही अपेक्षितच नव्हते. पण दुसऱ्याच दिवशी प्रियाने आपला अर्धवट डबा बाईपुढे ठेवून पुरावाच सादर केला. त्यामुळे बाईंचाही नाइलाज झाला. आणि त्यांना याची दखल घेणे भाग पडले.

दुसऱ्याच दिवशी बाईंनी मोहनला भेटायला बोलावले. बाईंनी आपल्याला का बोलावले आहे हे मोहन समजून होता. आपली तक्रार बाईंपर्यंत पोचली असावी या शंकेने मोहन चांगलाच घाबरला होता. आपल्याला आता बाई खूप मार देतील, कदाचित मुख्याध्यापकबाई मोठी शिक्षाही करतील या कल्पनेने त्याला धडकीच भरली. बाईंनी काही विचारण्यापूर्वीच त्याने आपले दोन्ही कान पकडून बाईंची माफी मागितली. एवढेच नव्हे, तर बाईंचे पाय धरून, ‘‘मी चुकलो, पुन्हा असे करणार नाही. या वेळी मला माफ करा,’’ असे गयावया करीत मुसमुसून रडत रडत बाईंसमोर आपल्या चुकीची कबुली देऊ लागला. बाईंनी थोडा वेळ त्याला रडू दिले आणि नंतर शांतपणे त्याला जवळ बोलावले. त्याच्या पाठीवर मायेने थोपटले आणि म्हणाल्या, ‘‘म्हणजे, तू चुकीचे वागलास हे तुला मान्य आहे तर?’’ मोहनने होकारार्थी मान डोलावली. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मी तुला आज काहीही शिक्षा करणार नाही. कारण तुझ्यासारखा हुशार आणि शहाणा मुलगा असे लाजिरवाणे कृत्य करेल यावर माझा विश्वासच बसत नाही. पण मला याच्या मागचं खरं कारण कळलं पाहिजे. का तू रोज इतरांच्या डब्यातलं चोरून खात होतास? विनासंकोच मला सर्व सांग, मी ते कुणालाही सांगणार नाही. ते फक्त तुझं आणि माझं गुपित असेल!’’ असं बोलून बाईंनी मोहनला विश्वासात घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण मोहन काही बोलायला तयारच नव्हता. फक्त पुन्हा पुन्हा रडत रडत माफी मागत होता. शेवटी बाईंनी मोहनला दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले. मोहनने मान डोलावली आणि डोळे पुसत पुसत वर्गात गेला. तेव्हा तक्रार करणारी सहाही जण गोरेमोरे झाले होते, जणू काही आपणच अपराधी आहोत असे त्यांना वाटत होते.

दुसऱ्या दिवशी मोहनच्या वडिलांच्या भेटीत घाटेबाईंनी घडलेला सर्व प्रकार शांतपणे आणि सावकाशपणे त्यांना सांगितला. मोहनच्या असे वागण्याचे कारण बाईंनी विचारले. सर्व बाबतीत हुशार, आज्ञाधारक आणि चुणचुणीत असणारा हा मुलगा असे वेडय़ासारखे का वागला, याचे गूढ बाईंना उलगडत नव्हते. ते जाणून घेण्यासाठी बाईंनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला. मोहनच्या वडिलांनाही मोहनची चूक लक्षात आली होती. त्यांनीही बाईंपुढे हात जोडून पुन्हा पुन्हा माफी मागितली. त्यांचा चेहरा पडला होता आणि ओशाळवाणे होऊन त्यांनी सांगितलेली हकिकत पुढीलप्रमाण होती..

मोहनच्या घरी फक्त त्याचे वडील आणि मोहन दोघेच राहत होते. त्याची आई तो लहान असतानाच आजारपणात हे जग सोडून गेली होती. आतापर्यंत मोहनच्या वडिलांनी एकटय़ानेच त्याला वाढवले होते. मोहनचे वडील रोज सकाळी हातगाडीवर गावात फिरून भाजी विकण्याचा व्यवसाय करीत. त्यावरच त्यांचे घर चालत असे. या कामासाठी त्यांना रोज पहाटेच घाऊक बाजारातून भाजी आणायला जावे लागत असे. ते परतण्यापूर्वीच मोहन शाळेसाठी तयारी करून शाळेत निघून जात असे. त्यामुळे त्याला शाळेचा डबा द्यायला घरी कोणीच नसे. कधीतरी दोन-तीन केळी किंवा बिस्किटाचा छोटा पुडा असे काहीतरी खाऊन त्याला भूक भागवावी लागत असे. काही वेळा तेही त्याच्या वडिलांना जमत नसे. अशा वेळी भूक अनावर झाली की तो इतरांच्या डब्यातील खाणे चोरून खात असे. पण यापुढे कधीही तो असे करणार नाही आणि घरी गेल्यावर ते त्याला जबर शिक्षा देतील अशी त्यांनी कबुली दिली.

ही हकिकत मनाला चटका लावणारी होती. खरे कारण कळल्यावर बाईंचे मन कळवळले. बाईंच्या मनातील रागाची जागा आता कणवेने घेतली. त्यांना या आईविना मुलाबाद्दल माया दाटून आली. त्यांच्या पोटात गलबलून आले. आणि या सर्व प्रकरणाचा त्या सहृदयतेने विचार करू लागल्या.

दुसऱ्या दिवशी बाईंनी त्या तक्रार करणाऱ्या मुलांना बोलावले आणि त्यांना मोहनच्या वडिलांनी सांगितलेली मोहनची परिस्थिती समजावून सांगितली. आणि पुढे त्या म्हणाल्या, ‘‘असं असलं तरी मोहनने असं करायला नको होतं. त्याने खूप मोठी चूक केली आहे. त्याची ही सवय वाईटच आहे. पण तो तरी काय करणार? तुम्हाला भूक लागते तशीच त्यालाही भूक लागते. तुमच्या घरी तुमची आई आहे तुम्हाला रोज डबा करून द्यायला. पण त्याच्या घरी तसे कुणीच नाही आणि डबा करायला स्वयंपाकी ठेवणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे भूक अस झाली की त्याच्या हातून हे कृत्य घडते आणि तो चोरून खाऊन आपली भूक भागवतो. हे सर्व थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो?’’ असे म्हणून मुलांच्या उत्तरासाठी त्या थोडा वेळ बोलायच्या थांबल्या. मोहनची ही हकिकत ऐकून तक्रार करणाऱ्या सगळ्यांना उगीचच अपराधी वाटू लागले. आपण तक्रार केली हे आपले चुकलेच, असेही त्यांना वाटू लागले. तेवढय़ात बाई पटकन् म्हणाल्या, ‘‘मला एक उपाय, एक मार्ग सुचतो आहे. मोनहला रोज मधल्या सुट्टीत खायला मिळाले तर तो अशी चोरी करणार नाही. म्हणून हा उपाय तुम्हाला पटत असेल तर पाहू या करून,’’ असे म्हणून बाईंनी असे सुचवले की, मोहन तुमचा जिवलग मित्र आहे. म्हणून उद्यापासून तुमच्यापैकी एकेकाने आळीपाळीने रोज स्वत:च्या डब्याबरोबर जास्त डबा आणायचा आणि तो जास्त आणलेला डबा मोहनसाठी असेल! मधल्या सुट्टीत तुमच्याबरोबर त्याला तो डब्बा खायला द्यायचा. अर्थात हे सगळे करताना तुमच्या आईचे काम वाढेल. तेव्हा तुम्ही आपापल्या आईला विचारून उद्या मला काय तो निर्णय सांगा,’’ असे म्हणून बाई उठल्या. पण त्यावर एकमुखाने आणि तत्परतेने सगळे जण लगेच म्हणाले. ‘‘हो बाई. आमची आई नक्की देईल आमच्या मित्रासाठी जास्तीचा डबा. त्यासाठी आईला विचारण्याची गरज नाही. आमची आई खूप प्रेमळ आहे. ती नक्कीच हो म्हणेल.’’ सर्व मुलांनी आत्मविश्वासाने हे अश्वासन दिले. हे पाहून बाई चकितच झाल्या.

दुसऱ्या दिवसापासून या प्रयोगाला सुरुवात झाली. आणि गंमत म्हणजे चोरीचा प्रकार बंद झाला. सुरुवातीला मोहनला मित्राचा डबा खाताना संकोच वाटत होता. पण या सर्वानी त्याला इतके प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घातले की, तो हळूहळू त्यांच्यातीलच एक झाला. आता मधल्या सुट्टीत डबा खाण्याच वेगळीच मजा येऊ लागली. त्या सर्वामध्ये एक मैत्रीचे वेगळेच स्नेहबंध निर्माण झाले.

लहान वयातच नकळत एकमेकांबद्दल आपुलकी, जिव्हाळा आणि परस्परांना मदत करण्याचे चांगले संस्कार होताना पाहून पालकांनाही खूप समाधान वाटले. आणि सर्व पालकांनी यासाठी घाटेबाईंना धन्यवाद दिले. ‘एकमेका सा करू, अवघे धरू सुपंथ’ हा सुविचार फक्त पाठय़पुस्तकांतून न शिकवता घाटेबाईंनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांना दिला याबद्दल पालकांनी आणि मुख्याध्यापकबाईंनी त्यांचे खूप कौतुक केले.

lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 4:03 am

Web Title: help each other balmaifal article abn 97
Next Stories
1 गजाली विज्ञानाच्या : ओठांत एक अन् पोटात एक
2 स्वार्थी राक्षस
3 कार्टूनगाथा : शिनोसुके बच्चन!
Just Now!
X