एका गावाजवळ एक सुंदर तळं होतं. समुद्रासारखं भलंमोठ्ठं, आकाशासारखं निळं निळं अन् मधासारखं गोड व मधुर! पहाट होताच कोकिळेच्या कुहुकुहुने तळं जागं व्हायचं. जरा उजाडलं की हंस, कारंडक लगबग करीत यायचे. जराशाने फुलपाखरांचं नर्तन सुरू व्हायचं आणि रात्र झाली की चंद्र-चांदण्या फेर धरायच्या. या तळ्यामध्ये चंदेरी, सोनेरी रंगांचे मासे व पिवळ्याजर्द चोचींची व पांढऱ्याशुभ्र पंखांची बदकं राहायची. दिवसभर ही सारी मंडळी पाण्यात डुंबायची, मज्जा-मज्जा करायची.
एकदा मोठ्ठा दुष्काळ पडला. हिरवं रान सुकू लागलं, पाण्यासाठी व्याकूळ झालं. चिमणी-पाखरं बेजार झाली. सैरावैरा धाऊ लागली. हळूहळू तळ्याचं पाणी आटू लागलं अन् अखेर त्याने तळ गाठला. तळ्यातल्या रहिवाशांनी तळं सोडून जाण्याचा निर्णय घेतला, पण माशांचं काय? त्यांनी कसं जायचं? त्यांना थोडेच पंख होते उडून जायला! माशांनी बदकांना विचारलं- ‘क्व्ॉक क्व्ॉक बदकांनो, आम्हाला न्याल का? आमचे प्राण वाचवाल का?’
‘‘नाही रे बाबा, आम्ही नाही नेणार. तुमचं तुम्ही बघा. आम्ही चाललो,’’ असं म्हणून बदकं निघून गेली.
‘‘आता काय करायचं?’’ मासे दु:खी झाले. त्याच तळ्यात एक प्रेमळ बदक व त्याची दोन पिल्लं होती. त्याला माशांची दया आली. ते आपल्या पिल्लांना म्हणालं, ‘‘बाळांनो, एवढी वर्षे आपण माशांबरोबर राहिलो, खेळलो. आता संकटाच्या वेळी त्यांना सोडून जाणं योग्य नाही. त्यांना दुसऱ्या तळ्याकडे घेऊन जाण्याएवढी ताकद माझ्या शरीरात राहिलेली नाही, पण माझ्याकडे एक युक्ती आहे,’’ असं म्हणून बदक कामाला लागलं. आपल्या अंगातली सारी ताकद एकवटून त्याने तळ्यातला गाळ, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या काढायला सुरुवात केली. त्याची पिल्लंही त्याला जमेल तेवढी मदत करू लागली. पाहता पाहता तळ्याच्या गळ्याशी अडकलेला कचऱ्याचा फास निघाला. झरे मोकळे झाले. झुळुझुळु वाहू लागले. आता मात्र बदक थकलं होतं. सततच्या कामाने त्याचे पंख काळवंडले होते, चोच दुखत होती, पण ते थांबलं नाही. सतत दोन दिवस क्व्ॉक क्व्ॉक बदकाने व त्याच्या इवल्याशा- छोटुकल्या पिल्लांनी तळ्यातला बराच गाळ व कचरा काढून टाकला, पण शेवटी कष्टांची हद्द झाली. अतिश्रमाने व अशक्तपणाने बदक थकलं, त्याला वारंवार ग्लानी येऊ लागली. आपल्या आईची केविलवाणी अवस्था बघून पिल्लं रडू लागली. मासेही अस्वस्थ झाले. आपल्या प्रेमळ व परोपकारी स्वभावाच्या मित्राची दशा बघून काळजीत पडले आणि सारे मासे घाईघाईने जलदेवीकडे आले.
‘‘माते जलदेवी, आमच्यावर दया कर. आमचा मित्र संकटात आहे. काहीतरी कर, पण त्याला वाचव. आम्हाला त्याची फार काळजी वाटते गं.’’ मासे गयावया करीत सांगत होते.
जलदेवी त्या परोपकारी बदकांवर मनोमन अत्यंत खूश झाली होती. तिने हातातली जादूची छडी दोन वेळा पाण्यावर आपटली अन् काय आश्चर्य! पाहता पाहता आभाळात काळ्या काळ्या मेघांची एकच गर्दी झाली. ढुमढुमढमाढम करीत मेघ ढोल बडवू लागले. बिजली बाई कडकडू लागल्या. सों सों करीत वारा वाहू लागला आणि धो धो पावसाला सुरुवात झाली.
‘‘झरझर, सरसर पाऊस आला, पाऊस आला,’’ असं म्हणत बदक व त्याची पिल्लं गटागटा पाणी पिऊ लागली. तळ्यातला कचरा निघाल्यामुळे तळं तुडुंब भरून वाहू लागलं. चंदेरी मासे लगबग, सुरसुर करीत पोहू लागले. सारीकडे आनंदी आनंद झाला. परोपकारी बदकाच्या हुशारीचं साऱ्यांनी खूप कौतुक केलं. कारण त्याने आपल्या प्राणांचीही पर्वा न करता माशांना तर वाचवलंच, शिवाय तळ्यातला गाळ काढून तळ्यालाही जीवदान दिलं. ते तळं, त्यातले मजेशीर रहिवासी व सभोवतीचा सुंदर निसर्ग सारेजण पूर्वीप्रमाणे आनंदाने व सुखाने राहू लागले.