मंगल कातकर – mukatkar@gmail.com

‘‘मिहीर ए मिहीर.. अरे, दहा वाजले. लेक्चर सुरू झालं. लॅपटॉप चालू कर लवकर.’’ मिहीरच्या आईची बडबड चालू होती, पण मिहीर तिला काहीच प्रतिसाद देत नव्हता. ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. बेडरूममध्ये जाऊन पाहते तर काय, मिहीर बाल्कनीत उभा आहे व टक लावून रस्त्याच्या पलीकडील झोपडपट्टीतील मुलांचं खेळणं पाहतो आहे. आई मिहीरला म्हणाली, ‘‘अरे, काय हे? अजून तुझं आवरलं नाही? आता अंघोळ नंतर कर, आधी लेक्चरला बस बघू!’’ आईच्या आदेशामुळे मिहीर मनात नसतानाही फ्रेश होऊन लेक्चरला बसला. पण आज काही त्याचं मन लेक्चरमध्ये लागेना. नेहमी प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ‘मी.. मी’ करणारा मिहीर आज फक्त मुकाटपणे ऐकत होता. आई आपलं काम करता करता त्याच्यावर लक्ष ठेवून असे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांतला त्याच्यातला बदल तिला चटकन् जाणवला. पहिलं लेक्चर संपल्याबरोबर मिहीर बेडरूमच्या बाल्कनीकडे धावला. आई त्याला नाश्ता कर म्हणत होती, पण त्याचं सगळं लक्ष समोरच्या झोपडपट्टीत खेळणाऱ्या मुलांकडे होतं. दुसऱ्या लेक्चरची वेळ झाली. आई पुन्हा त्याला बोलवायला गेली. मिहीर पुन्हा कपाळावर आठय़ा पाडत लेक्चरला बसला.

पुढचे दोन-तीन दिवस मिहीरचं असंच चाललं होतं. त्याचं ऑनलाइन शिकण्यात मन रमेना. मॅडमनी दिलेला गृहपाठ करण्यातही तो टाळाटाळ करत होता. आईने विचारल्यावर ‘‘जास्त गृहपाठ नाहीए. मी नंतर तो पूर्ण करेन..’’ अशी उत्तरं देत होता. एकदा तो बाबांना म्हणाला, ‘‘मला खूप अभ्यास करावा लागतो. खेळायलाच मिळत नाही. संध्याकाळी कसातरी तासभर- तेही सोसायटीतली मुलं आली तर खेळतो, नाही तर नाहीच. समोरच्या झोपडपट्टीतील मुलं बघावं तेव्हा नुसती खेळत असतात. मज्जा आहे त्यांची!’’ त्याच्या पडलेल्या चेहऱ्यावरून बाबांना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. त्यांनी आईच्या कानावर सगळं घातलं. ‘‘अभ्यासातून मिहीरचं मन उडतं आहे, हे काही बरोबर नाही. काहीतरी करावं लागेल.’’ आईने विचार केला.

रविवार सगळ्यांचा आरामाचा दिवस. लेक्चर्स नसल्यामुळे मिहीरही निवांत होता. संध्याकाळी चार वाजता आईने मिहीरचे काही जुने कपडे व बिस्किटांचे पुडे एका पिशवीत भरले आणि मिहीरला म्हणाली, ‘‘तू, मी आणि बाबा जरा बाहेर जाऊन येऊ या.’’

‘‘कशाला? कुठे?’’ मिहीरने वैतागतच विचारलं.

आई म्हणाली, ‘‘आपण तिथे जाऊ तर खरं.. मग तुला कळेल.’’ तिघांनी तोंडाला मास्क लावले. आईने सामान भरलेली पिशवी घेतली व ते घराबाहेर पडले. इमारतीतून बाहेर पडल्यावर समोर असणारा रस्ता आईने ओलांडला. मिहीरला कळेना, की आई झोपडपट्टीच्या दिशेने का चालली आहे? त्यानं विचारलंही. बाबा म्हणाले, ‘‘अरे, तिथे गेल्यावरच आपल्याला कळेल. मलाही माहीत नाही.’’

रस्त्यावर आजूबाजूला कचरा पडला होता. कुबट, घाण वास येत होता. मिहीरला कसंतरी वाटायला लागलं. प्लास्टिक, पत्रे वापरून छोटय़ा छोटय़ा झोपडय़ा बनवलेल्या होत्या. मोकळ्या जागेत मुलं तुटलेली बॅट घेऊन क्रिकेट खेळत होती. आईने सगळ्यांना हाताने खुणा करून बोलावलं. सगळे जण धावत आले. प्रत्येकाला आईने बिस्किटचा पुडा दिला. काहींना जुने कपडे दिले. त्यातल्या एकाला आईने विचारलं, ‘‘शाळेत जातोस का? कितवीत शिकतोस?’’

तो म्हणाला, ‘‘मी सातवीत आहे. मुन्सिपालिटीच्या शाळेत जातो. पण सध्या करोनामुळे शाळा बंद आहे.’’

मिहीरने लगेच विचारलं, ‘‘पण तुम्हाला ऑनलाइन लेक्चर नसतात का? तुम्ही तर सारखे खेळताना दिसता. ’’

‘‘असतात ना! पण आमच्या आई-बाबांकडे स्मार्ट फोन नाहीत. पण आम्हीही  शिकतो. आमच्या वस्तीतलेच ताई-दादा आम्हाला सकाळी ८ ते ९.३० या वेळेत शिकवायला येतात. आमच्या बाईआठवडय़ातून दोन-तीन वेळा येतात आणि आम्हाला अभ्यास देऊन जातात.’’

त्या मुलाच्या उत्तराने मिहीरला कळलं, की किती कठीण परिस्थितीत ही मुलं शिकण्याचा प्रयत्न करत आहेत; आणि आपण मात्र त्यांचा खेळ बघून आपल्याला तसं खेळायला मिळत नाही म्हणून नाराज होतो. आपली चूक लक्षात येताच मिहीर आईला म्हणाला, ‘‘चल, घरी जाऊ. माझा चार दिवसांचा गृहपाठ राहिला आहे तो पूर्ण करायचा आहे.’’

आई-बाबा एकमेकांकडे बघून हसले आणि आनंदाने घरी निघाले.