साहित्य- कार्डपेपर, रंगीत जिलेटीन पेपर, कात्री, डिंक, ब्लेड, पट्टी, पेन्सिल, मध्यम आकाराच्या बरणीचे झाकण.

कृती- बरणीच्या झाकणाच्या साहाय्याने कार्डपेपरवर ३८ वर्तुळे काढून ती कापून घ्या. आता कापलेले प्रत्येक वर्तुळ हलक्या हाताने अर्धे दुमडा. त्याच्या दोन्ही कडांवर खुणा करून घ्या. खुणा केलेले दोन्ही बिंदू एकमेकांवर येतील अशा प्रकारे हे वर्तुळ पुन्हा अध्र्यात दुमडून घ्या. आता दुमडलेल्या दोन्ही कडांवर खुणा करा. अशा प्रकारे तुम्हाला चार बिंदू मिळतील. हे एकमेकांना जोडल्यावर एक चौरस तयार होईल. पट्टीच्या साहाय्याने हे आखलेल्या रेघांवर दुमडून घ्या. आता ४ वर्तुळे एकमेकांना चिकटवून घ्या आणि बरोबर मध्यावर पुन्हा एक मध्यम आकाराचे वर्तुळ काढून ते ब्लेडने कापा. (मध्यातील गोल हा बल्ब आणि त्याच्या होल्डरच्या आकारानुसार कमी-जास्त करावा.) कापून घेतलेल्या वर्तुळांपैकी २४ वर्तुळांना मध्यात अशा प्रकारे गोल काढून ब्लेडच्या साहाय्याने ते कापून घ्या. त्याला मागच्या बाजूला जिलेटीन पेपर चिकटवा. आता उरलेली १४ वर्तुळे अशा प्रकारे मध्यात कापून त्याची अर्धवर्तुळे तयार करून घ्या. प्रत्येकी २ वर्तुळे एका अर्धवर्तुळाच्या साहाय्याने आकृतीप्रमाणे जोडून घ्या. अशा प्रकारे एकूण १० भाग तयार करा. तयार झालेल्या भागांपैकी प्रत्येकी २ भाग २ अर्धवर्तुळांच्या साहाय्याने जोडा. असे एकूण ५ भाग तयार होतील. त्यापैकी एकूण ४ भाग घेऊन २ भागांना २ अर्धवर्तुळे असे हे चारही भाग अर्धवर्तुळाच्या साहाय्याने जोडून घ्या. पाचवा भाग वरील तयार झालेल्या साच्याला एका बाजूला अशा प्रकारे चिकटवून घ्या. (याला अर्धवर्तुळाने चिकटवू नका.) तिसऱ्या पायरीवर (बल्बसाठी भोक पाडून) तयार केलेला भाग तयार साच्याच्या दुसऱ्या बाजूला नवव्या पायरीप्रमाणेच जोडून घ्या आणि आकाशकंदील अडकवण्यासाठी त्याला दोरा लावून घ्या. अर्धवर्तुळांमुळे उघडे दिसत असलेले हे भाग बंद करण्यासाठी अर्धवर्तुळाच्या आतील भागाला डिंक लावून चिकटवून घ्या. अशा प्रकारे आपला दिवाळीचा आकाशकंदील झाला तयार!

– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com