होळी अगदी दोन दिवसांवर आली होती. मुलांचे होळीचे बेत सुरू झाले होते. ‘ए सौमित्र, आपण होळी खेळायची?’ अर्णवने विचारलं.
‘खेळू या नि धमाल करू या’, सौमित्र सर्वाकडे बघून म्हणाला.
आर्यनच्या घरासमोर भरपूर मोकळी जागा होती. सौरभच्या घरामागे मोठी मोठी झाडं होती. मुलांनी मोकळ्या जागेत होळी पेटवायची ठरवलं.
शाळेतून मुलं घरी आली नि दप्तर कोपऱ्यात फेकून ताबडतोब माळीदादाकडे गेली. मुलांना होळीसाठी खड्डा खणायचा होता. त्यासाठी कुदळ, फावडं, घमेलं हवं होतं. माळीदादाला मस्का मारून मुलांनी सर्व काही मिळवलं. मुलं जोशात कामाला लागली. खड्डा खणायला, माती भरून कोपऱ्यात टाकायला सुरुवात झाली. खड्डा तयार झाला. मुलं दमून गेली, पण त्यांचा उत्साह मात्र कायम होता.
दुसऱ्या दिवशी मुलांनी सोसायटीतून फिरायचं ठरवलं. त्यांना होळीसाठी सामान जमवायचं होतं. प्रत्येक घरी जाऊन मुलांनी जुनं सामान गोळा केलं. कोणी जुने  खोके दिले, तर कोणी माळ्यावर टाकलेल्या आंब्याच्या लाकडी पेटय़ा दिल्या. कोणी मोडकी खुर्ची, तर कोणी जुनं लाकडी स्टूल.  कोणी रद्दी कागद दिले.
घराघरातला भंगार माल होळीसाठी खणलेल्या खड्डय़ाजवळ येऊन पडला. आता फक्त तो माल खड्डय़ात रचायचा होता. ते काम मोठी मुलं करणार होती.
बाजारातल्या रंगांच्या पिचकाऱ्या नि रंग घराघरातून दिसायला लागले. घराघरातून पुरणपोळ्यांचा खमंग खरपूस वास येऊ लागला. वातावरण अगदी होळीमय झालं होतं. मात्र, सौरभच्या घरामागची झाडं घाबरून गेली होती. गप्प उभी होती. कारण होळीसाठी त्यांच्या अंगावर केव्हाही कुऱ्हाड पडणार होती. फांद्या होळीत पडणार होत्या. त्या जळून खाक होणार होत्या. आगीचे चटके सहन करावे लागणार होते. पण काय करणार? कोणाला सांगणार? झाडांचं ऐकून कोण घेणार?..
दिवसभर काम करून दमून गेल्यामुळे सौरभ लवकर झोपला. झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला विचित्र आवाज ऐकू येत होते. ‘आमच्यावर कुऱ्हाडीने वार करू नका रे’ ‘फांद्या तोडू नका रे’ ‘आमची होळी करू नका रे’, ‘आम्हाला आग, चटके सहन होणार नाहीत. आम्हाला पळून जाताही येत नाही. आम्ही तुमच्या किती उपयोगी पडतो. तुम्हाला आम्ही फळं, फुलं, औषधं देतो. प्राणवायू देतो. सावली देतो. आमच्यावर कृपा करा नि आम्हाला वाचवा’ झाडं विनवणी करीत होती. आपसात बोलत होती. सौरभ झाडांचं सगळं बोलणं ऐकत होता. त्याला आगीच्या मोठमोठय़ा ज्वाळा दिसत होत्या. आगीचे चटके बसत होते. झाडं रडत होती. ओरडत होती. विव्हळत होती. कण्हत होती..
सौरभ घाबरून उठला. तो भयानक स्वप्नातून जागा झाला होता. तो खिडकीतून बाहेर बघायला लागला. रोजची झाडं तिथेच उभी होती. तो खिडकीजवळच विचार करत उभा राहिला. झाडं आपल्याकडे पाहातायत असं क्षणभर सौरभला वाटलं. मिहिरदादा अभ्यास पूर्ण करून झोपायला खोलीत आला. सौरभला खिडकीजवळ उभा असलेलं पाहून त्यानं विचारलं, ‘सौरभ, तू झोपला नाहीस अजून? झोप जा.’
सौरभने दादाचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, ‘मला भीती वाटते.’ त्याने ते भयंकर स्वप्न दादाला सांगितलं. दादाने त्याला जवळ घेतलं. असं काही होणार नाहीए. आम्ही सर्वानी एकमताने ठरवलंय की, होळीसाठी झाडं तोडायची नाहीत. आगीत टाकायची नाहीत.
सौरभला धीर आला. त्याला बाईंनी सांगितलेलं आठवलं- ‘झाडं लावा, झाडं वाढवा, झाडं जगवा- पर्यावरण साधा.’
नंतर सौरभ शांत झोपला. दुसऱ्या दिवशी सौरभने स्वप्नातली गोष्ट मुलांना सांगितली. मुलांना त्या स्वप्नाची गंमत वाटली.
रात्री होळी पेटली, पण भंगार सामानाची. शिवीगाळ न करता, आरडाओरडा न करता टाळ्यांच्या गजरात होळी साजरी झाली. त्यामुळे पुरणपोळ्यांची गोडी अधिकच वाढली. धुळवडीलाही मुलांनी बेतानेच पाणी उडवलं, पण कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर केला नाही. त्यामुळे मुलांची ही अशी होळी आणि धुळवड सर्वानाच खूप आवडली.