छोटय़ा दोस्तांनो, अर्धीअधिक सुट्टी संपली की. सगळं कसं अगदी मनाप्रमाणे चाललंय ना! तो सूर्य बिचारा कुतूहलाने डोकावून जातोय तुमच्या खोलीत, पण साडेनऊ-दहा वाजले तरी तुमचा डोळाच उघडत नाही. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागले की तुम्हाला उठावंच लागतं. तिथून उठता ते हॉलमध्ये सोफ्यावर येता. स्वयंपाकघराच्या दिशेने हळूच कानोसा घेता. सगळे आपापल्या कामात गर्क बघून हळूच दात घासण्याचं काम पटकन उरकून टाकता. दुधाचा ग्लास पितानाच खिडकीतून खेळगडय़ांची चाहूल लागते. मग घाईघाईत आंघोळ उरकून बाहेर खेळायला पसार होता. मग दिवसभर बाहेर उंडारायचं, पत्ते कुटायचे, कॉम्प्युटरवर गेम खेळायचे, कार्टून नेटवर्क बघायचं, सीडी बघायची, मोबाइलवर खेळत राहायचं, असं तुमचं चक्र चालूच. त्यात अधूनमधून पोटपूजेचा ब्रेक. शिवाय मॉलमध्येही फिरून खाणं, खरेदी सगळं झालंय म्हणे! रिझॉर्टला पण दोन-तीन दिवस जाऊन आलात, मग मज्जाच मज्जा झाली की.
इतकं असूनही या क्षणी सोफ्यावर लोळताना तुमचा चेहरा उतरलाय. कंटाळा आलेला दिसतोय सुट्टीचा. एक गंमत सुचवू का? थोडं घरातल्या कामात लुडबुड करायला लागा बघू. खूप उकडतंय, अशा वेळी थंडगार लिंबाचे सरबत प्यायला आवडेल ना! असं करता का, तुम्हीच का करीत नाही सरबताचा प्रयोग. दोन-तीन कप पाणी घ्या. पाच-सहा चमचे साखर घाला आणि एक लहान लिंबू पिळा. सुरीने लिंबू कापताना, लिंबू कापायचंय, बोट नाही, हे लक्षात ठेवा. चवीला मीठ घाला आणि मस्त ढवळा. ढवळताना ‘सांडलवण’ होणार नाही याची काळजी घ्या. शिवाय हा शब्दही लक्षात ठेवा. मस्त नवीन ग्लास काढा, धूळ उडलेली दिसतेय ना, मग हळूहळू धुवा. फोडून दोनाचे चार करू नका हं. चव घेऊन आंबट की गोड याचं शिक्कामोर्तब करा. आंबट झालं असेल तर साखर घाला, गोड झालं असेल तर लिंबू पिळा. जरा फ्रीजमध्ये गार करून ट्रेमधून सगळ्यांना देऊन आश्चर्यचकित करा. किती कौतुक होईल याचा अनुभवच घ्या.
बाबा ऑफिसमधून दमून-भागून आले की, त्यांना चहाच लागतो. मग चहा करायचा प्रयत्न करा बघू. गॅस पेटवताना मात्र सावधान. मोठय़ांच्या उपस्थितीत प्रयोग करा. नवीन ‘मग’ आणलेले आहेत ना. मग सावकाश तेच खाली काढा. जमल्यास क्रोकरीचा तो कप्पा ओल्या फडक्याने पुसून ठेवा आणि तुम्हाला आवडेल असा लावा. चहा-साखर दूध घालून फक्कड चहा करा. चिमटय़ाने उतरविताना सांभाळा. अंगावर सांडून घेऊ नका. नाहीतर भाजेल. प्रत्येक गोष्टीचं एक तंत्र असतं. ते सवयीने आत्मसात करता येतं. गरमागरम चहाची तल्लफ तुम्ही पुरी केलीत की बाबा खूश. चहा किंवा सरबत तुमच्याच हातचं प्यायचं, यावर घरातल्यांचं एकमत झालेलं दिसेल तुम्हाला. काही मागणी असेल ना तर मनात विचार करून ठेवा, बघा लगेच पुरी होते की नाही ते.
कसं वाटतंय, आळस पळून गेलाय आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करताना मनाला बरं वाटतंय ना! आता त्या सोफ्यात बसूच नका. वाऱ्याने सगळे कपडे खाली पडलेत बघा. सगळे गोळा करा आणि दुकानदारासारख्या व्यवस्थित घडय़ा घालून तुमच्या ठरावीक जागेवर ठेवून द्या. का असं करताय, गादीखाली इस्त्रीला ठेवताय!
घडय़ा करताना एखादा कपडा उसवलेला असेल किंवा एखाद्याचे बटण तुटलेले असेल, हुक-लूक सैल झालं असेल तर ते दुरुस्त करायचं काम कोणाच्या तरी मदतीने शिकून घ्या. कधीतरी शर्यतीत सुईत दोरा ओवला असेलच ना, मग आता धावदोरा कसा घालायचा बघा. तुमचाच कुठला तरी ड्रेस थोडासा फाटलाय या कारणास्तव आवडीचा असूनही तुम्हाला घालता येत नसेल. धावदोरा, उलटी टीप घालताना एवढासा सुईचा जीव तुमची कशी मदत करतो बघा.
आता एवढे छान कपडे दुरुस्त केलेत, घडय़ा केलेत, पण ते कपाट बघितलंत का किती विस्कटलंय. आईला वेळच मिळत नाही. मग तुम्हीच जरा आवरून ठेवता का जसं जमेल तसं. किंवा कोणी आवरत असेल तर आपणहून पुढे मदतीला जा. असं आवरा की कपडय़ाचं दुकानच वाटलं पाहिजे. मग बघा सारखं सारखं बघावंसं वाटेल आणि विस्कटलं तर वाईटही वाटेल.
उन्हाळ्याच्या सुट्टीत धुणं-भांडी करणारी बाई पण रजा घेते. अशा वेळी आईला सगळीच कामं करावी लागतात. मग तुम्ही तिला मदत केलीत तर.. आंघोळीनंतर आपले छोटे कपडे, रुमाल, सॉक्स तुमचे तुम्ही धुतलेत तर.. असं करा, कपडय़ाला मस्त साबण लावा, ब्रशने जरा घासा, सुरुवातीला हात हलणारच नाही, कपडे धुण्याच्या पोझिशनमध्ये बसताना तारांबळ उडेल, पण लक्षात ठेवा हे तुमच्या फायद्यासाठी आहे. सतत ‘वर’ खुर्चीवर बसल्यामुळे मांडी घालून बसणं कठीण जातं, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. छान बादलीतल्या पाण्यात कपडा खळबळा, आघळा, पिळा, उभा-आडवा झटका आणि सुरकुती पडणार नाही असा वाळत टाकण्याचा प्रयत्न करा. स्वच्छ चुरचुरीत कपडय़ाबरोबरच नवीन शब्दांची ही ओळख होईल.
काम करून खूप भूक लागल्यासारखं वाटतंय का? दोन मिनिटांत मॅगी करू नका किंवा फोन करून पिझ्झाही मागवू नका. पातळ पोहे किंवा कुरमुऱ्याचा डबा शोधून काढा. तेल, तिखट-मीठ, चिरता आला तर कांदा घाला, बघा ‘टेस्टी फूड’ खायला मिळेल. ब्रेडला लोणी आणि कोरडी चटणी लावून खाल्लंत ना तरी आवडेल, फक्त एकदा खाऊन बघायला मात्र हवं आणि हो घरातल्या बाकीच्यांना विसरू नका, एक तीळ सातजणांत वाटून खावा, हे माहिती आहे ना!
आता बुद्धीला थोडं खाद्य द्या नाहीतर जाईल गंजून. काय कराल? बाजारात प्रत्येकी १७ रुपयांच्या सहा गोष्टी घेऊन पैसे देताना झालेली गडबड आठवतेय ना! पाढे पाठ नाहीत, त्या कॅलक्युलेटरवर तुम्ही अवलंबून राहता. तुम्ही सुज्ञ, शहाणे आहात, हे बरोबर आहे का? पटतंय का? अगदी खरं खरं सांगा. काय म्हणता, पाढे लिहिण्याची आठवण होते, पण नेमकं कुणीतरी खेळायला बोलावतं आणि मग राहून जातं. खरं बोललात हे मात्र खूप आवडलं. असं करा रोज फक्त अर्धा तास वेळ काढा, पाढे आणि पाच ओळी सुंदर अक्षरात शुद्धलेखन. बघा जमविता येतंय का?
अरे, या सगळ्या कामात तुमचा कंटाळा पळून गेलेला दिसतोय! खरं ना!